दैव देते अन् कर्म नेते!

    13-Jan-2024   
Total Views |
narendra modi on congress controversy statement

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यानंतर, जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘काँग्रेसने पहले प्रभू श्रीराम के अस्तित्व पर प्रश्न उपस्थित किया और बाद में श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम का बहिष्कार किया. क्या यहीं काँग्रेस की नीती है?’ असा प्रश्न आपल्या खास शैलीत उपस्थित केला, तर काँग्रेसला त्याचे उत्तर देता येणार आहे का, हा विचार करून काँग्रेसधुरिणांना नक्कीच घाम फुटू शकतो!

जुनागढचा नवाब मुहम्मद महाबत खानजी तिसरा याने त्याच्या बहुसंख्य हिंदू प्रजेच्या विरोधाला न जुमानता, पाकिस्तानात सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भारतीय सैन्याने दि. ९ नोव्हेंबर १९४७ रोजी जुनागढ संस्थान भारतात जोडले होते. त्यानंतर काही दिवसांनंतर देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीचा निर्णय जाहीर केला. त्या वर्षी दि. १३ नोव्हेंबर रोजी जुन्या मंदिराच्या ठिकाणी जाहीर सभेत बोलताना, पटेल यांनी सौराष्ट्रातील लोकांना या प्रकल्पासाठी जे-जे उत्तम करता येईल ते करा, असे आवाहन केले. तसेच सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीला ’पवित्र कार्य’ असे संबोधून त्यामध्ये प्रत्येकाने सहभागी व्हावे, असेही पटेल त्यावेळी जनतेला उद्देशून म्हणाले. त्यामुळे सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीचे, जीर्णोद्धाराचे नेतृत्व करणार्‍या, सरदार पटेलांच्या भूमिकेबद्दल बरेच काही सांगितले आणि लिहिले गेले आहे. विशेष म्हणजे, तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू या प्रकल्पाला हिंदू पुनरुत्थानवादाचे लक्षण मानत असतानाही, त्यांचा निर्धार कायम होता.

मात्र, हे कार्य आपल्याच हयातीत पूर्ण झालेले बघणे पटेल यांना शक्य झाले नाही. पटेल यांचे १९५० साली निधन झाले आणि या कार्याची धुरा कन्हैयालाल मुन्शी यांनी आपल्या खांद्यावर घेतली. विशेष म्हणजे, सरदार पटेल हयात असतानाच, देशाचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी प्राणपणाने सोमनाथाच्या जीर्णोद्धारास विरोध केला होता. कारण, अशाप्रकारे हिंदू धर्माशी संबंधित कोणतेही कृत्य करणे त्यांच्या तथाकथित आधुनिक, प्रगत आणि जागतिक नेता या प्रतिमेच्या आड येईल, अशी त्यांना भीती सतावत असावी. ते काहीही असले तरी, नेहरूवाद्यांनी नेहरूंना ‘आधुनिकतेचा महामेरू’ अशी उपाधी का दिली, याचे मूळ कदाचित या सोमनाथ प्रकरणात सापडू शकते.

सोमनाथ जीर्णोद्धारामुळे नंतर या मंदिराच्या उद्घाटनाचा मुद्दाही मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये चर्चेसाठी आला. त्यावेळी पं. नेहरू म्हणाले होते की, “सोमनाथाचा जीर्णोद्धार करण्याचा तुमचा निर्णय मला अजिबात आवडलेला नाही. हा प्रकार म्हणजे हिंदू पुनरुत्थानवाद आहे.“ त्यावर मुन्शी यांनी पं. नेहरूंना दिलेले उत्तर हिंदूंच्या मूळच्या लढवय्या मानसिकतेचा परिचय देणारे असेच. मुन्शी म्हणाले, ”तुम्ही मंत्रिमंडळाच्या बैठकीत हिंदू पुनरुत्थानवादाचा उल्लेख करून, माझा संबंध सोमनाथाशी जोडला. तुम्ही असे केल्याचा मला आनंदच आहे; कारण मी माझी मते अथवा विचार लपवू इच्छित नाही. मी तुम्हाला खात्री देतो की, आज भारतातील ‘कलेक्टिव्ह सबकॉन्शस’ आपले सरकार करत असलेल्या, अन्य अनेक गोष्टींपेक्षा सोमनाथाच्या पुनर्बांधणी योजनेमुळे अधिक आनंदी आहे.”

हा सर्व इतिहास पुन्हा उगाळण्याचे कारण म्हणजे, काँग्रेस पक्षाने पुन्हा एकदा याच इतिहासाचीच पुनरावृत्ती करून, काँग्रेस पक्ष हा नेहरूंच्या काळापासूनच हिंदू समाजाशी कसा कधीही मनापासून जोडला गेला नव्हता, यावरच शिक्कामोर्तब केले.अयोध्येत दि. २२ जानेवारी रोजी भव्य मंदिरात श्रीरामलला प्राणप्रतिष्ठेचा अभूतपूर्व सोहळा संपन्न होईल. हा सोहळा राजकीय-सामाजिकदृष्ट्या ऐतिहासिक ठरेल, यात कोणतीही शंका नाही. तब्बल ५०० वर्षांहून अधिक काळ हिंदू समाजाने श्रीराम जन्मभूमीसाठी लढा दिला. त्यानंतर लोकसहभागातूनच या भव्य मंदिराची उभारणी ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’तर्फे करण्यात येत आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी ट्रस्टतर्फे देशातील सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांना निमंत्रणही देण्यात आले. मात्र, कोत्या वृत्तीच्या अनेक पक्षांनी, त्यांच्या नेतृत्वाने हे निमंत्रण नाकारल्याचे दिसते. त्यामध्ये डावे पक्ष आणि काही प्रादेशिक पक्षांचा देखील समावेश आहे. डावे पक्ष हे धर्मास अफूची गोळी वगैरे मानत असल्याने, त्यांनी निमंत्रण नाकारणे यात म्हणा आश्चर्य ते काय? तशीच गत प्रादेशिक पक्षांच्या प्रमुखांचीही. मतपेढीच्या राजकारणात प्रादेशिक पक्ष आकंठ बुडालेले असल्याने, त्यांनीही निमंत्रण नाकारणे साहजिकच.

मात्र, एकेकाळी देशात दीर्घकाळ सत्तेत असलेला आणि २०१४ सालापासून सातत्याने पराभव पत्करणार्‍या, काँग्रेस पक्षाने प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण नाकारून, आपल्याच पायावर धोंडा मारुन घेतला आहे, यात कोणतीही शंका नाही. काँग्रेसचे प्रसारमाध्यमप्रमुख जयराम रमेश यांनी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेतील गटनेते अधीररंजन चौधरी हे प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास उपस्थित राहणार नसल्याचे पत्रक काढले. त्यासाठी काँग्रेसने दिलेले कारण अतिशय मनोरंजक आणि देशातील जनतेला न पटणारे असेच.काँग्रेसने म्हटले आहे की, “गेल्या महिन्यात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि लोकसभेतील काँग्रेस संसदीय पक्षाचे नेते अधीररंजन चौधरी यांना अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण मिळाले. कोट्यवधी भारतीय प्रभू रामाची पूजा करतात. धर्म ही माणसाची वैयक्तिक बाब आहे. मात्र, पण गेल्या काही वर्षांत भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अयोध्येतील राम मंदिराला राजकीय प्रकल्प बनवले आहे. केवळ निवडणुकीचा लाभ मिळवण्यासाठी, अर्धनिर्मित मंदिराचे उद्घाटन केले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे २०१९ सालच्या सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय स्वीकारून आणि लोकांच्या विश्वासाचा आदर करून मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी आणि अधीर रंजन चौधरी यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दिलेले निमंत्रण नाकारले आहे.”

काँग्रेस पक्ष एकीकडे २०१९ सालचा सर्वोच्च न्यायालयाचा राम मंदिराबाबतचा निर्णय स्वीकारत असल्याचे म्हणतो, तर दुसरीकडे लोकांच्या विश्वासाचा आदर करून, आमचे नेते प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण नाकारत आहे, अशीही त्याला जोड दिली जाते. आता या दोन ओळींवरून काँग्रेसच्या राजकारणाची दिशा स्पष्ट होते. जर काँग्रेसला सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मान्य असेल, तर नेमक्या कोणत्या लोकांच्या विश्वासाचा आदर करून, प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर काँग्रेस बहिष्कार टाकत आहे, हे काँग्रेसलाच आता स्पष्ट करावे लागणार आहे. कारण, काँग्रेस नेते प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास उपस्थित राहिले, तर देशातील फुटकळ आंदोलनजीवी आणि डाव्या विचारांची पुरोगामी टोळी वगळता कोणासही, अगदी मुस्लीम समाजालाही वाईट वाटणार नाही. त्यामुळे काँग्रेस पक्ष आता नेमक्या कोणत्या विचारांवर वाटचाल करत आहे, याचे उत्तर त्यांना द्यावेच लागणार आहे.

अर्थात, काँग्रेसच्या या निर्णयाविरोधात अगदी सरदार पटेल अथवा कन्हैयालाल मुन्शी यांच्याप्रमाणे बाणेदारपणा दाखवला नसला, तरीदेखील काही प्रदेश स्तरावरील नेत्यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला. गुजरात काँग्रेसचे कार्याध्यक्ष अंबरिश डेरे यांनी यांनी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम हे आपले पूजनीय दैवत आहेत, त्यामुळे भारतभरातील असंख्य लोकांची श्रद्धा या नव्याने बांधलेल्या मंदिराशी वर्षानुवर्षे जोडलेली असणे स्वाभाविक आहे. त्यामुळे काँग्रेसच्या काही लोकांनी अशा विधानापासून अंतर राखले पाहिजे आणि जनभावनेचा मनापासून आदर केला पाहिजे, अशी विधाने माझ्यासारख्या अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी निराशाजनक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्याचप्रमाणे काँग्रेसचे गुजरातमधीलच आमदार अर्जुन मोढवाडिया यांनीदेखील विरोध केला आहे. “भगवान श्रीराम हे आराध्य दैवत असून, देशवासीयांच्या श्रद्धेचा विषय आहे. काँग्रेसने असे राजकीय निर्णय घेण्यापासून दूर राहायला हवे होते,” असेही त्यांनी म्हटले आहे.

प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर काँग्रेस खासदार राहुल गांधी हे ‘भारत जोडो न्याय यात्रा’ काढणार आहेत. भारतातील पूर्व ते पश्चिम अशा मार्गाने ही यात्रा मार्गक्रमण करेल. या यात्रेसाठीदेखील काँग्रेस आणि त्यांच्या ’इकोसिस्टीम’ने जोरदार तयारी केली आहे. आता या यात्रेदरम्यान सर्वसामान्य हिंदू व्यक्तीने जर काँग्रेसला विचारले की, तुमचे नेते श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात का अनुपस्थित राहिले, तर याचे उत्तर राहुल गांधी यांना देता येणार का, याचा विचार काँग्रेसने करायला हवा होता. त्याचप्रमाणे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यानंतर, जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ’काँग्रेसने पहले प्रभू श्रीराम के अस्तित्व पर प्रश्न उपस्थित किया और बाद में श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम का बहिष्कार किया. क्या यहीं काँग्रेस की नीती है?‘ असा प्रश्न आपल्या खास शैलीत विचारला, तर काँग्रेसला त्याचे उत्तर देता येणार आहे का, हा विचार करून काँग्रेसधुरिणांना नक्कीच घाम फुटू शकतो. खरे तर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास उपस्थित राहून, काँग्रेसला आपल्यावरील श्रीरामविरोधी आरोपांना खोडून काढण्याची एक संधी चालून आली होती. मात्र, दैवाने दिलेली ही संधी काँग्रेसने आपल्याच कर्माने घालवल्याचे दिसते.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.