मुंबई : नुतन मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स चॅरिटी ट्रस्ट आणि मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स असोशिएशन यांनी आज त्यांच्या दादर पश्चिम येथील कार्यालयात अयोध्यामधील श्रीराम जन्मभूमीवरील मंदिर न्यासातर्फे पाठवण्यात आलेल्या पूजीत अक्षता कलशाचे विधिवत पूजन करून स्थापना केली. विहिप चे कोकण प्रांत मंत्री मोहन सालेकर व भाजप आमदार श्रीकांत भारतीय यांच्या हस्ते कलश पूजन करण्यात आले.
तत्पूर्वी डब्बेवाला संघटनेच्या वारकारी भजनी मंडळाने कलश दिंडी सोहळा काढून प्रभू श्रीरामच्या जयघोषात कलशचे स्वागत केले. मोहन सालेकर व श्रीकांत भारतीय हे देखील ह्या सोहळ्यात वारकरी बनले होते. हा कार्यक्रम विहिपचे प्रांत प्रचार प्रसार विभागाचे प्रशांत पळ यांच्या सहकार्याने व डब्बेवाला दोन्ही संघटनेचे अध्यक्ष उल्हास मुके व रामदास करवंदे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाला कासार समाजाचे मुंबई सचिव नितीन येंडे, रा स्व संघांचे बाबुरावजी, उद्यान गणेश मंदिराचे मनोज चौहान व सर्व डब्बेवाला संघटनेचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते. उपस्थिताना श्रीराम मंदिर न्यासाकडून आलेल्या पूजीत अक्षता, राम मंदिराचा फोटो विहिप तर्फे देण्यात आला.