अर्थसंकल्पातील घोषणेची पूर्तता; महाराष्ट्रातील खेळाडूंना मिळणार ऑलिम्पिकच्या धर्तीवर प्रशिक्षण
13-Jan-2024
Total Views | 43
मुंबई : महाराष्ट्रातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण देऊन ऑलिम्पिक पदकांचे ध्येय गाठण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'मिशन लक्ष्यवेध' योजनेची घोषणा गेल्या अर्थसंकल्पात केली होती. त्या घोषणेची आता पूर्तता झाली असून, महायुती सरकारने 'मिशन लक्ष्यवेध' योजना राज्यभर राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी १६० कोटी ४६ लाखांच्या भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे.
ऑलिम्पिकसह महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये राज्यातील खेळाडूंनी सातत्याने चांगली कामगिरी करायची असेल, तर आपल्याकडील क्रीडा प्रशिक्षण यंत्रणा ही खेळाडू केंद्रीत, स्पर्धात्मक आणि आंतरराष्ट्रीय दर्जाप्रमाणे असायला हवी. त्यासाठी कृतीबद्ध कार्यक्रम आखून 'मिशन लक्ष्यवेध' योजना राबविण्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करताना केली होती. त्यानुसार, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा व खेलो इंडिया, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेतील खेळाडूंना केंद्रबिंदू मानून खेळाडू व स्पर्धा केंद्रीत 'मिशन लक्ष्यवेध' आराखडा तयार करण्यात आला. ११ जानेवारी रोजी त्यास शासन मान्यता देण्यात आली आहे.
'मिशन लक्ष्यवेध' योजनेच्या अंमलबजावणीसाठी क्रीडा क्षेत्रात अतिउत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थेशी करार करण्यात येणार आहे. तसेच या योजनेच्या सनियंत्रणासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे रुपांतर 'महाराष्ट्र क्रीडा प्राधिकरणा'त केले जाणार आहे. या योजनेंतर्गत राज्य स्तरावर 'हाय परफॉर्मन्स सेंटर', विभागीय स्तरावर 'स्पोर्ट एक्सलन्स सेंटर' आणि जिल्हा स्तरावर 'क्रीडा प्रतिभा विकास केंद्र' अशी त्रिस्तरीय प्रशिक्षण यंत्रणा उभारली जाणार आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात १६० कोटी ४६ लाख इतका निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, जिल्हा नियोजन निधीमधून प्रतिवर्षी १० टक्के निधी दिला जाणार आहे.
१२ खेळांचा समावेश
'मिशन लक्ष्यवेध' योजनेच्या पहिल्या टप्यात १२ खेळ निश्चित करण्यात आले आहेत. यात अॅथलेटिक्स, बॅडमिंटन, बॉक्सिंग, वेटलिफ्टिंग, हॉकी, कुस्ती, आर्चरी, शुटींग, रोईंग, सेलिंग, लॉन टेनिस व टेबल टेनिसचा समावेश आहे. या खेळांची 'हाय परफॉर्मन्स सेंटर' राज्यात विविध ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे. तसेच विभागीय स्तरावर ३७ 'स्पोर्टस एक्सलन्स सेंटर' व जिल्हास्तरावर १३८ 'क्रीडा प्रतिभा विकास केंद्रां'ची स्थापना करण्यात येणार आहेत. पुणे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात अत्याधुनिक सुसज्य असे 'स्पोर्टस सायन्स सेंटर' स्थापन केले जाणार आहे. या माध्यमातून जिल्हास्तरावर २७६०, विभागीय स्तरावर ७४० आणि राज्यस्तरावर २४० अशा एकूण ३७४० खेळाडूंच्या अद्ययावत क्रीडा प्रशिक्षणाची व्यवस्था केली जाणार आहे. तसेच विभागीय व जिल्हास्तरावर खेळाडूंसाठी समुपदेशन केंद्राची स्थापना करण्यात येणार असून, त्याद्वारे खेळाडूंना करिअरच्या संधीची माहिती दिली जाणार आहे.