दुबईहून निकाराग्वाला जाणारे विमान दि. २१ डिसेंबर रोजी मानवी तस्करीच्या संशयावरून फ्रान्समध्ये थांबवण्यात आले. या विमानातून प्रवास करणारे ३०३ भारतीय प्रवासी भारतातून बेकायदेशीरपणे प्रवास करत असल्याची माहिती फ्रेंच पोलिसांना मिळाली होती. अशा या बेकायदेशीर स्थलांतराच्या समस्येवर भाष्य करणारा शाहरुख खानचा ‘डंकी’ हा चित्रपटदेखील प्रदर्शित झाला होता. तेव्हा या समस्येचे गांभीर्य लक्षात घेता, भारतातून होणार्या या बेकायदेशीर परदेशी स्थलांतराचा ‘डाँकी मार्ग’ हा सर्वस्वी चिंताजनकच असून त्यावर उपाययोजना करणे हे क्रमप्राप्तच!
अमेरिका, कॅनडा, ब्रिटन यांसारख्या पाश्चिमात्य देशांमध्ये विविध देशांमधून अवैध स्थलांतर केले जाते. त्यासाठी लोक बरेचदा बेकायदेशीर प्रवास करून, आपला जीव धोक्यातही घालतात. एवढेच काय तर पोलिसांद्वारे पकडले जाण्याचा, तुरुंगात जाण्याचा आणि नंतर त्या देशातून हद्दपार होण्याचा धोकादेखील असे स्थलांतरित पत्करतात. असेच एक विमान मानवी तस्करीच्या संशयावरून दि. २१ डिसेंबर रोजी फ्रान्समध्ये थांबवण्यात आले. नंतर फ्रेंच पोलिसांचे पथक विमानतळावर पोहोचले आणि विमानाला उड्डाण करण्यापासून त्यांनी रोखले. तेव्हापासून विमान पॅरिसच्या वात्री विमानतळावर अडकले होते.या विमानातील भारतीय संयुक्त अरब अमिरातीमधील कामगार होते, ज्यांना अमेरिका किंवा कॅनडामध्ये आश्रय घ्यायचा होता, म्हणून ते निकाराग्वाला जात होते. फ्रेंच अधिकारी इमिग्रेशन कायद्यांचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणाची चौकशी करत आहेत, तर यापैकी २७ प्रवासी अद्याप फ्रान्समध्ये आहेत.
वाढते बेकायदेशीर स्थलांतर
अनेक भारतीय अलीकडच्या काळात बेकायदेशीर स्थलांतराचा धोकादायक मार्ग पत्करताना दिसतात. ’चांगल्या आयुष्यासाठी’ लोक एजंटना भरमसाठ पैसे देतात, जे सीमा ओलांडण्यास त्यांना मदत करतात. अमेरिकेत बेकायदेशीर प्रवेशासाठी मेक्सिको आणि निकाराग्वा यांसारख्या मध्य अमेरिकन देशांतील मार्गांचा वापर केला जातो.निकाराग्वा हे अमेरिकेमधील आश्रय शोधणार्यांसाठी एक लोकप्रिय ठिकाण. एका आकडेवारीनुसार, नोव्हेंबर २०२२ ते सप्टेंबर २०२३ या काळात, बेकायदेशीरपणे अमेरिकेत प्रवेश करताना तब्बल ९६ हजार, ९१७ भारतीयांना अटक करण्यात आली. २०१९-२० मध्ये बेकायदेशीरपणे अमेरिकेत शिरण्याचा प्रयत्न करताना पकडल्या गेलेल्या भारतीयांची संख्या १९ हजार, ८८२ होती, तर २०२१-२२ मध्ये अशा पद्धतीने पकडल्या गेलेल्या भारतीयांची आकडेवारी ६३ हजार, ९२७ होती.अमेरिकेचा डाटा दर्शवितो की, त्यापैकी किमान ४१ हजार, ७७० भारतीयांनी मेक्सिकन भू सीमेवरून अमेरिकेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. आतापर्यंतच्या इतिहासात सर्वाधिक भारतीयांनी अमेरिकेत अवैधरित्या प्रवेश केला.
पंजाब आणि उत्तरेतील अनेक राज्यांतून मोठ्या प्रमाणात परदेशात अवैधरित्या स्थलांतर वाढले आहे. परदेशात अवैध पद्धतीने घुसखोरी करण्यासाठी जागतिक पातळीवर एक संज्ञा वापरली जाते, ज्याला ’डाँकी फ्लाईट्स’ म्हणतात. जगभरातील अनेक लोक युनायटेड किंग्डम, कॅनडा आणि युनायटेड स्टेट्समध्ये प्रवेश करण्यासाठी अवैध मार्गाचा वापर करतात.युरोपच्या ’मायग्रेशन पॉलिसी इन्स्टिट्यूट’ने ‘डाँकी फ्लाईट्स’ यावर एक अहवाल तयार केला. या अहवालात पंजाबमधून युनायटेड किंग्डममध्ये होणार्या अवैध घुसखोरीबाबत सविस्तर विवेचन केले आहे. गाढवाच्या पाठीवर ओझे टाकून केलेल्या प्रवासाला ’डाँकी फ्लाईट्स’ हा शब्दप्रयोग प्रचलित झाला. ज्या देशात घुसखोरी करायची आहे, त्याच्या आसपासच्या देशांचा पर्यटन व्हिसा प्राप्त करून, त्या देशात पाऊल ठेवायचे आणि नंतर गुप्त मार्गाने हव्या असलेल्या देशात प्रवेश मिळवायचा.इमिग्रेशन धोरणातील कमतरतेचा फायदा उचलून युनायटेड किंग्डम आणि अमेरिकेमध्ये अशाप्रकारे घुसखोरी केली जाते.’युरोपियन युनियन’मधील देशांमध्ये प्रवेश करण्यासाठी भारतीय नागरिकांना पर्यटन व्हिसा मिळतो. मागच्या वर्षीपर्यंत ज्या लोकांना पश्चिम युरोपात प्रवेश करायचा होता, ते लोक सर्बिया देशाचा व्हिसा मिळवून, तिथे ३० दिवस वास्तव्य करत असत. या ३० दिवसांत ट्रॅव्हल एजंट किंवा मानवी तस्करीचा व्यवसाय करणारे, भारतीयांसाठी सर्बिया ते इटली अशा समुद्रमार्गाचे नियोजन करून देत.
सर्बियाच्या एका बाजूला ऑस्ट्रिया, स्लोव्हेनिया आणि क्रोएशिया देश आहेत; तर दुसर्या बाजूला मॅसेडोनिया आणि ग्रीस आहेत. अशाप्रकारे सर्बियामधून युरोपियन युनियन देशांमध्ये प्रवेश करणे सोपे होते.परदेशात जाऊन सुंदर आयुष्य व्यतीत करण्याचे स्वप्न पाहणारे, तरूण जेव्हा ट्रॅव्हल एजंटकडे जातात, तेव्हा त्यांची फसवणूक सुरू होते. अतिशय कमी दरात व्हिसा मिळवून देऊ, असे आमिष हे ट्रॅव्हल एजंट तरुणांना देतात. काही ट्रॅव्हल एजन्सी नियमानुसार नोंदणीकृत आहेत, तर काही अवैधरितीने आपला व्यवसाय चालवितात. एजंट आधी विद्यार्थी व्हिसा देण्याचे आमिष दाखवितात. जर विद्यार्थी व्हिसा नाकारला गेला, तर मग अवैध मार्गाचा अवलंब केला जातो. परदेशात जाण्यासाठी इच्छुक असलेले लोक एजंटना भरमसाठ शुल्क देतात आणि जोखमीच्या मार्गावरून मार्गक्रमण करण्याचा निर्णय घेतात. असे एजंट लोकांना कोलंबिया ते पनामा प्रवास करण्यासाठी, डॅरियन गॅप परिसर पायी चालून पलीकडे जाण्यास सांगतात. घनदाट जंगलाने वेढलेला आणि १६० किमी लांबीपर्यंत पसरलेला हा परिसर आहे. विषारी साप आणि जीवघेण्या आजारापासून स्वतःचे रक्षण करत, अनेक लोक उपाशीपोटी प्रवास करून, हे अंतर पार करतात. एका गटाने तर पनामा जंगलातून सीमा पार केल्याचा ब्लॉग तयार करून अपलोड केलेला आहे. ही सर्व जीवघेणी कसरत करण्यामागे कारण एकच असते. कसेही करून अमेरिकेत प्रवेश मिळवायचा आणि त्या ठिकाणी जाऊन आपले स्वप्न पूर्ण करायचे.
जानेवारी २०२२ मध्ये कॅनडातून अमेरिकेत प्रवास करणार्या, एका गुजराती कुटुंबातील चार जणांचा थंडीने गोठून मृत्यू झाला होता. यामध्ये तीन आणि ११ वर्षीय दोन मुलांचा समावेश होता. अमेरिकेच्या सीमेपासून केवळ दहा मीटर अंतरावर चौघांचे मृतदेह आढळले होते.युट्यूबवर जाऊन ’युएसए डाँकी’ असे सर्च केल्यानंतर हिंदी किंवा पंजाबी भाषेतील अनेक व्हिडिओ समोर येतात. या व्हिडिओमधून अवैधरित्या सीमा ओलांडण्याचे तंत्र सांगितले जाते.’डाँकी फ्लाईट्स’चा अवैध व्यवसाय पंजाबमध्ये पसरलेला आहे. पंजाबनंतर हा अवैध व्यवसाय हरियाणा, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि गुजरातमध्येही या राज्यांतही पसरला आहे.
जोखीम असूनही ’डाँकी’ मार्गाचा अवलंब
जादा पैसे कमावण्याची इच्छा, चांगली जीवनशैली यासाठी अनेक भारतीयांमध्ये परदेशात जाण्याची उत्कट इच्छा निर्माण झालेली दिसते. पंजाबी गायक आणि रॅपर सिद्धू मुसेवाला भारतात असताना, त्याच्याकडे काहीच नव्हते; पण तो कॅनडामधील ब्रॅम्प्टन शहरात गेला आणि त्यानंतर कोट्यधीश झाला. त्यामुळे प्रत्येकाला वाटते की, परदेशात जाऊन ते जलदगतीने आणि सोप्या पद्धतीने खूप सारे पैसे कमावू शकतात. हे फक्त एक स्वप्न आहे.युनायटेड किंग्डमच्या गृहखात्याने दिलेल्या माहितीनुसार, अवैधरित्या प्रवेश मिळवणार्यांपैकी भारतीय दुसर्या क्रमांकावर आहे. इंग्लिश खाडीमधून अतिशय छोट्या बोटीतून धोकादायक पद्धतीने प्रवास करून, स्थलांतरित नागरिक प्रवेश करतात. यावर्षी जानेवारी ते मार्च महिन्यात ६७५ भारतीय नागरिकांनी छोट्या बोटींमधून युनायटेड किंग्डममध्ये प्रवेश केला. युनायटेड किंग्डमने वर्क व्हिसावर निर्बंध लादल्यानंतर, हे स्थलांतर झाले.दुसरीकडे देशातले श्रीमंत आणि अतिश्रीमंत लोक परदेशात स्थायिक होण्यासाठी ‘गोल्डन व्हिसा’ मिळवत आहेत. मे २०२२ मध्ये नोंदवलेल्या माहितीनुसार ७ हजार, ५०० अतिश्रीमंत लोक परदेशातील नागरिकत्व घेऊन, तिथेच स्थायिक होण्यासाठी भारत सोडून गेले आहेत. २०१४ ते २०१८ दरम्यान सुमारे २३ हजार श्रीमंत भारतीय लोकांनी कायमस्वरुपी भारताबाहेर आपला मुक्काम हलवला.
बेकायदेशीर स्थलांतर कसे थांबवावे?
सर्वप्रथम लोकांना हे समजण्याची गरज आहे की, बेकायदेशीररित्या स्थलांतर केले, तर ते धोकादायकच असते. त्यामुळे त्यांना तुरुंगवास होऊ शकतो, जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून जर परदेशात स्थलांतर करायचेच असेल, तर ते फक्त कायदेशीररित्या करा. बेकायदेशीर एजंट किंवा संस्थांचा अजिबात वापर करू नका. हा प्रचार रेडिओ, टीव्ही, वर्तमानपत्रे आणि समाजमाध्यमांतून केला गेला पाहिजे.भारतातल्या संस्था आणि एजंट्स जे बेकायदेशीर स्थलांतराला मदत करतात, त्यांच्याविरुद्ध कठीण पोलीस कारवाई ही केली पाहिजे. त्यांना अतिशय मोठी शिक्षा दिली जावी. जर असे एजंट परदेशातून भारतीयांना मदत करीत असतील, तर त्या-त्या देशाशी समन्वय साधून अशा एजंट्सना पकडले पाहिजे आणि त्यांना शिक्षा दिली पाहिजे.आंतरराष्ट्रीय संस्थांची मदत घेऊन, अशा प्रकारचे भारतीयांचे बेकायदेशीर स्थलांतर हे नक्कीच थांबवले पाहिजे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात बोलताना परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन म्हणाले होते की, ”परराष्ट्र मंत्रालयाने कायदेशीर स्थलांतराला चालना देण्यासाठी अनेक योजना आखल्या आहेत आणि लवकरच त्यांची अंमलबजावणीदेखील केली जाईल.”तेव्हा, या समस्येकडे गांभीर्याने बघून, त्यावर वेळीच उपाययोजना करणे ही काळाची गरजच म्हणावी लागेल.