नव्या संधींचे दरवाजे उघडणारा इंग्लंड दौरा

    12-Jan-2024
Total Views | 62
Editorial on Defence Minister Rajnath Singh meets UK PM Rishi Sunak in London

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी इंग्लंड दौर्‍यात पंतप्रधान ऋषी सुनक यांची भेट घेत, संरक्षण तसेच आर्थिक सहकार्य यावर उभय देशांनी एकत्र येत, काम करण्यावर भर दिला. इंग्लंडलाही भारताबरोबर नव्या जागतिक व्यवस्थेत भागीदार म्हणून काम करायचे आहे. उभय देशांसाठी नव्या संधींचे दरवाजे उघडणारा दौरा असे याला म्हणता येईल.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लंडनमध्ये इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची भेट घेत, संरक्षण तसेच आर्थिक सहकार्य यांवर उभय देशांनी एकत्र येत, काम करण्यावर भर दिला. २२ वर्षांनंतर इंग्लंडला भेट देणारे, ते पहिलेच संरक्षण मंत्री आहेत. एकविसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत भारताला विकसित देश म्हणून बनविण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोडला आहे. हा संकल्प साकार करण्यासाठी भारत प्रयत्नात आहे. त्याचाच एक भाग म्हणून राजनाथ सिंह यांनी इंग्लंडसारख्या मित्र देशांशी संबंध दृढ करण्यावर भर ठेवला आहे. राजनाथ सिंह यांच्या इंग्लंड भेटीकडे त्याच दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. भारताच्या वाढीत भागीदार होणारे इंग्लंडसारखे मित्र आवश्यक आहेत. त्यांच्या मैत्रिपूर्ण सहकार्याने देशाची वाढ वेगाने होईल, असा विश्वास आहे. संरक्षण, आर्थिक सहकार्य तसेच जगात शांतता वाढीस लागण्यासाठी नवी जागतिक व्यवस्था मजबूत करण्यासाठी दोन्ही देश एकत्रितपणे काम करतील, अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही. त्यासाठीच संयुक्त सराव, प्रशिक्षण, क्षमतांमध्ये वाढ करण्यासाठी सहकार्याची गरज अधोरेखित करण्यात आली आहे.

भारत तसेच इंग्लंड यांच्यात व्यापार, संरक्षण तसेच तंत्रज्ञान क्षेत्रांत एकत्र काम करण्याची गरज सुनक यांनी व्यक्त केली आहे. मुक्त व्यापार करारावरील (एफटीए) वाटाघाटी लवकरच यशस्वी निष्कर्षांपर्यंत पोहोचतील, असा विश्वास सुनक यांना आहे. द्विपक्षीय संबंधांचा संरक्षण आणि सुरक्षा हा स्तंभ मजबूतच करण्याची इंग्लंडची इच्छा असून, त्याने ती आग्रहीपणे मांडली आहे. भारतीय समकक्षांसोबत व्यवसाय तसेच तंत्रज्ञान भागीदारीसाठी सरकारी पातळीवरील पाठिंबा मिळेल, असे नमूद करण्यात आले आहे. याकडे सकारात्मक घडामोड म्हणून पाहिले पाहिजे.

भारत आणि इंग्लंड यांच्यात ऑक्टोबर २०२२ पर्यंत मुक्त व्यापार कराराचा मसुदा निश्चित होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर मतभेद झाल्यामुळे, तो अद्याप अंतिम झालेला नाही. या करारातील २६ पैकी बहुतांश मुद्द्यांवर उभय देशांचे एकमत झालेले असले, तरी अल्कोहोल तसेच इलेक्ट्रिक वाहनांवरील शुल्क, व्यावसायिकांची गतिशीलता यांसारख्या महत्त्वाच्या प्रश्नांवर अद्याप एकमत झालेले नाही. दोन्ही देशांदरम्यान व्यापार करताना, जे कर आकारले जातात, ते एक तर पूर्णपणे काढून टाकणे किंवा ते कमी करणे, सेवा व्यापारांचे वाढलेले उदारीकरण, गुंतवणुकीच्या प्रवाहाला प्रोत्साहन मिळावे, बौद्धिक संपदा अधिकारांवर परस्पर सहकार्याला चालना देणे, व्यापार विवाद सोडवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणेची स्थापना ही या कराराची प्रमुख उद्दिष्टे आहेत.

दोन्ही देशांना या कराराचा महत्त्वपूर्ण आर्थिक लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. भारताला या करारातून इंग्लंडला होणारी निर्यातवाढ विशेषतः कापड, फार्मास्युटिकल्स् तसेच आयटी सेवा इंग्लंडमधून होणार्‍या थेट विदेशी गुंतवणुकीला आकर्षित करणे, तसेच रोजगाराच्या नवीन संधी आणि आर्थिक विकासाला चालना अपेक्षित आहे. इंग्लंडला या करारामुळे जगातील सर्वात मोठ्या आणि वाढत्या बाजारपेठेत प्रवेश करणे सोपे होणार आहे, भारतातून होणार्‍या आयातीच्या खर्चात बचत, तसेच भारतात जे इंग्लंडचे व्यावसायिक आहेत, त्यांच्यासाठी नवीन संधी निर्माण करणे साध्य होणार आहे. इंग्लंडबरोबरचा मुक्त व्यापार करार हा भारताच्या सर्वोच्च प्राधान्य क्रमावर आहे. सर्वसमावेशक आर्थिक सहकार्य करार, युरोपीय महासंघ, युरोपीय मुक्त व्यापार करार याचबरोबर स्वित्झर्लंड, नॉर्वे, फिनलंड आणि लिकटेंस्टिन, गल्फ कोऑपरेशन काऊंसिल यांच्या बरोबरच ऑस्ट्रेलियाबरोबर करार होणार आहेत. येत्या काही महिन्यांत भारतात निवडणुका होत आहेत. इंग्लंडमध्ये त्या २०२५ मध्ये होणार आहेत. म्हणूनच हा व्यापार करार पूर्ण करण्यासाठी दोन्ही देशांचे प्रयत्न आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राजनाथ सिंह यांनी सुनक यांच्याबरोबर थेट चर्चा केली आहे.

संरक्षण क्षेत्राच्या दृष्टिकोनातून हिंदी महासागरात उभय देशांनी परस्पर सहकार्याची भूमिका घेतली आहे, ती विशेषत्वाने महत्त्वाची घडामोड आहे. भारत-इंग्लंड यांच्यातील सुरक्षा संबंध दृढ होण्यासाठीचे ते महत्त्वाचे पाऊल ठरले आहे. संरक्षण क्षेत्रात हे दोन्ही देश एकत्र येत, अनेक नवे उपक्रम हाती घेत आहेत. त्यासाठीचे संशोधन तसेच विकास सुलभ करण्यासाठी कराराचा मसुदा करण्यात आला आहे. संरक्षण उद्योगांनाही एकत्रित करण्याचा प्रयत्न आहे. जागतिक व्यवस्थेला बळकट करण्यासाठी संरक्षण क्षेत्रात भारताला सहकार्य करण्याची इंग्लंडची इच्छा आहे. ती पुन्हा एकदा व्यक्त करण्यात आली आहे.

संरक्षण तसेच सुरक्षा सहकार्य वाढवणे, व्यापार आणि गुंतवणुकीला चालना देणे, तंत्रज्ञान हस्तांतरण तसेच संयुक्त उपक्रम राबवणे, ‘जी २०’ अध्यक्ष या नात्याने जागतिक समस्यांवर इंग्लंडकडून सहकार्याची अपेक्षा करणे; तसेच २०२१ मध्ये जे करारमदार करण्यात आले, त्यांची पूर्तता करणे हा राजनाथ सिंह यांच्या इंग्लंडवारीचा हेतू होता. त्यात ते यशस्वी ठरले, असे निश्चितपणे म्हणता येते. हा दौरा भारत-इंग्लंड धोरणात्मक भागीदारीत एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. बदलत्या जागतिक व्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर चीनचा वाढता प्रभाव कमी करण्यासाठी तसेच परस्पर हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी तो आवश्यक असाच होता.
 
संरक्षण क्षेत्रातील भारताच्या वाढत्या गरजांची पूर्तता करण्यासाठी संरक्षण तसेच सुरक्षा सहकार्य यांवर देण्यात आलेला भर हा ठळकपणे नमूद करण्यात आला आहे. त्याचवेळी संरक्षण तंत्रज्ञानासह इंग्लंडने गुंतवणुकीवर भर दिला आहे. दोन्ही देशांसाठी हे फायदेशीर असून, नव्या आर्थिक संधी उपलब्ध करून देणारी ही घडामोड. व्यापार करार अद्याप प्रत्यक्षात आलेला नाही. मात्र, हा दौरा निःसंशयपणे भारत-इंग्लंड भागीदारीचा मजबूत पाया घालणारा ठरला आहे. संरक्षण सहकार्य, आर्थिक समन्वय तसेच जागतिक नेतृत्व यांवर भर देण्यात आला आहे. भविष्यातील सहकार्यासाठीचे दरवाजे उघडणारा दौरा असेही याकडे पाहिले जाईल.
अग्रलेख
जरुर वाचा
काँग्रेस संबंधित कंपन्यांवर ईडीची टांगती तलवार, कार्यवाहीस लवकरच सुरूवात होणार

काँग्रेस संबंधित कंपन्यांवर ईडीची टांगती तलवार, कार्यवाहीस लवकरच सुरूवात होणार

ED काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांच्याशी संबंधित असणार्‍या कंपनीवर सक्तवसुली संचालनालयाने शनिवारी कार्यवाहीस सुरूवात केली. या मालमत्तेत दिल्ली, मुंबई आणि लखनऊमधील प्रमुख असणाऱ्या मालमत्तांचा समावेश आहे. काँग्रेसच्या संबंधित असणाऱ्या कंपनीशी नॅशनल हेराल्ड प्रकरणात असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड कंपनीकडे ६०० कोटी रुपयांहून अधिक किंमतीची मालमत्ता असल्याचे बोलले जात आहे. त्यापैकी देशाची राजधानी दिल्लीतून बहादूर शाह जाफर मार्गावरील प्रतिष्ठित हेराल्ड हाऊस आहे...

अजमेरमध्ये २३ वर्षांपूर्वी भारतात अवैधपणे घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

अजमेरमध्ये २३ वर्षांपूर्वी भारतात अवैधपणे घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Bangladeshi राजस्थानातील अजमेर पोलिसांनी २३ वर्षांपूर्वी भारतात घुसखोरी केलेल्या बांगलादेशी घुसखोरी व्यक्तीच्या मुसक्या आवळल्या आहेत. व्हिसाशिवाय अवैधपणे बांगलादेशी व्यक्तीने भारतात घुसखोरी केली आणि त्याला तब्बल २३ वर्षानंतर ताब्यात घेण्यात आले आहे. संबंधित अवैधपणे घुसखोरी करणाऱ्याचे नाव हे मोहम्मद शाहिद असून त्याचे वय वर्षे हे ४० आहे. तो अजमेरमधील अंदर कोट परिसरात अवैधपणे वास्तव्य करत होता. एटीएएफने एकूण अकरा कारवायांमध्ये एकूण २१ घुसखोरांना पकडले आहे. दरम्यान, आता दर्गा पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121