
MahaMTB Article - हल्दीरामची गोष्ट - एका बिकानेरी चाळीतून संपूर्ण देशात पोहोचलेला हल्दीराम ब्रँड
मोहित सोमण
बिकानेर मधील एका चाळीतून सुरू झालेला ' हल्दीराम ' चा प्रवास उल्लेखनीयच नाही तर अभूतपूर्व आहे. आज स्नॅक्स पासून भुजिया पर्यंत, स्वीटस पासून शीतपेयापर्यंत पसरलेले साम्राज्य तितक्याच ताकदीने मार्केट मध्ये उभे आहे. १९१९ मध्ये वडिलांचा व्यवसायातील यश पाहून हल्दीराम ( गंगा बिशन अग्रवाल) यांनी मेहनतीने १९३७ साली एक आलुभुजियांचे दुकान सुरू करण्याचे ठरवले. प्रथमदर्शनी हे काम आव्हानात्मक होते. याबद्दल फारशी कल्पना समाजात रूढ नव्हती. परंतु आपल्या बेसनयुक्त आलुभुजियाने लोकांना अक्षरशः वेड लावले. हळूहळू एकाची चार दुकाने पुढे नागपूर, दिल्ली, बिकानेर देशाच्या बहुतांश शहरात हल्दीराम ब्रँडची साखळी पोहोचण्यासाठी अखेर अपार कष्ट कामी आले. नमकीन बनवणे हे जणू हल्दीराम सदस्यांच्या रक्तात होते असं म्हटल तरी वावगं ठरणार नाही. हल्दीराम प्रभुजी, बिकानेरवाला, भिकाराम , चंडामल, बिकाजी, बिकानो अशा वेगवेगळ्या ब्रँडनेमच्या छत्रछायेखाली हल्दीरामचा ब्रँड सगळीकडे पोहोचला. अर्थात घर म्हटले की हेवेदावे आले त्याचदरम्यान भाऊबंदकीची झळ या कुटुंबाला लागली. आता नागपूर, दिल्ली, बिकानेर अशा तीन वेगवेगळ्या युनिट्स ची मालकी अग्रवाल भाऊबंदाकडे आहे.
वाजवी किंमतीत उत्कृष्ट पदार्थ या फंड्यामुळे त्यांची किर्ती सर्वदूर पसरली. मुख्य म्हणजे सहज कुठल्याही दुकानात चक्कर मारल्यास हल्दीराम ब्रँडचा सहज उपलब्धतेमुळे यावर लोकांच्या मनात हा ब्रँड गेले ८६ वर्ष त्याच ताकदीने घर करून उभा आहे. आजच्या घडीला हल्दीरामचा १२ कंपन्या आहेत. आर्थिक वर्ष १९ ला हल्दीरामची वार्षिक उलाढाल ७००० कोटींहून अधिक आहे. आपली प्रतिस्पर्धी हिंदुस्तान युनिलिव्हर फूड ला काटे की टक्कर देणारा हाच ब्रँड होता. २०१५ मध्ये अमेरिकेच्या FDA संस्थेने हल्दीरामच्या उत्पादनांवर बंदी घालण्याचा घाट घातला. जास्तीचा पेस्टिसाईडचा वापर असल्याचा दाखला त्यावेळी दिला गेला. भारतीय अन्नपदार्थांवर हा शाब्दिक हल्ला झाल्यानंतरही हल्दीराम डगमगले नाही. काळानुसार स्वतःला बदलत ई कॉमर्स सह सगळ्या व्यासपीठावर आपले उत्पादन पोहोचवण्याची रणनीती हल्दीरामचा कामाला आली. आज हल्दीराम म्हणजे विश्वास तितका सोपा नाही.
अचानक हल्दीराम चर्चेत येण्याचे कारण म्हणजे उद्योगजगतात टाटा कनज्यूमर प्रोडक्ट ने हल्दीराम ब्रँडला आपल्या कक्षेत घेण्यासाठी हल्दीराम बरोबर टाटा ग्रुप चर्चा करत असल्याचे वृत्त मिडियात प्रसिद्ध झाले. वास्तविक टाटा , हल्दीराम दोघांनीही हे वृत्त फेटाळले आहे. किंबहुना टाटा ग्रुपने दिलेली ऑफरहून अधिक पैशाची अपेक्षा हल्दीरामला असल्याचे वृत्त आल्याची चर्चा माध्यमात रंगली. हल्दीराम मध्ये ५१ टक्के शेअर्स होल्डिंग्स टाटाला हवे असल्याचे वृत्त रॉयटर्सने दिले होते. आर्थिक वर्ष २२ मध्ये ३६२२ कोटींचा महसूल जमवला होता.
सध्याच्या घडीला FMCG ( Fast Moving Consumer Goods) सेक्टर मध्ये विशेषतः खाद्यपदार्थांच्या मांदियाळीत हल्दीराम उत्पादनाचा १३ टक्के शेअर्सचा वाटा आहे असे युरो मॉनिटर इंटरनॅशनलने सांगितले होते. मध्यंतरी हल्दीरामचे चेअरमन मनोहर लाल अग्रवाल यांनी कंपनी चांगल्या गुंतवणूकदारांच्या प्रतिक्षेत असल्याचे सांगितले होते. शेअर बाजारातही येणाऱ्या २-३ वर्षात यासंबंधी हालचाल दिसतील असे सांगितले परंतु टाटा कनज्यूमर बाबतीतले वृत्त हल्दीराम व टाटा दोघांनी फेटाळले आहे.