राजस्थानमध्ये काँग्रेसला पडणार मोठे खिंडार? गेहलोतांनी सचिन पायलट यांना पुन्हा डावललं
07-Sep-2023
Total Views | 56
जयपूर : राजस्थान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांना पक्षाने स्थापन केलेल्या कोणत्याही निवडणूक समितीमध्ये महत्वाचे पद देण्यात आले नाही. पक्षाने बुधवारी (६ सप्टेंबर २०२३) ८ निवडणूक समित्यांची घोषणा केली. यातील कोणत्याही समितीमध्ये सचिन पायलट यांना एकाही समितीचे अध्यक्षपद देण्यात आलेले नाही.
पक्षाचा निवडणूक प्रचार करणाऱ्या प्रचार समितीचे अध्यक्षपद त्यांना मिळेल, असे सचिन पायलट यांच्या निकटवर्तीयांना वाटत होते. मात्र मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे निकटवर्तीय कॅबिनेट मंत्री गोविंद राम मेघवाल यांना या समितीचे अध्यक्ष बनवण्यात आले आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याचे म्हणणे आहे की, पक्षाने स्थापन केलेल्या निवडणूक पॅनेलवरून असे दिसून येते की, राजस्थान काँग्रेसकडून सचिन पायलट यांना डावलले जात आहे. राजस्थान काँग्रेसच्या कोअर कमिटीचे अध्यक्ष पक्षाचे प्रभारी सुखजिंदरसिंग रंधवा असतील, तर समन्वय समितीचे अध्यक्ष अशोक गेहलोत हे स्वतः मुख्यमंत्री असतील.
प्रचार समिती आणि माध्यम समितीची जबाबदारीही गेहलोत यांच्या जवळच्या मंत्र्यांना देण्यात आली आहे. जाहीरनामा समितीचे अध्यक्ष डॉ. सीपी जोशी हे राजस्थान विधानसभेचे अध्यक्ष असतील. आतापर्यंत ज्या पद्धतीने राजस्थानमध्ये सचिन पायलट यांच्यावर पक्ष कोणतीही मोठी जबाबदारी देताना दिसत नाही, त्यावरून मुख्यमंत्री अशोक गेहलोत निवडणुकीचे नेतृत्व करणार असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे भविष्यात सचिन पायलट काय भूमिका घेतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.