नवी दिल्ली : सनातन धर्म हा एचआयव्ही आणि कुष्ठरोगाप्रमाणे सामाजिक कलंक असून त्याचे उच्चाटन केलेच पाहिजे, अशी मुक्ताफळे द्रमुक खासदार ए. राजा यांनी उधळली आहेत. त्याचवेळी आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याची सारवासारव तामिळनाडू सरकारचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी केले आहे.
द्रमुकतर्फे चेन्नई येथे केंद्र सरकारच्या विश्वकर्मा योजनेविरोधात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी द्रमुकचे नेते आणि खासदार ए. राजा यांनी पुन्हा एकदा सनातन हिंदू धर्माविरोधात वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्म हा मलेरिया, डेंग्यू आणि कोरोना असून त्यास नष्ट करण्याची गरज असल्याचे म्हटले होते. मात्र, त्यांचे हे वक्तव्य अतिशय सौम्य असल्याचे माझे मत आहे. मलेरिया आणि डेंग्यूचा द्वेषाशी संबंध नाही किंवा त्यांना सामाजिक कलंक मानले जात नाही. मात्र पूर्वी कुष्ठरोग आणि अलीकडच्या काळात एचआयव्हीकडे तुच्छतेने पाहिले जात आहे. त्यामुळे सनातन धर्म हा एचआयव्ही आणि कुष्ठरोगासारखा सामाजिक कलंक असलेला रोग म्हणून पाहिला पाहिजे, असे राजा यांनी म्हटले आहे
वकील चिराग अनेजा यांनी गुरुवारी ए. राजा यांच्या वक्तव्याबाबत दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. आपल्या तक्रारीत वकील चिराग यांनी म्हटले आहे की, राजा यांनी जाणूनबुजून कट रचून सनातन धर्माची तुलना एचआयव्ही आणि कुष्ठरोगाशी केली आहे. द्रमुक नेत्याचे वक्तव्य स्पष्टपणे द्वेषपूर्ण भाषण आहे. सनातनच्या अनुयायांना धार्मिक आणि भावनिकदृष्ट्या दुखावण्यासाठीच राजा यांनी असे वक्तव्य केले आहे. यामुळे लोकांच्या भावना भडकू शकतात आणि सामाजिक-धार्मिक सलोखा आणि शांततेचे वातावरण बिघडू शकते, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
सनातन धर्मावर केलेल्या टिप्पणीवरून झालेल्या गदारोळानंतर तामिळनाडूचे क्रीडा मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी आता यावर स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, 'माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढण्यात आला असून आम्ही कोणत्याही धर्माचे शत्रू नाही.' यासोबतच त्यांनी केंद्र सरकार फॅसिस्ट असल्याचा आरोप केला नाही. त्याचवेळी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन आणि द्रमुकचे खासदार ए. राजा यांनी सनातन धर्माबाबत केलेल्या टिप्पण्यांविषयी काँग्रेस सहमत नसल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.