मुंबई (समृद्धी ढमाले): विदर्भातील सारस पक्ष्यांचे संवर्धन करण्याच्या दृष्टीकोनातुन गोंदिया वन विभाग आणि बीएनएचएसमध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे. राज्यातील सारस पक्ष्यांची संख्या सातत्याने कमी होत असुन त्यावर उपाय म्हणुन हा करार करण्यात आला आहे.
गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यामध्येच प्रामुख्याने आढळणाऱ्या सारस पक्ष्यांच्या २०२३ मध्ये झालेल्या शेवटच्या सारस गणनेत केवळ ३५ पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे. सातत्याने या पक्ष्यांच्या संख्येत घट झाल्यामुळे सारस नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. बॉंम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी आणि वनविभाग यांच्यात सारस पक्ष्यांचा अधिवास, त्यांची ठिकाणे, प्रजनानाचा काळ, स्थलांतर या गोष्टींचा अभ्यास करण्यात येणार असुन त्या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या असल्याचे कळत आहे. पक्ष्यांच्या अधिवासाला, प्रजननाला असणाऱ्या धोक्यांची कारणे शोधुन त्यावर उपाय करण्याच्या दृष्टीकोनातुन या अभ्यासाचा वापर केला जाणार आहे. या करारामध्ये अपेक्षित असलेला निधी या आठवड्यात येणे अपेक्षित असुन लवकरच त्यावर काम सुरू करण्यात येईल.
“या करारामुळे सारस पक्ष्यांचा अधिवास वाचविण्यासाठी नक्कीच फायदा होईल असे वाटते. विशेष म्हणजे या अभ्यासादरम्यान काही सारस पक्ष्यांचे सॅटेलाईट टॅगींग ही केले जाणार आहे. त्यामुळे त्यांच्या स्थलांतराविषयी ही नवीन माहिती हाती लागणार आहे.”
- किशोर रिठे
अंतरिम संचालक,
बॉंम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी