रशियासह चीनचे राष्ट्राध्यक्ष ‘जी २०’ परिषदेला उपस्थित राहणार नसल्याने फारसा फरक पडत नसल्याचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर ठामपणे सांगतात. ही परिषद म्हणजे राजकीय आखाडा नाही, असेही ते ठळकपणे नमूद करतात. असे परखडपणे सांगणारा हा नवा भारत आहे. विकसित राष्ट्रांची मनधरणी आपण करणार नसल्याचे, तो कृतीतून दाखवून देतो. संपूर्ण जगाला भारतात होणार्या या परिषदेतून काही साध्य करून घ्यायचे आहे. जगभरातील नेत्यांचा भारताबद्दलचा हा बदललेला दृष्टिकोन अभिमानास्पद असाच!
"'जी २०’ शिखर परिषद हा राजकारणासाठीचा आखाडा नाही, याचे भान सर्वांनीच राखले पाहिजे. जगातील १८० देश मोठ्या अपेक्षेने आपल्याकडे पाहत आहेत, हे विसरता कामा नये,” अशा शब्दांत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी चीनसह रशियालाही खडे बोल सुनावले. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन तसेच चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग ‘जी २०’ शिखर परिषदेला अनुपस्थित राहत असल्याने जयशंकर यांनी त्यांना कानपिचक्या दिल्या आहेत. जिनपिंग यांची अनुपस्थिती, ही नवी गोष्ट नाही, भूतकाळातही अशा घटना घडल्या आहेत, असे ते सांगतात. भारताचा परराष्ट्रमंत्री रशिया, चीन यांच्या उपस्थितीची फारशी गांभीर्याने दखल घेत नाही, हे चित्र अचंबित करणारे आणि हा नवा भारत आहे, हे अगदी प्रकर्षाने अधोरेखित करणारे. रशियासह जगभरातील प्रमुख देशांच्या नेत्यांना भारतात होणार्या या शिखर परिषदेतून काही साध्य करायचे आहे, नव्हे भारत ते करून देईल, हा विश्वास त्यांना आहे. म्हणूनच अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बायडन हे आवर्जून या परिषदेला उपस्थित राहणार आहेत.
अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत विकसित राष्ट्रांनी भारताला भेट द्यावी, यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न केले जायचे. त्यांच्याकडून भारताला काय मिळेल, यासाठी अंदाज बांधले जायचे. एखादी गुंतवणूक, थोडीफार आर्थिक मदत मिळाली की, तो दौरा सार्थकी लागला, असे मानले जायचे. या पार्श्वभूमीवर ‘जी २०’ शिखर परिषदेचे आयोजन करणारा, संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेणारा, त्यांच्या अपेक्षांची पूर्तता करणारा देश म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची प्रतिमा उदयास आली आहे. भारत बदलतोय म्हणूनच हे सारे घडून येत आहे. प्रथमच ‘जी २०’ शिखर परिषदेचे आयोजन करीत असलेल्या भारताकडून भविष्यासाठी आशा आणि आशावादाचा संदेश मिळेल, अशी अपेक्षा अर्थातच आहे. भारत जगासाठी असलेली आपली बांधिलकी आणि एक जबाबदार जागतिक नागरिक म्हणून आपली भूमिका ठळकपणे मांडेल.
‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ या संकल्पनेवरच ही शिखर परिषद भरवली जात आहे. हवामान बदल, शाश्वत विकास आणि जागतिक आरोग्य यांसह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर यात चर्चा होणे अपेक्षित. भारताला या माध्यमातून आपली शक्तिस्थाने जगासमोर मांडण्याची सुवर्णसंधी मिळालेली आहे. जगातील सर्वात वेगाने वाढणार्या अर्थव्यवस्थांपैकी एक देश तसेच जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रमुख खेळाडू, ही नव्या भारताची प्रस्थापित झालेली ओळख. जागतिक शांतता आणि सुरक्षेसाठीही भारताचे असलेले योगदान लक्षणीय असेच. आपले सामर्थ्य दाखवून देण्याबरोबरच अन्य देशांसोबतचे संबंध दृढ करण्यासाठीची भारताला मिळालेली ही मोठी संधी, असेही म्हणता येईल. म्हणूनच या शिखर परिषदेचा उपयोग नवनव्या भागीदारी करण्याबरोबरच न्याय्य जगाच्या दृष्टिकोनाला चालना देण्यासाठी करणे अपेक्षित आहे.
भारत एक वाढती आर्थिक शक्ती आणि जबाबदार जागतिक देश आहे, तो बहुपक्षीयता आणि आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी वचनबद्ध आहे, हवामान बदलाविरोधातील लढाईत त्याची भूमिका कळीची राहील, शाश्वत विकासाचा तो सर्वात मोठा घटक आहे, भारत हा वैविध्यपूर्ण आणि सर्वसमावेशक आहे, त्याचवेळी तो जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचे प्रतिनिधित्व करतो, हे जगाला नेमकेपणाने सांगितले गेले आहे. भारत बदलत आहे. अत्यंत वेगाने त्यासाठीच्या घटना घडत आहेत. भारताबद्दल पाश्चात्यांनी जे चुकीचे चित्रण केले होते, ते निश्चितपणे बदलण्याचे काम गेल्या नऊ वर्षांत घडले आहे. हा नवा भारत विकासाची कास धरणारा, आत्मविश्वासाने भरलेला आणि समृद्ध असाच आहे. हा बदल भारतीय जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये प्रतिबिंबित झालेला दिसून येतो. अर्थव्यवस्था वेगाने वाढत असून, मध्यमवर्गाचा विस्तार होतो आहे. पायाभूत सुविधांसाठी सर्वात जास्त निधी येथे खर्च केले जात आहेत. नवीन तंत्रज्ञानाचा प्रत्येक क्षेत्रात अवलंब केला जात आहे.
एकविसाव्या शतकातील आर्थिक तसेच राजकीय महासत्ता म्हणून भारताची दृढपणे होत असलेली वाटचाल तेच सांगते. काही दशकांपूर्वीचा भारत आणि नवा भारत संपूर्णपणे वेगळा आहे. १९९१ मध्ये केवळ २० टक्के इतकेच भारतीय मध्यमवर्गात असल्याचे मानले जात होते. आज ती संख्या ५० टक्के इतकी झाली आहे. हा वाढणारा मध्यमवर्ग आर्थिक वाढीला, वस्तू आणि सेवांच्या मागणीला चालना देतो. देशातील पायाभूत सुविधांमध्ये होत असलेल्या सुधारणा यादेखील तितक्याच थक्क करणार्या अशाच आहेत. भारतीय एकमेकांशी तसेच संपूर्ण जगाशी ‘कनेक्ट’ होण्यासाठी स्मार्टफोन, इंटरनेट आणि अन्य तंत्रज्ञानाचा वापर करीत आहेत. भारतीयांचा स्वतःकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात झालेला बदल हा अधिक महत्त्वाचा म्हणायला हवा.
नव भारतीयांना त्यांच्या वारशाचा, संस्कृतीचा यथार्थ अभिमान आहे. नवा भारत ही अशी शक्ती आहे, जिला विचारात न घेता, जगातील कोणताही देश निर्णय घेऊ शकत नाही. समृद्ध इतिहास आणि संस्कृती, वाढती अर्थव्यवस्था आणि तरुण, गतिमान लोकसंख्या असलेला असा हा देश. भारताच्या परिवर्तनाची ही गाथा निश्चितच अचंबित करणारी आहे. त्याचवेळी संपूर्ण जगासाठी ती प्रेरणादायी आहे. म्हणूनच वसाहतवादी मानसिकतेला तो झुगारून देतो. ‘भारत’ अशी स्वतःची ओळख तो सर्वांनाच करून देतो आहे. ‘भारत’ या नावाला मोठा इतिहास असून, देशाच्या प्राचीन हिंदू संस्कृतीशी तो संबंधित आहे.
‘जी २०’ शिखर परिषदेच्या निमित्ताने भारताने वसाहतवादी ‘इंडिया’ला मोडीत काढले आहे. ‘जी २०’ शिखर परिषदेच्या निमित्ताने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ‘भारत’ असा उल्लेख असलेली निमंत्रणपत्रिका पाठवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ‘भारताचे पंतप्रधान’ असा स्वतःचा उल्लेख केला आहे. या पार्श्वभूमीवर जयशंकर यांनी संविधानात ‘भारत’ असाच उल्लेख असल्याचे नमूद करीत त्यावर शिक्कामोर्तब केले आहे, इतकेच!