कोप आरोपणा ते नसावी...

    06-Sep-2023   
Total Views |
Article On Human anger needs restraint

सर्वसाधारणपणे कोप येण्यासारखे म्हणजेच आपल्या मनाविरुद्ध बाह्य परिस्थिती निर्माण झाली, तर राग आवरता येत नाही. बाहेरची परिस्थिती आपल्या हातात नसते, त्यामुळे रागही आपल्या हाती नसतो, असे सकृददर्शनी वाटते. तथापि क्रोध, माणसाचे किती नुकसान करतो हे समजले तर संयमाने क्रोध हाताळता येतो.

स्वैरपणा हा मनाचा स्वभाव असल्याने ते क्षणभरही स्थिर राहात नाही. जागेपणाचे तर सोडाच, पण झोपेत शरीर निद्रिस्त झाल्यावरही स्वप्नांच्या दुनियेत ते माणसाला भटकवत ठेवते. तथापि या मनाला आवर घालण्यासाठी आपल्या आचारपद्धतीत नियमितता आणून त्यात काही बदल करावे लागतात. यासाठी स्वामींनी मागील श्लोेकांतून काही तत्कालीन आचार क्रियांचा पाठपुरावा करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. चंचल मनाला शिस्त लावण्यासाठी प्रथम अशी सवय लावून द्यावी की, आपले बोलणे आणि वागणे यात अंतर नसावे. बोलल्याप्रमाणे आपले आचरण राहील, ही सवय मनाला लावून द्यावी. त्यानंतर आपली नित्यनैमित्तिक क्रियाकर्मे चोखपणे बजावण्याची सवय मनाला लावून द्यावी.

सतत भटकत राहण्याच्या सवयीने स्थानभ्रष्ट झालेल्या मनाला विवेकाने आवर घालून त्याला निवांत अशा मूळ जागी आणण्याचा प्रयत्न करावा (विवेकें मना आवरी स्थानभ्रष्टा।) अशा स्थितीत भूतमात्रांशी प्रेमळपणे वागले, तर त्या मनात रामभक्तीची आवड निर्माण होते. असाच जीव निरंतर सुख-संतोष अनुभवू शकतो, हे आपण मागील श्लोकांच्या विवरणात पाहिले आहे. हे सारे, उपपत्ती म्हणजे सिद्धान्त स्वरूपात (theory) पाहिले, आता ते सिद्धान्त अमलात आणताना (practical) कसे वागावे, हेही तितकेच महत्त्वाचे आहे. यात समस्या निर्माण होऊ नयेत म्हणून कोणती पथ्ये पाळावी लागतात, ते आता स्वामी पुढील श्लोकात सांगत आहेत-

मना कोप आरोपणा ते नसावी।
मना बुधि हे साधुसंगीं वसावी।
मना नष्ट चांडाळ तो संग त्यागी।
मना होई रे मोक्षभागीं विभागी ॥ १०७॥
स्वामींनी या श्लोकात ‘क्रोध’ या शब्दासाठी ‘कोप’ या अर्थपूर्ण शब्दाचा प्रयोग केला आहे. कोप या शब्दातून राग, द्वेष, मत्सर, संताप, आदळआपट, त्रागा हे सर्व भाव एकाच वेळी व्यक्त होतात. असा हा कोप मनात निर्माण होणार नाही याची आपण काळजी घ्यावी, असे स्वामींना सांगायचे आहे. कोप निद्रिस्त अवस्थेत मनाच्या कोपर्‍यात पडून असतो. त्याला जागे करू नये, असे स्वामींना सांगायचे आहे. सर्वसाधारणपणे कोप येण्यासारखे म्हणजेच आपल्या मनाविरुद्ध बाह्य परिस्थिती निर्माण झाली, तर राग आवरता येत नाही. बाहेरची परिस्थिती आपल्या हातात नसते, त्यामुळे रागही आपल्या हाती नसतो. असे सकृददर्शनी वाटते. तथापि क्रोध, माणसाचे किती नुकसान करतो हे समजले तर संयमाने क्रोध हाताळता येतो. स्वामींना या ठिकाणी सांगायचे आहे की, क्रोध आला तरी त्याचा आविष्कार किंवा रागाचे प्रकटीकरण टाळायला हवे. (मना कोप आरोपणा ते नसावी।) क्रोधाला प्रयत्नपूर्वक आवरण्याचा उपदेश भगवद्गीतेत केलेला आढळतो. भगवंत गीतेत म्हणतात की, काम, क्रोध व लोभ ही आत्म्याचा नाश करणारी नरकाची तीन दारे आहेत-

त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाशनमात्मनः
काम क्रोध तथा लोभस्तस्मादेतत्त्रयंं त्यजेत ॥ (१६-२१)
काम, क्रोध, लोभ ही नरकाची द्वारे आहेत, असे भगवद्गीता सांगते- त्यापैकी एक जरी दार उघडले तरी आत्मविनाशक नरकाकडे जावे लागते. यात क्रोधाचा दुसरा नंबर असला तरी परिणाम तोच आहे. गीतेत असेही सांगितले आहे की, क्रोधाने मनाची अवस्था संमोहित होते. अशा अवस्थेत आपण काय बोलतो, काय करतो याचे भान राहात नाही. स्मृतिभ्रंश होतो. स्मृतीच्या गोंधळलेल्या स्थितीत बुद्धी काम करीत नाही. मग सर्वनाश होतो. (गीता २.६३) यासाठी क्रोध उत्पन्न होऊ देऊ नये. हे मनस्वास्थ्यासाठी पथ्य स्वामींनी मनाच्या श्लोकात सांगितले आहे.

सर्वसाधारणपणे मनात क्रोध उत्पन्न झाला तरी त्याला आवरून धरण्याचा संयम फारच थोड्या लोकांकडे असतो. आपण लगेच राग व्यक्त करतो, अशावेळी संयम पाळावा हे ठीक, पण काही वेळा परिस्थितीच अशी निर्माण होते की आपला संयम फार काळ टिकत नाही. मंदिरात देवदर्शनाला जाण्यासाठी रांगेत उभे राहाण्याचा प्रसंग आला, तर शांतपणे देवळाच्या गाभार्‍यात जाण्यासाठी आपला नंबर केव्हा येतो, याची वाट बघायची असे मी ठरवतो. काही लोक मुद्दाम गोंधळ करून पुढे जाण्याचा प्रयत्न करतात किंवा कोणी ओळख काढून मध्येच आपली चार-पाच माणसे घुसवतो. अशावेळी राग व्यक्त न करता शांत राहण्याचा प्रयत्न करावा लागतो. पण, काहीवेळा आपला क्रोध अनावर होतो, असा एक प्रसंग भी अनुभवला तो थोडक्यात सांगतो. सुमारे ४० वर्षांपूर्वी दक्षिण भारतातील एक प्रसिद्ध मंदिर पाहायला व देवदर्शनाला गेलो होतो.

दक्षिणेकडील देवळात कर्मठपणा असतो. तो त्यावेळी जास्त होता. त्यांच्या पद्धतीप्रमाणे लुंगी लावल्याशिवाय देवळात प्रवेश नसतो. देवळाच्या आवारातील दुकानात एक वेष्टी (पांढरी लुंगी) मी विकत घेतली. तेथे कपडे ठेवायची सोय असते. वेष्टी गुंडाळून उघड्या अंगाने देवदर्शनासाठीच्या रांगेत उभा राहिलो, रांग हळूहळू पुढे सरकत होती. व्यवस्थापकांची अरेरावी, देवदर्शनासाठी पैसे भरून तिकीट, कसलीही सोय नाही, हे सारे चीड उत्पन्न करणारे होते. पण, न चिडता शांतपणे देवदर्शन घ्यायचे असे मी ठरवले होते. आता माझ्यापुढे फक्त १०-१२ माणसे होती. तितक्यात मंदिराच्या आवारात एक टुरिस्ट बस आली. त्यातून परदेशातून आलेली गोरीपान माणसे पाश्चात्य पोशाखात असलेली उतरली. त्यात पँन्टशर्ट घातलेल्या युवतीही होत्या. दर्शनार्थींची रांग थांबवण्यात आली आणि या परदेशी पाहुण्यांना त्यांच्याच पोशाखात मंदिरात सोडण्यात आले.

अशावेळी संयम ठेवून रागाचा आविष्कार थांबवता येईल का? आपल्याकडेही महाराष्ट्रात कोणी मंत्री, व्हीआयपी आला तर रांग थोपवून त्यांना प्राधान्य दिले जाते. हे सारे मन:शांती बिघडवणारे असते. पण, तरीही क्रोध आवरायला शिकावे लागते. हे शिक्षण आपल्याला संत संगतीत मिळते. आपली बुद्धी साधुसज्जन यांच्या संगतीत ठेवावी, असे स्वामी सांगतात. आपल्या जीवनात संगतीला फार महत्त्व आहे. सत्संगतीने मन शांत होऊन भगवंताच्या निकट जाण्याचा ते प्रयत्न करते. यापुढील श्लोकांतही स्वामींनी ’धरी सज्जनसंगती धन्य होसी’ आणि ’अती आदरे सज्जनांची संगत करावी’ असे सांगितले आहे. दुष्ट, चांडाळ अशांची संगती कधीही करू नये, असे केले तरच तुम्ही मोक्षाचे धनी व्हाल, अन्यथा क्रोधाच्या आहारी, वाईट संगतीत या अमूल्य जीवनाचा नाश होईल. माणसाने त्यापासून सावध राहावे. येथे विवेकाचा, सदाचरणाचा संदेश देणार्‍या श्लोकांचा गट संपतो. यानंतर स्वामी काही हितकारक गोष्टी पुढील श्लोकांपासून सांगायला सुरुवात करणार आहेत.

७७३८७७८३२२

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

सुरेश जाखडी

दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये 'समर्थांच्या पाऊलखुणा' या सदराचे लेखक, 'एम.ए'पर्यंत शिक्षण, समर्थ वाङ्मयाचे अभ्यासक, रिझर्व्ह बँकेतून निवृत्त अधिकारी..