जागतिक तापमान वाढ ही जगाला भेडसावणारी सर्वांत मोठी वैश्विक समस्या.याच संदर्भात आणखीन चिंतेत भर टाकणारा एक जागतिक अहवाल नुकताच समोर आला आहे. ‘एल निनो’ आणि ‘ला निना’ या हवामानाशी निगडित दोन महत्त्वाच्या संज्ञा. या अहवालात ‘एल निनो’ आणि ‘ला निना’ यांच्या कालावधीत वाढ होणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. ती कशी, हे समजून घेण्याआधी ‘एल निनो’ आणि ‘ला निना’ या संज्ञा आधी थोडक्यात समजून घेऊया.
जागतिक पर्यावरणावर आणि एकूणच वातावरणावर परिणाम करणार्या ‘एल निनो’आणि ‘ला निना’ या दोन हवामान स्थिती आहेत. प्रशांत महासागरातील पाण्याचे तापमान काही ठरावीक कालावधीमध्ये झपाट्याने वाढते. त्याचा परिणाम म्हणून महासागरातील वारे अतिशय वेगाने वाहू लागतात. प्रशांत महासागराच्या पश्चिमेस हवेचा दाब नेहमीपेक्षा उच्च तर पूर्वेस अतिशय कमी असतो. या स्थितीत समुद्रातील पाणी अतिशय उष्ण होते. यालाच, ‘एल निनो’ असे म्हणतात. साधारणपणे डिसेंबर महिन्याच्या कालावधीत ही स्थिती उद्भवत असल्यामुळे याला ‘एल निनो’ असे नाव देण्यात आले आहे, तर अगदी याउलट परिस्थिती म्हणजे मध्य व पूर्व प्रशांत महासागरातील पृष्ठभागाच्या पाण्याचे तापमान कमी होऊन, उलट दिशेने वारे वाहू लागतात त्याला ‘ला निना’ असे म्हणतात.
‘एल निनो’चा कालावधी सुरू झाल्यानंतर सामान्यपणे नऊ ते बारा महिने तो चालतो. आणि तसंच ‘ला निना’चे ही. मात्र, चिंतेची बाब अशी की, यंदा ‘ला निना’ची स्थिती सलग तीन वर्ष सुरू होती, तर आता ‘एल निनो’ स्थिती सुरू होण्याचा कालावधी येणार आहे. याबद्दलचा अहवाल आंतरराष्ट्रीय नेचर जर्नलमध्ये नुकताच प्रकाशित करण्यात आला आहे. अशा प्रकारच्या बहुवर्षीय स्थितीचा (एकच स्थिती अनेक वर्ष) सामना येत्या काळात अनेकदा जगाला सहन करावा लागणार आहे, असे या अहवालात सांगण्यात आले आहे.
‘एल निनो’ काय किंवा ‘ला निना’ काय, कोणतीही हवामान परिस्थिती जर दीर्घकाळ राहिली, तर त्याचे दूरगामी परिणाम होणार, हे नक्की. अधिक काळ तापमान वाढ त्या त्या परिसरातील जैवविविधतेवर परिणाम करेल किंवा अतिशीत तापमान हे ही जैवविविधतेतील अनेक घटकांवर परिणाम करणार आहेच.
कुठेतरी प्रशांत महासागरात घडणार्या वातावरणीय बदलाचा भारतासहीत संपूर्ण जगावर परिणाम होतो असे सांगितले, तर नवल वाटू नये. ऐतिहासिक नोंदी पाहता १८७१ नंतर भारतात पडलेल्या दुष्काळांपैकी सहा दुष्काळ ‘एल निनो’मुळे पडले आहेत. यात २००२ आणि २००९ सालच्या दुष्काळांचाही यामध्ये समावेश आहे. ‘एल निनो’चा परिणाम भारताच्या कृषी अर्थव्यवस्थेवरही दिसून येतो. तेलबिया, तांदूळ, कापूस, ऊस अशा उन्हाळी पिकांवर परिणाम होऊन त्यांचे उत्पादन कमी होते. सध्या महाराष्ट्रासह देशभरातही त्याचे परिणाम दृष्टिपथास पडतात.
देशाच्या एका भागात अतिवृष्टी आणि दुसर्या भागात पावसाचा थेंबही नाही, अशी ही परस्परविरोधी परिस्थिती. त्यामुळे कोरडा दुष्काळ आणि ओला दुष्काळ यांचा अनुभव एकाच वेळी देशाच्या, जगाच्या कानाकोपर्यात येताना दिसतो. साहजिकच अर्थव्यवस्थेलाही त्याचा फटका बसलेला दिसून येतो. ‘एल निनो’ ते ‘ला निना’पर्यंत जाण्यासाठीचे अभिसरण किंचित कमी झाले आहे. यातून हे सूचित करते की, बहुवर्षीय हवामान पद्धती वाढण्याची शक्यता आहे, असे निरीक्षण संशोधकांनी नोंदवले आहे. निसर्गामध्ये मानवाचा झालेला अतिरेकी हस्तक्षेप हे मूळ कारण संशोधकांनी या अहवालात सांगितले आहे.
पृथ्वी ही मुळातच उत्क्रांतीशील आहे. याही परिस्थितीत ती जुळवून घेऊन उत्क्रांत होईलच. पण, त्या प्रक्रियेमध्ये अनेक छोटे मोठे आणि विघातक गोष्टी घडू शकतात, याचे आपण साक्षीदार आहोतच. दूरगामी परिणाम नियंत्रणात आणायचे असतील, तर यावर गांभीर्याने विचार करून कृती करण्याची गरज आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, याविषयी जनजागृती करणे हिच आताची प्राथमिक गरज आहे, तरच आपण याचे परिणाम नियंत्रणात आणू शकू.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.
लेखिका रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेच्या पदवीधर आहेत. सध्या दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये पर्यावरण प्रतिनिधी म्हणून कार्यरत. यापूर्वी विविध 'ह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज', मुलाखती आणि इतर वार्तांकनासाठी काम. आवाज आणि सूत्रसंचालन या क्षेत्रांमध्ये काम आणि विशेष आवड.