नाशिकजवळील अंजनेरी डोंगरावरील जैवविविधतेच्या संरक्षणासाठी गेली अनेक वर्षं संशोधनासह विविध स्वरुपात कार्य करणार्या निसर्गप्रेमी प्रतीक्षा कोठुळे यांचा स्तुत्य प्रवास!
प्रतीक्षा सिद्धेश्वर कोठुळे मूळच्या नाशिकच्या. त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण रासबिहारी इंटरनॅशनल स्कूल येथे झाले. कोठुळे परिवार निसर्ग आणि पर्यावरणप्रेमीच. साहजिकच प्रतीक्षा यांच्यावर हाच संस्कार झाला. बालपणापासूनच त्यांना त्यांचे आईवडील निसर्गाच्या सान्निध्यात नेत असत. बालपणीच्या निसर्गप्रेमाचा हाच संस्कार पुढे प्रतीक्षा यांच्यासाठी करिअरचा मार्ग प्रशस्त करुन गेला. प्रारंभी पुण्यात गरवारे महाविद्यालयामध्ये ‘बायोटेक्नोलॉजी’ विषय घेऊन ‘बीएससी’ पूर्ण केल्यानंतर प्रतीक्षा यांनी जैवविविधता विषय घेऊन ‘एमएससी’ला प्रवेश घेतला. त्यामधून त्यांना पशुपक्षी, जैवविविधतेबद्दल शास्त्रोक्त ज्ञान मिळत गेले. जी आवड होतीच, त्यालाच शास्त्रीय ज्ञानाचे कोंदण मिळाल्याने प्रतीक्षा यांची पर्यावरण, निसर्ग अभ्यास फुलत गेला. वनस्पती, फुले, प्राणी, फुलपाखरे, जंगली फुले याबद्दल त्यांची रुची आणि आवड कालपरत्वे अधिकच वाढत गेली.
एमएससी उत्तीर्ण झाल्यानंतर त्या ‘इंटर्न’ म्हणून राजस्थान येथील तालचॅपर अभयारण्यात काळविटांवर अभ्यास करण्यासाठी गेल्या. ‘काळविटांचे भक्षण करणार्या जंगली प्राण्याची संख्या कमी झाल्यामुळे काळविटांची संख्या कशी वाढली, यासह काळवीट प्रजननासंबंधित त्यांनी विपुल अभ्यास केला. शिक्षण सुरू असतानच सुट्टीमध्ये पक्षीतज्ज्ञ बिश्वरूप रहा यांच्याकडे त्या मार्गदर्शन घेण्यासाठी गेल्या आणि रहा यांच्या ‘नेचर कन्झर्वेशन सोसायटी ऑफ नाशिक’ संस्थेत सदस्य म्हणून प्रत्यक्ष काम करू लागल्या. तिथे पर्यावरण, पक्षी निरीक्षण नाशिकच्या जैवविविधता याचा अभ्यास होत गेला. सृष्टीसंवर्धनासाठी वनवासी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी पर्यावरण, निसर्गाची आवड निर्माण करणे, वनविभागाच्या अधिकार्यांसोबत वन्यजीवांच्या संरक्षणासाठी काम करणे, यांसह गिधाडांवर त्यांनी अभ्यास केला.
बी. रहा यांनी पक्ष्यांसाठी विशेषतः गिधाडे वाचवण्यासाठी जी व्यापक चळवळ उभी केली, त्यामध्ये प्रतीक्षा यांनी सहभाग घेऊन ज्ञान व अनुभव घेतला. २०१३ ते २०१७ या काळात प्रतीक्षा यांनी बी. रहा यांच्या संस्थेत सदस्य म्हणून काम केले. पुढे त्यांच्या स्वयंसेवी संस्थेत प्रकल्प समन्वयक म्हणून पूर्ण वेळ रुजू झाल्या. दरम्यान, वनविभाग आणि बी. रहा यांची संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने गिधांडाचे निरीक्षण उपक्रमात वनविभागाने घेतला, त्यातही सहभाग घेण्याची संधी त्यांना मिळाली. नाशिकमध्ये गिधाडे सुरक्षित क्षेत्र घोषित करण्याच्या प्रकल्पात मुख्य संशोधक म्हणूनही त्यांनी काम केले. ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’तर्फे आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमात गिधाड अभ्यासक तसेच पर्यावरणतज्ज्ञ डॉ. विभू प्रकाश माथूर यांच्या मार्गदर्शनात झालेल्या कार्यशाळेत प्रतीक्षा यांनी पूर्ण केली. दरम्यान, डॉ. माथूर यांच्याच मार्गदर्शनाखाली नाशिकमधील दोन आजारी गिधाडांची सुटका, उपचार करून त्यांना पायात ओळखीसाठी रिंग लावण्यात आली. त्या चमूमध्ये प्रतीक्षा यांनी समन्वयक म्हणून योगदान दिले.
नाशिकजवळील महाराष्ट्रातील पहिले ‘राखीव क्षेत्र’ असा मान मिळालेल्या बोरगड येथील जंगलात प्रतीक्षा यांनी दीर्घकालीन वनसंवर्धनात भाग घेतला. तुंगलदरा येथील आजूबाजूच्या परिसरातील वनवासींसाठी वनविभाग आणि संस्थेच्या कामात त्यांनी सहभाग घेतला. “मुलांना पर्यावरण, निसर्ग यांविषयी प्रेम, आस्था निर्माण झाली, तर ही पुढची पिढी तिचे संगोपन, काळजी नक्कीच जबाबदारीने घेईल. मुलांना आवडणार्या गोष्टींना ते कधीच हानी, नुकसान पोहोचवत नाही. यासाठी मुलांमध्ये निसर्गप्रेम, पर्यावरण संर्वधन, पशुपक्ष्यांबद्दल आस्था निर्माण करणे गरजेचे आहे,” असे प्रतीक्षा सांगतात. तज्ज्ञ व्यक्ती, बुद्धिजीवी शास्त्रज्ञांनी पर्यावरण, निसर्ग, पशुपक्ष्यांसाठी केलेले संशोधन सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवणे, त्यासाठी मध्यस्त म्हणून हेच ज्ञान साध्या सोप्या भाषेत नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य अवितर करणार असल्याचे प्रतीक्षा सांगतात.
नाशिकमध्ये जिथे कुठे पर्यावरणाला धोका होईल, असा प्रश्न निर्माण होतो, तिथे प्रतीक्षा अग्रभागी असतात. अंजनेरी येथील डोंगराच्या माथ्यांवर रस्ता निर्माण केला जाणार होता. त्याला विरोध करून जी चळवळ उभी राहिली, त्यामध्ये प्रतीक्षा यांनी अग्रभागी राहून विरोध केला. अंजनेरी येथील डोंगर उतारवर भरपूर झाडी आहे. तेथे गिधाडांसह दीडशे प्रकारचे पक्षी आढळतात. परिशिष्ट एकमधील संरक्षित पांढर्या पाठीचा गिधाड, लांब चोचीचा गिधाड, राज्य पक्षी हरियाल, बहिरी ससाणा आदी पक्षी आढळतात. ते वाचवण्यासाठी प्रतीक्षा प्रयत्नशील आहेत. पर्यावरण वाचवण्यासाठी ‘ब्रह्मगिरी-अंजनेरी रोप वे’ प्रकल्प होऊ नये, याकरिता अनेक पर्यावरणप्रेमींची एकत्रित चळवळ उभी राहिली आहे. त्यातही प्रतीक्षा मोठे योगदान देत आहे.
नाशिकच्या जैवविविधतेबद्दल नोंदी, माहिती आज पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही. त्या माहितीच्या संकलन, संग्रहासाठी पुस्तक, जर्नल नोंदी प्रसिद्ध करून तिचे कायमस्वरुपी दस्ताऐवजीकरण करण्याचा प्रतीक्षा यांचा मानस आहे. त्यांच्या या आणि एकूणच स्वप्नांसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा!
निल कुलकर्णी