आज एक नवीन मराठी चित्रपट पाहण्यात आला. चित्रपटाचं थोडं अतरंगी टायटल आहे. ’तीन अडकून सीताराम’ हे या चित्रपटाचे नाव! हा एक अतिशय वेगळ्या धाटणीचा चित्रपट. या प्रकारचा सिनेमा मराठीमध्ये यापूर्वी प्रदर्शित झाला असेल, असे वाटत नाही. खरं म्हणजे, हिंदीमध्ये सुद्धा असा सिनेमा मी पाहिलेला नाही. या चित्रपटाचे दिग्दर्शक ऋषिकेश जोशी. ते एक उत्तम दिग्दर्शक असून स्वतः एक उत्कृष्ट अभिनेतेदेखील आहेत. ’हटके’ सिनेमे देण्यासाठी ते नावाजलेले. त्यांनी आणि त्यांच्या संपूर्ण टीमने हा एक अतिशय सुंदर आणि मस्त सिनेमा आपल्यासाठी आणला आहे. या सिनेमात वैभव तत्ववादी, संकर्षण कर्हाडे, आलोक राजवाडे या तिघांनी तरुण आणि अवखळ त्रिकुट मस्त सादर केले आहे.
त्यांच्या बरोबर आनंद इंगळे आणि इतरही मान्यवर कलाकार आहेत. अभिनेत्री प्राजक्ता माळीने फारच छान काम केलंय. एक मॉडर्न आणि अॅटिट्यूड असलेली सुंदर तरुणीची भूमिका तिने उत्तम सादर केली आहे. तसंच दुसर्या एका अभिनेत्रीचाही विशेष उल्लेख करावा लागेल, ती म्हणजे गौरी देशपांडे. तिने वेगवेगळ्या परिस्थितीत निभावलेल्या भूमिका सिनेमा पाहताना अतिशय ‘कन्विन्सिंग’ अनुभव देऊन जातो. स्वतः दिग्दर्शक हृषिकेश जोशीदेखील एका अफलातून भूमिकेत येऊन एकच धमाल उडवून देतात!
पण, या सिनेमाचे मुख्य वैशिष्ट्य सांगायचे तर हा सिनेमा सस्पेन्स व कॉमेडीचा उत्तम मिलाफ आहे आणि त्यामध्ये अतिशय वेगवान रीतीने घटना घडतात आणि त्यासुद्धा एका अनपेक्षित वळणाने आपल्याला सदिव चकित करतात. त्यातील ‘अॅक्शन’मध्ये तुमच्या मनात असलेली घटना वेगळ्याच रूपाने समोर येते. त्यामुळे प्रेक्षक सिनेमात संपूर्ण वेळ गुंतून राहतो.
तीन तरुण मुलं आणि एक तरुणी यांच्यावर ओढवलेले एकामागून एक भयंकर प्रसंग, हे या सिनेमाचं मुख्य कथानक आणि हा सिनेमा आजच्या तरुणाईवर आधारित असल्यामुळे भारताचे उसळते तारुण्य आणि त्यांची ’डेव्हिल मे केअर अॅटीट्यूड’, ‘देखा जायेगा, निपट लेंगे’ हे फार चांगल्या तर्हेने दाखवले आहे. आजच्या तरुणाईला हा सिनेमा अतिशय आवडेल. त्यात या चित्रपटाचं बहुतांश शूटिंग इंग्लंडमध्ये झालं आहे आणि त्यात फार सुंदर लोकेशनस् पाहायला मिळतात. त्यात पुन्हा गंमत म्हणजे, इंग्लंडचे एकाकाळचे संपन्न साम्राज्य आणि आता अगदी मोडकळीला आलेला देश, तो भाग सुद्धा या चित्रपटात अतिशय चांगल्या आणि हळुवार पद्धतीने मांडलेला आहे.
सिनेमामधला उपहास आणि त्यातून निर्माण झालेला विनोद हे तर एका उच्च दर्जाचा अनुभव देतात. अगदी त्या राजकीय पक्षांना दिलेली नावे - केएलपीडी आणि बीसीएमसी ही सुद्धा आपल्याला प्रचंड हसायला लावतात. हा सिनेमा त्यातल्या उत्तम कथानक, अतिशय वेगवान आणि चांगल्या प्रतीचे दिग्दर्शन यामुळे तसा लक्षवेधी ठरावा. तसेच या चित्रपटात संगीताचा बाजसुद्धा फार चांगला सांभाळला गेला आहे. या चित्रपटातील शेवटचं जे गाणं आहे- ’दुनिया गेली तेल लावत’ ते सुद्धा अतिशय छान जमलेलं आहे. एका अर्थाने हा सिनेमा म्हणजे, आजच्या भारताचा तारुण्याचा अविष्कार आहे, असेच म्हणता येईल.
प्रत्येक सिनेमा ज्या काळात तो तयार झालेला असतो, एका अर्थाने त्या काळाचे प्रतिनिधित्व करतो. एक उदाहरण सांगतो. १९५३ साली एक अतिशय उत्तम चित्रपट आला होता ’दो बिघा जमीन.’ हा सिनेमा फारच उत्कृष्ट होता आणि अतिशय करुण होता. ती कहाणी फारच दुःखभरी होती. परंतु, त्या काळामध्ये भारताची परिस्थितीदेखील खूपच वाईट होती. कारण, आपण नुकतेच स्वतंत्र झालो होतो. देशाकडे अतिशय कमी पैसे होते, अन्नधान्याची टंचाई होती आणि गरिबी तर प्रचंड होती. तर त्या अवस्थेचे प्रतिबिंब या ’दो बिघा जमीन’ मध्ये पडलेलं होतं. तो सिनेमा चांगलाच होता, परंतु अतिशय हृदयद्रावक असं चित्रं होतं ते...
हे मी का सांगतोय, तर हा जो सिनेमा आहे ’तीन अडकून सीताराम’ हा आत्ताच्या काळाचं प्रतिनिधित्व करतो. भारताचा आत्ताचा जो ‘नॅशनल सायकी’ आहे, ते एक जोमदार तरुणाईच उत्सर्जन आहे आणि त्या तरुणाईचा उन्मेष या सिनेमातल्या प्रत्येक शॉटमध्ये पाहायला मिळतो. त्यामुळे मी म्हणेन की, हा सिनेमा निश्चितपणे आत्ताच्या काळाच्या भारताचं प्रतिनिधित्व करतो आणि माझी खात्री आहे की, प्रेक्षकांना सुद्धा हे पटेल आणि त्यांना या सिनेमातून जास्त आनंद घेता येईल! इथे या सिनेमाची आणि ’दो बिघा जमीन’ या चित्रपटाची तुलना करत नाही, तर ही तेव्हाच्या काळाची आणि आजच्या काळाची तुलना आहे!
‘तीन अडकून सीताराम’ हा सिनेमा आजच्या उसळत्या तरुणाईचं चित्रण आहे. त्यामुळे भारताच्या पुढील शक्तिमान आणि उत्साही भवितव्याचा एक प्रतीक म्हणून सुद्धा हा सिनेमा बघायला हरकत नाही.
कलाकार : वैभव तत्त्ववादी, संकर्षण कर्हाडे, आलोक राजवाडे, प्राजक्ता माळी, गौरी देशपांडे, आनंद इंगळे, विजय निकम, समीर पाटील आणि हृषिकेश जोशी.
चंद्रशेखर नेने