दरवर्षी अंजली रवींद्र घाटपांडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ‘स्नेहांजली पुरस्कार’ मराठी साहित्यविश्वातील एका लेखक व लेखिकेस दिला जातो. यंदाचे हे पुरस्काराचे २१वे वर्ष आहे. यावर्षीचा पुरस्कार, सुप्रसिद्ध लेखक सुमेध वडावाला (रिसबुड) यांना देण्यात येणार आहे. मूर्तीशास्त्राचे गाढे अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या अध्यक्षतेखाली व शुभहस्ते, आज रविवार, दि. १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता एस. एम. जोशी सभागृह, पुणे येथे हा सन्मान सोहळा संपन्न होईल. यानिमित्ताने सुप्रसिद्ध कथा व विज्ञान कथालेखक डी. व्ही. कुलकर्णी यांचा सुमेध वडावाला (रिसबुड) यांच्या साहित्य क्षेत्रातील कारकिर्दीचा परामर्श घेणारा हा लेख...
माणसांच्या जगण्यावर त्यांचा स्वतःचा हक्क असावा, म्हणजे वास्तवात तसा हक्क असत नाही,’ असे निर्देशित करणारे वरील वाक्य हे सुमेध वडावाला (रिसबूड) यांच्या ‘सामक्षा’ या कथासंग्रहाच्या ब्लर्बवरच्या मजकुरापैकीचं एक आहे. जीवनाची जटिलता, अपरिहार्यता आणि अगतिकता व्यक्त करणारा उर्वरित मजकूरही अर्थघन आहे. तो वाचूनच मी ते पुस्तक वाचायला घेतलं. नाना पात्रं, त्यांच्या भिन्न-भिन्न जीवनशैली, त्यांचे अपेक्षित वा अकल्पित असे प्रश्न, काही प्रश्नांची होणारी सुखद उकल, काही प्रश्नांनी लादलेली अभेद्य हतबलता, आलेलं उद्ध्वस्तपणा यांचं हरकथेगणिक होणारं दर्शन म्हणजे जगण्याच्या अगणित रंगगंधांची ‘सामक्षा’च होती.
‘सामक्षा’ म्हणजे प्रचिती. केवळ त्याच पुस्तकांपुरतं नाही, तर कादंबर्या असतो वा आत्मकथा असोत; वडावाला यांची प्रत्येक साहित्यकृती ही जन्म आणि मृत्यू यांच्यातल्या अनाकलनीय गुंत्याची समग्रपणे प्रचिती देते. म्हणूनच प्रवासवर्णनासह एकूण ३४ पुस्तकं प्रकाशित झालेल्या वडावाल्यांना बहुआवृत्त्यांचा सुखद योग हर पुस्तकागणिक अनुभवता आला. लिहायचं ते वास्तवाची भेदकता अंगानेही कमी होऊ न देता, हा त्यांचा खाक्या होता. लेखन ‘काळाच्या पुढचं’ आहे की, ‘वर्तमानाच्या बरंच मागचं’ आहे, याचा विचार त्यांचं लेखन अप्रस्तुत ठरवतं. म्हणूनच कोकणातलं जे जीवन भूतकालीन झालं आहे, त्यावरच त्यांच्या कथा रसरशीत आणि कालबाह्य न ठरलेल्या वाटतात आणि त्यांची ‘तृष्णा’ ही समलैंगिकतेवरची कादंबरी २०००च्या सुमाराला आली, तिच्यावर काही समाजघटकांना तुटून पडावंसं वाटलं. संपर्काची, माहिती संकलनाची साधनं मर्यादित असताना लिहिलेली ती कादंबरी महानगरीतल्या समलैंगिक विश्वाचा, प्रश्नांचा जो परिपूर्ण घेते, तिची धग आज २५ वर्षांनीही उणावलेली नाही.
महानगरीत सफाई कर्मचारी म्हणून काम करणार्या मुलीचं उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी धडपडणारी लक्ष्मी स्वतःही सुशिक्षित, संस्कारीत आहे. तिचं तसं विषम असणं, हीच सफाई कर्मचार्यांच्या वसाहतीत तिचं जाणं कठीण करणारी बाब आहे. दारुडा नवरा आणि सफाई कामगारांच्या विश्वासह उर्वरित पांढरपेशांचं जग या भवतालाची मानसिक सफाई ज्या प्रभावीपणे, वडावाल्यांच्या सफाईत प्रगटली आहे; तिने ‘दलित साहित्य’ आणि ‘महानगरी साहित्य’ यांच्यातला भेदही नाहीसा केला. मराठी प्रकाशक, नव्या नावांकडे, त्यांच्या दर्जेदार साहित्याकडे किती, कसे, स्वागतशील आहेत याच्या पडताळणीसाठी मुळात, ‘अंतर्नाद’ या प्रतिष्ठित दिवाळी अंकात ती कादंबरी प्रकाशित होताना, संपादकांच्या सहमतीने नव्याच टोपणनावाने झळकली. वाचकांनी तिचं मूल्य ओळखलं, मान्य केलं. पण, पुस्तक प्रकाशकांचा प्रतिसाद शून्य होता. कथा-कादंबर्यांबद्दलची प्रकाशकांची आटलेली ओढ ओळखून वडावाला आत्मकथा लेखनाकडे वळले. तिथेही त्यांनी नाममुद्रा उमटवली, ती गुणवत्तेच्या बळावरच केवळ!
आत्मकथा नायक (वा नायिका) किती ‘ग्लॅमरस’ आहे, समाजमान्य आहे, हे न पाहता त्याचं जगणं किती आव्हानपारी यशस्वी आहे आणि समाजासाठी किती प्रेरणादायी, वाचकांना ‘नवअनुभव’ देणारं आहे, याचा विचार त्यांनी प्रधान मानला. तब्बल १४ आत्मकथांनी साहित्यदालन समृद्ध केलं, ज्यात विषयवैविध्य हटके आहे. जन्मांध मनश्री, मार्केटिंग तज्ज्ञ प्रदीप लोखंडे, गर्द व्यसनमुक्त दत्ता श्रीखंडे, उद्योजक घडवणारे उद्योजक माधवराव भिडे अशी नाना कार्यकतृत्वं त्यांच्या लेखनाने झळाळून उठली. ‘मी काही तैल प्रतिभेचा, हुकमी लिहू शकणारा लेखक नाही. कष्टसाध्य लिहू शकणारा प्रयत्नशील लेखक आहे,’ अशी भूमिका मांडणार्या वडावालांची वाणीही वर्ण्य विषयाचा वेध घेणारी म्हणून वेधक आहे, हे ऐकणारे सांगतात.
‘प्रसिद्धीचा हव्यास नाही, आलेल्या प्रसिद्धीला लाथाडणार नाही’ अशी रास्त भूमिका घेताना राज्य आणि राष्ट्र पातळीवर त्यांना १७ पुरस्कार मिळाले. ‘स्नेहांजली’ या मानाच्या पुरस्काराने १८ क्रमांकाने कळस चढवला आहे.
डी. व्ही. कुलकर्णी