मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राजस्थान येथील डांगूरपूरमध्ये भाजपच्या ‘परिवर्तन संकल्प यात्रे’च्या प्रारंभ केला. यावेळी त्यांनी विरोधी पक्षांच्या आघाडीवर सडकून टीका केल्याचे पाहायला मिळाले. गृहमंत्री शहा म्हणाले, विरोधी पक्षांच्या आघाडीच्या नेत्याचे सनातन धर्माविषयीचे वक्तव्य हे केवळ तुष्टीकरणासाठी असून या माध्यमातून विरोधी पक्षाला सनातन धर्माचा अपमान करायचा आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले.
दरम्यान, राजस्थानच्या डांगूरपूरमध्ये भाजपच्या ‘परिवर्तन संकल्प यात्रे’च्या प्रारंभानिमित्त गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेस सरकारला चांगलेच घेरले. ते म्हणाले की, डुंगरपूरची भूमी नेहमीच वीरांची भूमी राहिली असून येथेच राजस्थान आणि गुजरातच्या आदिवासी बांधवांनी महाराणा प्रताप यांच्यासोबत राहून वर्षानुवर्षे लढा देऊन मुघल सैन्याला खिंडार पाडल्याचे अमित शहा यावेळी म्हणाले.
तसेच, भाजपच्या 'परिवर्तन यात्रे'च्या माध्यमातून गृहमंत्री शहांनी गेहलोत सरकारवर जोरदार निशाणा साधला असून ही यात्रा १९ दिवसांत २५०० किमीचा प्रवास करून ५२ विधानसभांशी संपर्क साधणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर राज्यातील विविध ठिकाणी सभा घेऊन संपूर्ण राजस्थानमध्ये परिवर्तनाची शपथ घेणार असल्याचे शहा म्हणाले.
द्रमुक नेते उदयनिधी यांनी सनातन धर्मावर दिलेल्या वक्तव्याबाबत अमित शहांनी खरपूस समाचार घेतला असून ते म्हणाले, 'अहंकारी आघाडीचे नाव बदलावे लागेल. त्यांनी युपीएचे नाव बदलून आय.एन.डी.आय. अलायन्स केले. ही युती सनातन धर्माचा अपमान करणारी आहे. त्यांचे सहकारी सनातन धर्म संपवण्याच्या बोलत आहेत. दोन दिवसांपासून विरोधी आघाडी या देशाच्या संस्कृतीचा आणि सनातन धर्माचा अपमान करत असून आता द्रमुक नेते उदयनिधी यांनी असे वक्तव्य करून तुष्टीकरण आणि मतपेढीचे राजकारण करण्यासाठी या लोकांनी सनातन धर्माचा अपमान केल्याचा गंभीर आरोप अमित शहांनी केला आहे.