ठाणे : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करून शतकीय महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या भारताने चंद्रयान- ३ चे यशस्वी उड्डाण केले. या विज्ञानविषयक विचारधारेला प्रोत्साहन देण्यासाठी टिंकर टाईम संस्था व व्यास क्रिएशन्स् यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या पहली उडान या ऑनलाईन विमानशास्त्र शैक्षणिक उपक्रमाने विश्वविक्रम नोंदवला.
दि. ०३ सप्टेंबर २०२३ रोजी एकाच वेळी ऑनलाईन विमानशास्त्र शिकण्यासाठी ३०९१ विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी सहभागी होत विश्वविक्रम केला.यापूर्वी ऑनलाईन विमानशास्त्र शिकण्यासाठी १५०० सहभागी व्यक्तींचा विश्वविक्रम होता. गिनिज वर्ल्ड रेकॉर्डचा हा कार्यक्रम रविवारी सकाळी वागळे इस्टेट येथील टीएमए हॉल येथे संपन्न झाला.
या कार्यक्रमाला लंडनस्थीत गिनीजचे चीफ ॲडज्युडीकेटर ऋषी नाथ, फॅसिलेटेटर मिलिंद वेर्लेकर उपस्थित होते. ऋषी नाथ यांच्या हस्ते टींकर टाईमचे संस्थापक पुरुषोत्तम पाचपांडे यांना गिनीज वर्ल्ड रेकॉडचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी रोटरी क्लब, राज्ञी वूमन वेलफेअर असोसिएशन, कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षण संस्था या सहयोगी संस्था आणि कॅप्टन निशांत पाटील, शर्विन जोशी,ऋषीकेश नवले, अग्नेल, माधव खरे, प्रशांत नानिवडेकर, सुशांत गायकवाड, मंदार कुलकर्णी आदींचे तसेच व्यास क्रिएशन्सचे सहकार्य लाभले.