लखनऊ : उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यात गणेश विसर्जन करून परतणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणारा मोहम्मद अफजल पोलिसांच्या चकमकीत जखमी झाला. येथे विनयभंगामुळे व्यथित झालेल्या पीडितेने गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तिच्यावर उपचारही सुरू आहेत.
ही घटना दि. २५ सप्टेंबर रोजी घडली. गणेश विसर्जनवरून परतणाऱ्या अल्पवयीन मुलीचा अफजलने विनयभंग केला. व्यथित झालेल्या अल्पवयीन मुलाने दुसऱ्या दिवशी दि.२६ सप्टेंबर रोजी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र कुटुंबीयांनी तिला वाचवले. या घटनेनंतर पोलिसांनी अफजलला अटक केली. मात्र कोर्टात हजेरी सुरू असताना त्यांने पळून जाण्याचा प्रयत्न केला. यानंतर पोलिसांच्या चकमकीत गोळी लागल्याने तो जखमी झाला.
वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, हरदोईच्या पिहानी पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडली. दि.२५ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जनाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात हिंदू समाजातील लोक उत्साहाने सहभागी झाले होते. याच कार्यक्रमात हिंदू समाजातील १४ वर्षांची अल्पवयीन मुलगी देखील उपस्थित होती. विसर्जन करून ती घरी परतत असताना वाटेत मोहम्मद अफजलने तिचा विनयभंग केला. तरुणीने या कृत्याला विरोध केल्यावर आजूबाजूचे लोक जमा झाले. त्यांनी आरोपीला बेदम मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिले.
या घटनेने तरुणीला चांगलाच धक्का बसल्याचे सांगण्यात येत आहे. घरी आल्यावर ती गप्प बसू लागली. दुसऱ्या दिवशी म्हणजे दि. २६ सप्टेंबर रोजी तिने स्वत:ला खोलीत कोंडून गळफास लावून घेतला. पंरतू घरच्यांना याची माहिती मिळताच त्यांनी दरवाजा तोडून मुलीला वाचवले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने पीडितेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या मुलीची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या कुटुंबीयांनी आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दि.२६ सप्टेंबर रोजी पोलीस आरोपी अफजलला न्यायालयात हजर करण्यासाठी घेऊन जात होते. यावेळी पोलिसांच्या वाहनासमोर जनावरांचा कळप आल्याने गाडीचा वेग कमी होत असल्याचे पाहून अफजलने पोलिसांच्या ताब्यातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. सोबत असलेल्या हवालदाराचे पिस्तूलही त्याने हिसकावले. पळून जात असताना अफजलने पोलिसांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही गोळी झाडली जी अफजलच्या पायाला लागली. जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी पोलीस पुढील तपास व कायदेशीर कारवाई करत आहेत.