मुंबई : मंत्रालयात केल्या जाणाऱ्या आत्महत्येच्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी शासनाकडून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. मंगळवारी दुपारी एका व्यक्तीने शिक्षक भरती लवकर घेण्यात यावी तसेच कंत्राटी पद्धतीने करण्यात येणारी भरती थांबविण्यात यावी या मागण्यांसाठी दुसऱ्या मजल्यावरून सुरक्षा जाळीवर उडी मारून आंदोलन केले. दरम्यान, या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर गृहविभागाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या सुचनांमुळे मंत्रालयात होणारे प्रकार थांबण्यास यश मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार आता मंत्रालयात येणाऱ्या सर्व व्यक्तींना प्रवेश पास हा बंधनकारक असणार आहे. तर येत्या काही दिवसांत ऑनलाईन पासेस देण्याची सुविधा सुरू करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
मंत्रालयामध्ये येणाऱ्या अभ्यागतांची संख्या दरदिवशी ५,००० पेक्षा जास्त असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे मंत्रालयात यापुढे किती व्यक्तींना प्रवेश देण्यात यावा याबाबत पोलीस उपायुक्त मंत्रालय सुरक्षा यांना सूचना देण्यात आल्या आहेत. एका महिन्याच्या आत त्यांच्याकडे याबाबतचा अहवाल मागवण्यात आला आहे.