‘हार्पेटॉलॉजी’चा अभ्यासक्रम पूर्ण करून निसर्गसंवर्धनाविषयी जनजागृतीचे उपक्रम राबविणार्या नाशिकच्या पर्यावरणप्रेमी वैभव भोगले याच्याविषयी...
वैभव भोगले हा मूळचा कोकणातील सिंधुदुर्गचा. कोकणचा प्रदेश हा मुळातच जैवविविधतेने संपन्न अन् तितकाच समृद्ध. वैभवच्या घराशेजारीही घनदाट जंगल होते. हे जंगल म्हणजे अनेकविध जातींचे पक्षी, प्राणी, साप, सरडे, कासव आणि मगर यांचा हक्काचा नैसर्गिक अधिवास. त्यामुळे या जंगलात फारसे कोणी जायला धजावायचे नाही. पण, वैभवसह गावातील इतर काही मुले तिथे मात्र न घाबरता अगदी खेळायला जायची. याउलट गावातील आजूबाजूच्या भागात राहणारे ग्रामस्थ मात्र सापांना घाबरून तेथील सापांची हत्या करायचे.एकदा गावात वैभवला खेळताना असाच एक साप दिसला. ग्रामस्थांनी त्याला मारू नये, म्हणून मग वैभवनेच तो साप पकडून जंगलात सोडून दिला. तिथूनच वैभवच्या पर्यावरण व निसर्गसंवर्धनाच्या कार्याला सुरुवात झाली.
हळूहळू आजूबाजूच्या ग्रामस्थांपर्यंत वैभवची ही कीर्ती पोहोचल्यानंतर, साप पकडण्यासाठी लोकं त्याला आवर्जून पाचारण करु लागले. वैभवचीही कालांतराने निसर्गसंवर्धनाविषयीची समज वाढत गेली. सर्पमित्र म्हणजे नक्की काय असतं, हे त्याच्या लक्षात आले. नंतर त्याच्या वडिलांची नाशिकला बदली झाल्यामुळे, वैभवचे सर्व कुटुंब नाशिकमध्ये स्थायिक झाले. आदर्श माध्यमिक विद्यालयात वैभवने पुढील शिक्षण घेतले. महाविद्यालयात गेल्यानंतर त्याने कॉम्प्युटर सायन्सला प्रवेश घेतला खरा. पण, कायमच निसर्गाची ओढ खुणावणार्या वैभवचे मन मात्र संगणकाच्या तांत्रिक जगतात रमले नाही. मग मित्राच्या सल्ल्याने वैभवने पुण्याला ‘हार्पोटोलॉजिस्ट’चा (यात उभयचर प्राण्यांचा अभ्यास केला जातो.) कोर्स पूर्ण केला. तिथे प्रत्यक्ष गेल्यावर वैभवला जाणवले की, तो या क्षेत्रातच आपले करिअर घडवू शकतो. वैभवचा तेथील अभ्यास पूर्ण झाल्यावर तो पुन्हा नाशिकला परतला आणि त्याने ‘बीएससी झूलॉजी’चे शिक्षण पूर्ण केलेे.
सुरुवातीच्या काळात या क्षेत्रात अनेक आव्हाने होती आणि आजही ती कायम असल्याचे वैभव सांगतो. तसेच ज्यावेळी या क्षेत्राची वैभवच्या घरच्यांना अजिबात कल्पना नव्हती, तेव्हा त्यांनी त्याला खूप विरोध केला. पण, ज्यावेळी त्याच्या कुुटुंबीयांना हे लक्षात आले की, वैभव नक्की काय काम करतो, तसेच जेव्हा त्याच्या कामाच्या बातम्या विविध वर्तमानपत्रांत झळकू लागल्या, तेव्हा मात्र कुटुंबीयांना वैभवचा अभिमान वाटू लागला. मग घरच्यांनीही वैभवला पाठिंबा दिला. याविषयी बोलताना वैभव सांगतो की, “अनेक लोकांना आपल्या कामाची, क्षेत्राची पूर्ण माहिती नसते. पण, त्याआधीच ते आपल्याविषयीची मतं बनवतात आणि आपल्याला नावे ठेवून मोकळे होतात. या क्षेत्रात मला काम करताना जाणवले की, अजूनही मोठ्या प्रमाणात लोक अंधश्रद्धेला कवटाळून बसले आहेत. कुठेतरी त्यांनी चौकटीबाहेर येऊन विचार करण्याची गरज आहे.” याच उद्देशाने जनजागृतीसाठी वैभव विविध व्याख्यानांचे आयोजन करतो.
गावांमध्ये, शाळांमध्ये पर्यावरण, प्राणिसंवर्धन अशा विविध विषयांवर पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन तो देतो आणि प्राणी, पक्षी यांचे निसर्गातील महत्त्व उपस्थितांना अगदी सोप्या आणि समजेल अशा भाषेत पटवून देतो. स्वार्थी माणूसच प्राण्यांचा अधिवास नष्ट करत आहे. त्यामुळे प्राणी शहरी वस्तीत प्रवेश करतात. त्यामुळे आपण त्यांना त्यांचा अधिवास पुन्हा कसा मिळवून देऊ शकतो, याविषयी वैभव जनजागृती करतो.आजवरच्या प्रवासातील अनुभव बरेवाईट असे दोन्ही प्रकारचे असल्याचे वैभव कबूल करतो. प्राण्यांच्या मुक्ततेसंदर्भातील एक चांगला अनुभव वैभव सांगतो. एका बंगल्यात साप होता आणि तिथेच त्यांच्या पाळीव कुत्र्याने चार पिल्लांना जन्म दिला होता. त्यातील दोन पिल्लांना त्या सापाने जखमी केले होते, तर दोन पिल्लांना दंश केल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. पिल्लांना वाचवण्यासाठी त्या कुत्रीनेही सापाला जखमी केले होते. सापालाही पकडायचे आणि त्या दोन पिल्लांसहित कुत्रीलाही वाचवायचे, असे आव्हान वैभवसमोर होते. अशा परिस्थितीत वैभवने आधी सापाला पकडले आणि मग कुत्रीला पकडून उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले आणि त्या पिल्लांनादेखील वाचवले.
वैभव सांगतो की, हे काम त्याच्या अत्यंत आवडीचे असून तो २४ तास न थकता, अजिबात न कंटाळता हे काम करू शकतो. निसर्गसंवर्धनाच्या कामांव्यतिरिक्तही वैभवला वाद्यांची प्रचंड आवड. तो बासरीही छान वाजवतो. सध्या तो शिवाज्ञा ढोलपथकात ताशा वाजवतो. वेळ मिळेल तेव्हा तो आवर्जून वाचनही करतो.वैभव युवापिढीला संदेश देताना सांगतो की, “आताची युवापिढी ही डिजिटल जगात जगणारी आहे. समाजमाध्यमांचा वापर तरुणांनी योग्य कामासाठीच करावा. तसेच त्यांच्या हातून निसर्गाची हानी होणार नाही, यासाठी तरुणांनी समाजमाध्यमांचा वापर करायला हवा. शेवटी निसर्गरक्षणाची जबाबदारी आपण सर्वांनी मिळून घेतली पाहिजे.” तसेच, प्रत्येक वाहनचालकाने आपल्या गाडीचा वेग नियंत्रणात ठेवला, तर अनेक प्राण्यांचे जीव वाचतील. निसर्गाचे संवर्धन करण्यासाठी जंगलातच गेले पाहिजे, असे काही नाही. प्रत्येकाने आपल्या घराच्या आजूबाजूचा निसर्ग वाढवला, तरीही आपण त्याला खूप मोठा हातभार लावू शकतो,” असे वैभव आवर्जून सांगतो. अशा या निसर्गसंवर्धनाचे हरित ‘वैभव’ जपणार्या पर्यावरणरक्षकाला त्याच्या पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’ परिवारातर्फे मनःपूर्वक शुभेच्छा.