मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार महेश शिंदे यांनी केलेल्या टीकेवर शरद पवार गटाचे नेते शशिकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निष्ठा विकून विष्ठेसाठी गेलेल्या लोकांनी अपात्रतेची काळजी करावी अशी टीका त्यांनी महेश शिंदे यांच्यावर केली आहे.
आजित पवार गटाचे आमदार महेश शिंदे यांनी 'आम्ही अपात्र होणार आहे अशी टीका करणारेच अपात्र होतील' असे वक्तव्य केले होते. यावर शरद पवार गटाचे नेते शशिकांत शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी शशिकांत शिंदे म्हणाले की, "आम्ही शरद पवारांच्या निष्ठेपायी अपात्र झालोत तरी आम्हाला त्याची पर्वा नाही. कारण त्यांच्यामुळे आम्ही राजकारणात आलो आहोत. त्यामुळे त्यांच्यासाठी कोणताही त्याग करायची आमची तयारी आहे."
"पण जे निष्ठा विकून विष्ठेसाठी गेलेले आहेत त्यांनी आमच्या अपात्रतेची काळजी करु नये. त्यांनी त्यांच्या अपात्रतेची काळजी करावी. ते शंभर टक्के अपात्र होणार आहेत. जरी ते अपात्र झाले नाहीत जनतेच्या दरबारामध्ये ते मतदानासाठी आपात्र ठरतील. आम्ही निष्ठावंत असून त्या निष्ठेने आमची त्याग करण्याची तयारी आहे," असे शशिकांत शिंदे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे काही आमदारांना घेऊन महायुती सरकारमध्ये सामील झाले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आणि अजित पवार दोन गट निर्माण झाले आहेत. या दोन्ही गटांमध्ये खरा पक्ष कुणाचा यावरुन सध्या वाद सुरु आहे.