राहुल गांधींना 'ओवेसीं'चे खुले आव्हान; म्हणाले, "दम असेल तर..."
25-Sep-2023
Total Views | 54
मुंबई : २०१९ मध्ये अमेठी लोकसभा मतदारसंघातून पराभव होणार असल्याचे लक्षात येताच. राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाडमधून लोकसभेची निवडणूक लढवली होती. तिथून ते निवडूनही आले होते. पण आता ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (एआयएमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी रविवारी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना आगामी लोकसभा निवडणूक वायनाडमधून नव्हे तर हैदराबादमधून लढण्याचे आव्हान दिले आहे.
एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी हैदराबादमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करत होते. यावेळी ओवेसी म्हणाले की, "मी तुमच्या नेत्याला (राहुल गांधी) वायनाडमधून नाही तर हैदराबादमधून निवडणूक लढवण्याचे आव्हान देत आहे. तुम्ही मोठमोठी विधाने करत राहा, मैदानात या आणि माझ्याविरुद्ध लढा. काँग्रेसचे लोक खूप काही म्हणतील, पण मी तयार आहे."
यावेळी ओवेसींनी महिला आरक्षणालाही विरोध केला. ते म्हणाले की, "काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि लालू यादव यांचा पक्ष आरजेडीचे नेते संसदेत मुस्लिमांचे नाव घेण्यास घाबरतात. मी उभा राहून म्हणालो की मुस्लिम महिलांनाही आरक्षण मिळायला हवे. मी महिलांच्या विरोधात आहे, असे ते सांगत राहतात, पण सत्य हे आहे की तुम्ही मुस्लिमांच्या विरोधात आहात."