नवी दिल्ली : दिल्ली विद्यापीठाच्या छात्रसंघ निवडणुकीमध्ये डाव्या विचारांच्या विद्यार्थी संघटनांना ‘नोटा’पेक्षाही कमी मते मिळून त्यांची हवा गूल झाली आहे. त्याचवेळी विद्यार्थांनी अर्बन नक्षली नव्हे तर राष्ट्रावादास पसंती दिल्याची प्रतिक्रिया अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (‘अभाविप’) व्यक्त केली आहे.
दिल्ली विद्यापीठ छात्रसंघाच्या निवडणुकीमध्ये ‘‘अभाविप’’ने अध्यक्षपदासह तीन जागांवर दणदणीत विजय मिळविला आहे. अध्यक्षपदी ‘अभाविप’चा तुषार देढा (२३,४६० मते), सचिवपदी अपराजिता (२४,५४३ मते) आणि संयुक्त सचिवपदी सचिन बैसला (२९,९९५ मते) यांनी विजय मिळविला आहे. त्याचवेळी उपाध्यपदी काँग्रेसची विद्यार्थी संघटना एनएसयुआयचा अभि दहिया (२२,३३१) याने विजय मिळविला आहे. विशेष म्हणजे दिल्ली विद्यापीठातील ३२ महाविद्यालयांमध्ये विजय मिळवून ९ महाविद्यालयांमध्ये क्लीन स्वीप मिळविला आहे.
यंदाच्या छात्रसंघ निवडणुकीमध्ये मोठ्या संख्येने मतदारांनी 'नन ऑफ द अबव्ह' अर्थात ‘नोटा’ पर्यायाचा वापर केला. मतदान केलेल्या 53,452 विद्यार्थ्यांपैकी 16,559 विद्यार्थ्यांनी ‘नोटा’चा पर्याय निवडला. त्याचवेळी डाव्या पक्षांची अवस्था आणखी बिकट आहे. छात्रसंघ निवडणुकीत डाव्या उमेदवारांना ‘नोटा’ पेक्षा कमी मते मिळाली आहेत. विशेष म्हणजे स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) आणि ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन (एआयएसए) यासह डाव्या पक्षांना मिळालेल्या एकूण मतांपेक्षा ‘नोटा’ मतांची संख्या जास्त असल्याचे दिसून आले आहे.
एआयएसए या डाव्या विद्यार्थी संघटनेने अध्यक्षपदासाठी आयेशा अहमद खान, उपाध्यक्षपदासाठी अनुष्का चौधरी, सचिवपदासाठी आदित्य प्रताप सिंग आणि संयुक्त सचिवपदासाठी अंजली कुमारी यांना उमेदवारी दिली होती. उपाध्यक्षपदाची उमेदवार अनुष्का हिला ३४९२ मते मिळाली तर येथे ‘नोटा’ला ३,९१४ मते मिळाली. तसेच सचिवपदाचा उमेदवार आदित्य प्रताप सिंह यास 3884 मते मिळाली. येथेही ‘नोटा’ ने त्याचा 5108 मतांनी पराभव केला. एआयएसएची सहसचिव पदाची उमेदवार अंजलीकुमारी हिला 4195 मते मिळाली. त्या तुलनेत ‘नोटा’ला 4786 मते मिळाली आहेत.
त्याचप्रमाणे एसएफआयतर्फे अध्यक्षपदाचा उमेदवार आरिफ सिद्दीकी यास १८३८ मते मिळाली तर ‘नोटा’स २७५७ मते मिळाली. उपाध्यक्षपदासाठीचा उमेदवार अंकित यास २९०६ मते मिळाली, तर येथेही ‘नोटा’ला ३९१४ मते मिळाली आहेत. संयुक्त सचिवपदासाठीची उमेदवार निष्ठा सिंह हिला ३३११ तर ‘नोटा’ला ५१५० मते मिळाली आहेत.
राष्ट्रवादी विचारांना विद्यार्थ्यांचे प्राधान्य – आशुतोष सिंह, अभाविप
दिल्ली छात्रसंघ निवडणुकीमध्ये ‘अभाविप’च्या सकारात्मक प्रचाराचा विजय झाल्याचे ‘अभाविप’ राष्ट्रीय माध्यम संयोजक आशुतोष सिंह दैनिक ‘मुंबई तरुण भारत’शी बोलताना म्हणाले. डाव्या विद्यार्थी संघटनांनी दिल्ली विद्यापीठामध्ये अर्बन नक्षली अजेंडा राबविण्यास सुरूवात केली होती, त्या अजेंड्याला विद्यार्थ्यांनी सपशेल नाकारले आहे. देशविरोधी भूमिका घेणे, भारतीय सैन्यास शिवीगाळ करणे, सैनिकांचे हौतात्म्य साजरे करणे हेदेखील विद्यार्थ्यांनी नाकारले आहे. दिल्ली विद्यापीठामध्ये देशभरातून विद्यार्थी येत असतात, त्यामुळे या विजयामुळे ‘अभाविप’च्या भूमिकेस देशव्यापी मान्यता असल्याचे सिद्ध होते. त्याचप्रमाणे ‘अभाविप’ ही महिलाविरोधी संघटना असल्याचाही आरोप विद्यार्थ्यांनी ‘अभाविप’च्या महिला उमेदवारास सर्वाधिक मते देऊन खोडून काढला आहे. डाव्या संघटना आणि एनएसयुआय यांना त्यांच्या राजकीय पक्षांनीही मदत केली, ‘अभाविप’ने मात्र स्वत:च्या बळावर विजय मिळविल्याचेही सिंह म्हणाले.