रस्तेबांधणीचे पर्यावरणशास्त्र

    25-Sep-2023   
Total Views |
Article On Ecology Of Road Construction

'वाहनाच्या धडकेत वाघाचा मृत्यू’, ‘टेम्पोची धडक लागून बिबट्या जखमी’ यांसारख्या बातम्या अधूनमधून कानावर पडत असतात. वन्यजीवांच्या अपघाताचं प्रमाण यापूर्वीही होतंच; पण हल्ली वाढत्या विकासवाटांबरोबरच रस्तेबांधणी आणि त्यामुळे जंगलांवर होणारे बेसुमार अतिक्रमण, यामुळे वन्यजीवांच्या अधिवासाला आधीच असलेला धोका आता अधिकच वाढलेला दिसतो.

एका जागतिक अहवालानुसार, एकट्या अमेरिकेतच काही लाख प्राणी दररोज रस्ते अपघातात मरण पावतात, असे आढळून आले. केवळ देशागणिकच नाही, तर जागतिक दर्जावर ही संख्या खूप मोठी आहे. काही लाख प्राणी जर केवळ एका देशात दिवसागणिक मरण पावणार असतील, तर भविष्यात जैवविविधतेला किती अवकळा होईल, याचा विचारच न केलेला बरा. खरं तर जागतिक स्तरावर वन्यजीवांच्या अपघाती मृत्यूचा आकडा हा कितीतरी पटींनी मोठा आहे.

लोकसंख्येबरोबरच रस्ते-महामार्गांची वाढणारी संख्या आणि त्याचे परिसंस्थेतील घटकांवर होणारे गंभीर परिणाम लक्षात घेता, त्यावर संशोधन करणे आणि उपाय शोधणे अत्यावश्यक आहे. यासाठी ‘रोड इकोलॉजी’ या विषयावर सखोल संशोधन होणे ही काळाची गरज. याच विषयाची एका आंतरराष्ट्रीय संकेतस्थळाने दखल घेऊन, याविषयी जनजागृतीचा प्रयत्न केला. त्याचबरोबर ‘क्रॉसिंग्स : हॉऊ रोड इकोलॉजी इज शेपिंग द फ्युचर ऑफ अव्हर प्लॅनेट’ असे या विषयावर सविस्तर भाष्य करणारे बेन गोल्डफार्ब यांचे पुस्तकही प्रसिद्ध आहे. सद्यःस्थितीत ६ कोटी ४२ लाख ८५ हजार ००९ किमी इतके रस्ते अस्तित्वात आहेत, तर ६३ लाख ३१ हजार ७९१ किमी इतके रस्ते एकट्या भारतात आहेत.

२०५० पर्यंत रस्त्यांची संख्या ही प्रचंड प्रमाणात वाढून, जगभरात आणखी २५ दशलक्ष मैलांहून अधिक रस्ते बांधले जाणार आहेत, असा अंदाज आहे. त्यातच एका आंतरराष्ट्रीय अहवालानुसार, जवळजवळ ३९० पशुपक्ष्यांच्या प्रजाती जगभरातून नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. दुसर्‍या एका अहवालानुसार, रस्ते अपघातात मरण पावलेल्या प्राण्यांच्या सर्वेक्षणांचे एकत्रित परिणाम पाहता, त्यामध्ये १९४ लाख पक्षी आणि २९ लाख सस्तन प्राण्यांचा वार्षिक मृत्यू होतो, अशी धक्कादायक आकडेवारी समोर आली.

पण, यामुळे दळणवळणाच्या मार्गांचा विकास न करणे हा पर्याय नसून, यावरील एक सुवर्णमध्य म्हणजे ‘वाईल्डलाईफ मिटिगेशन मेजर्स’ अर्थात वन्यजीव प्रतिबंधक उपाय. अशा उपाययोजना राबविण्यात भारतातील महाराष्ट्र हे अग्रेसर राज्य आहे. रस्ते बांधताना वन्यजीव भ्रमणमार्ग लक्षात घेऊन तिथे प्राण्यांना येण्या-जाण्यासाठी राखीव क्षेत्र या ‘वाईल्डलाईफ मिटिगेशन मेजर्स’अंतर्गत तयार करण्यात येते. यामध्ये स्थळ आणि परिस्थितीनुसार काही अंडरपासेस, तर काही ओव्हरपासेस तयार करता येतात. जेणेकरून वन्यजीवांच्या भ्रमणमार्गात अडथळे निर्माण होत नाहीत. त्याचबरोबर मानवी हस्तक्षेप असलेल्या ठिकाणांवरून वन्यजीवांची हालचाल कमी होऊ शकते. रस्त्यांचा त्यांच्यावर कमीतकमी परिणाम व्हावा, या दृष्टिकोनातून ‘नॉईस बॅरियर्स’ ही लावले जातात. ज्यामुळे वन्यजीवांना वाहनांच्या आवाजाचा त्रास होणार नाही.

अशाप्रकारे ‘मिटिगेशन मेजर्स’ तसेच ‘रोड इकोलॉजी’ विचारात घेऊन येत्या काळात रस्तेबांधणीचा विचार झाला, तरच जैवविविधतेचे होणारे नुकसान थांबविण्यासाठी एक-एक पाऊल पुढे टाकता येईल. पायाभूत सुविधा आणि सर्वांगीण विकासासाठी रस्ते हा पाया असला, तरीही त्यामुळे वन्यप्राण्यांचा जीव धोक्यात येणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. ‘वाईल्डलाईफ मिटिगेशन मेजर्स’ अस्तित्वात आलेले असले तरीही अजून त्याबाबत फारशी जनजागृती इतर देशांमध्ये नसल्याचेच दिसते. प्राण्यांप्रती केवळ सहानुभूती नाही, तर त्यांच्या जीवनासाठी विकसित आणि विकसनशील राष्ट्रांनी अभ्यासपूर्ण तोडगा काढणे गरजेचे आहे.

केवळ रस्ते अपघातांमुळे होणार्‍या वन्यजीव आणि परिसंस्थेच्या नुकसानाला आळा घालण्यासाठी कृतिशील प्रयत्नांची आवश्यकता आहे. ही पृथ्वी एकट्या मानवाची नाही, तर जैवविविधतेत असणार्‍या पशू, पक्षी, कीटक, विविध वनस्पती अशा परिसंस्थेतील प्रत्येक घटकाचा तिच्यावर तितकाच किंबहुना थोडा अधिक हक्क आहे, ही खूणगाठ बांधूनच शाश्वत विकासाचा मार्ग प्रशस्त करता येईल, हेच खरे!

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

समृद्धी ढमाले

लेखिका रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेच्या पदवीधर आहेत. सध्या दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये पर्यावरण प्रतिनिधी म्हणून कार्यरत. यापूर्वी विविध 'ह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज', मुलाखती आणि इतर वार्तांकनासाठी काम. आवाज आणि सूत्रसंचालन या क्षेत्रांमध्ये काम आणि विशेष आवड.