पलटीबहाद्दर संधीच्या शोधात?

    25-Sep-2023   
Total Views |
Article On Bihar CM Nitish Kumar Political Strategy

नितीश कुमार अजूनही समाधानी नसून ते पुन्हा एकदा पलटी मारण्याची संधी शोधत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. कारण, उत्तम राजकीय समज असलेले तेजस्वी यादव हे नितीश आणि त्यांच्या पक्षास कमकुवत करण्याची एकही संधी सध्या सोडत नसल्याचे चित्र आहे.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार कधी आणि कोणाची बाजू घेतील, याबाबत नेहमीच शंका असते. त्याबाबतीत त्यांची स्पर्धा राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांच्याशीच असावी. सध्या नितीश सहा पक्षांच्या महाआघाडीचे सरकार चालवत आहेत. मात्र, ठरावीक काळाने सहकारी बदलणे, हा त्यांचा जुनाच स्वभाव. जनता दलापासून फारकत घेतल्यानंतर नितीश कुमार यांनी पहिल्यांदाच बिहारमध्ये भाजपसोबत एनडीएचे सरकार स्थापन केले. हा ट्रेंड २०१३ पर्यंत कायम होता. जेव्हा भाजपने गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा नितीश यांनी रालोआची साथ सोडली. त्यानंतर कसेबसे त्यांचे सरकार टिकले; पण २०१४ मध्ये त्यांनी रालोआच्या विरोधात एकट्याने निवडणूक लढविली, त्यामध्ये त्यांना आपल्या सामर्थ्याची कल्पना आली होती.

नितीश यांनी रालोआ सोडल्यामुळे त्यांनी २०१५च्या विधानसभा निवडणुकीत राजदच्या नेतृत्वाखालील महाआघाडीत सामील होणे योग्य मानले. त्यांना आणि त्यांच्या महाआघाडीला अभूतपूर्व यश मिळाले. भाजप एकटा पडला. बिहारमध्ये महाआघाडीचे सरकार स्थापन झाले; पण दोन वर्षे पूर्ण होण्याआधीच नितीश यांना राजदसोबतचे संबंध सांभाळणे कठीण जाऊ लागले. ते निमित्त शोधत असतानाच ‘लॅण्ड फॉर जॉब’ प्रकरणात तेजस्वी यादव यांचे नाव पुढे आले. संधी मिळताच नितीश यांनी महाआघाडी सोडून भाजपसोबत सरकार स्थापन केले. २०२० मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार यांच्या पक्षाला मोठा धक्का बसला होता, तेव्हा त्यांना विधानसभेत केवळ ४३ जागा मिळाल्या. त्यानंतरही भाजपने त्यांना मुख्यमंत्रिपद दिले; मात्र त्यांचा मानभंग करण्याची एकही संधी सोडली. यामागे नितीश यांना कमकुवत करीत जाणे आणि राज्यात आपला पक्ष केंद्रस्थानी आणणे, अशी भाजपची रणनीती असल्याचे सांगितले गेले. त्यामुळे त्यांनी भाजपला सोडून पुन्हा महागठबंधनची साथ घेतली आणि आता तर विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीमध्येही ते सहभागी झाले आहेत.

मात्र, नितीश कुमार अजूनही समाधानी नसून ते पुन्हा एकदा पलटी मारण्याची संधी शोधत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. कारण, उत्तम राजकीय समज असलेले तेजस्वी यादव हे नितीश आणि त्यांच्या पक्षास कमकुवत करण्याची एकही संधी सध्या सोडत नसल्याचे चित्र आहे. असे असताना नितीश मात्र तेजस्वी यांच्याकडेच राज्याचे नेतृत्व देण्याची भाषा बोलताना दिसतात. यामुळे पक्षात तीव्र नाराजी असून, उपेंद्रसिंह कुशवाह यांनी त्यासाठीत पक्ष सोडत असल्याचे जाहीरपणे सांगितले होते. त्यामुळे पक्षांतर्गत दबाव वाढत असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे.

यापेक्षाही नितीश कुमार यांच्या मनास लागलेली बाब म्हणजे ‘इंडिया’ आघाडीतील त्यांचे स्थान एकाएकी कमकुवत होणे. कारण, विरोधी पक्षांच्या एकतेसाठी नितीश कुमार हेच आघाडीवर होते. त्यासाठीची पहिली बैठकदेखील त्यांना आपल्या यजमानपदाखाली पटना येथे घेतली होती. मात्र, त्यानंतर झालेल्या बंगळुरू बैठकीपासून नितीश कुमार यांना निर्दयपणे बाजूला करून काँग्रेसने सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली. तरीदेखील या आघाडीचे संयोजकपद आपल्याला मिळेल, अशी क्षीण आशा नितीश यांच्या मनात अद्यापही जिवंत असावी.

मात्र, काँग्रेसने आघाडी ‘हायजॅक’ करून १२ ते १३ सदस्यांची समन्वय समिती स्थापन करून संयोजक या पदाची गरजच संपुष्टात आणली. त्यामुळे संयोजकपदाच्या मखरात बसून मिरवून घेण्याचे स्वप्न पूर्ण होण्याची नितीश यांची अपेक्षा दिवसेंदिवस धूसर होत चालली आहे. त्यातच काँग्रेस आणि लालूप्रसाद यादव यांची वाढती जवळीकदेखील नितीश यांची नाराजी वाढविण्यास कारणीभूत ठरू शकते. कारण, ‘इंडिया’ आघाडीत एकीकडे लालूप्रसाद यादव केंद्रस्थानी आहेत, तर नितीश कोपर्‍यात आहेत.

त्यामुळे नितीश कुमार ‘इंडिया’ आघाडीवर चिडले असतील, तर ते नक्कीच त्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतील. कारण, आपली खुर्ची सुरक्षित राखण्याकडे नितीश कुमार यांचा नैसर्गिक कल असतो. त्याचवेळी एखाद्या आघाडीची अथवा सहकारी पक्षाची साथ सोडण्यासाठी नितीश कुमार हे योग्य संधीच्या शोधात असतात. त्याद्वारे त्या संधीवर आघाडी तोडण्याची खापर त्यांना अगदी सहजपणे फोडता येते.

‘सीबीआय’ने २०१७ मध्ये रेल्वे प्रकरणात पहिल्यांदा तेजस्वी यादव यांचे नाव समाविष्ट केले होते, तेव्हा ते प्रकरण नितीश यांनी महाआघाडी सोडण्याचे निमित्त म्हणून वापरले होते. आता तर न्यायालयानेही तेजस्वीवरील आरोपपत्र स्वीकारले असून, त्यामध्ये अटकही होण्याची शक्यता आहे. जर तेजस्वी यांना अटक झाली, तर नितीश कुमार महाआघाडीसोबतच राहतील. कारण, त्यांची डोकेदुखी ठरत असलेले तेजस्वी आत असतील अथवा तेजस्वी यादव यांच्या विरोधातील कारवाईचा आधार घेऊन ‘इंडिया’ आघाडी सोडण्याचा विचार करू शकतात.

त्याचीच पूर्वतयारी म्हणूनच नितीश कुमार ‘जी २०’ शिखर परिषदेदरम्यान राष्ट्रपती भवनात आयोजित रात्रीभोज कार्यक्रमात सहभागी झाल्याचे बोलले जाते. कारण, या कार्यक्रमात सहभागी होण्यास काँग्रेससह अन्य पक्षांच्या मुख्यमंत्र्यांनी नकार दिला होता. त्या कार्यक्रमात नितीश कुमार अगदीच सहजपणे वावरत होते. त्यामुळे लवकरच ‘इंडिया’ आघाडीमध्ये फूट पडल्यास त्याचे आश्चर्य वाटण्याचे कोणतेही कारण नाही.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.