लोणावळा : पुणे जिल्ह्यातील लोणावळा आणि मावळ परिसरातील पर्यटन विकासाबाबत मुंबईत २१ सप्टेंबर, २०२३ रोजी आढावा बैठक पार पडली. या बैठकीमध्ये लोणावळा येथील टायगर पॉईंट आणि लायन्स पॉईंट या ठिकाणी ग्लास स्कायवॉक उभारण्यात यावा आणि मावळ तालुक्यातील कुसूर पठारावर जागतिक पर्यटन केंद्र बनवण्याबाबत चर्चा करण्यात आली.
महाराष्ट्रातील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी हे महत्त्वपूर्ण प्रकल्प आहेत. त्यामुळे पर्यटन विभागाने सविस्तर प्रकल्प आराखडा एका महिन्यात तयार करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. तसेच या प्रकल्पासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे अजित पवारांनी सांगितले.
आराखडा तयार करताना पर्यटन विभागाने घ्यायची काळजी
लोणावळा परिसराला मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देतात. त्यामुळे लहान मुलांकरता साहसी खेळ आणि इतर सुविधांचा समावेश असवा. या परिसरातील वाऱ्याचा वेग लक्षात घेऊन आराखडा तयार करताना पर्यटकांची सुरक्षितता आणि पर्यावरणाच्या जपणूकीला प्राधान्य द्यावं. पर्यटकांसाठी पाऊलवाट तयार करताना काँक्रीट ऐवजी दगडांचा वापर करावा. परिसरात पर्यटकांसाठी वाहनतळ तसेच आवश्यक असलेल्या सुविधांचा समावेशही आराखड्यात करावा.तसेच आराखडा तयार करताना निसर्गस्नेही आणि पर्यावरणाला धक्का लागणार नाही याची दक्षता घ्यावी.
याबरोबरच मावळ तालुक्यातील कुसूर पठार परिसरात निसर्गसंपदा मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे तिथं जागतिक दर्जाचं पर्यटन केंद्र तयार करण्यासाठी जिल्हा विकास आराखड्यात या प्रकल्पाचा समावेश करावा, असे अजित पवार म्हणाले. त्यामुळे आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने आवश्यक माहिती संकलित करावी, अशी सूचना पर्यटन विभागाला करण्यात आली.