गणेश जशी विद्येची देवता, तशीच ती कलेची देवता. विघ्ने येऊ नयेत म्हणून विघ्नहर्त्याची पूजा लोककलावंतांनी बांधली. गणेश लोककलेत ठायी ठायी आहे. कधी तो नुसताच संकीर्तन रूपात, तर कधी साक्षात नाट्यरूपात. त्याचे हे संकीर्तन रूप आणि नाट्यरूप लोककलांमध्ये कधी रांगड्या तर कधी प्रासादिक रूपात सादर होते. तेव्हा, अशाच लोककलेतील गणेशाचे उलगडलेले हे उत्सवी रुप...
‘गणबाई मोगरा गणाची जाळी’ साकराबाई टेकाडे या गोरेगावच्या लोकगायिका. त्यांच्या या गणेशगीताने कामगार भाग एकेकाळी दुमदुमून जायचा. ‘तूच सुखकर्ता तूच दु:खहर्ता, अवघ्या दीनांच्या नाथा। बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे चरणी ठेवितो माथा।’ प्रल्हाद शिंदे यांच्या या गीताचे गारूड मराठी लोकमानसावर वर्षानुवर्षे होते आणि आजही आहे. प्रल्हाद शिंदे कल्याणचे. त्यांच्या गणेश गीतांनी, सत्यनारायणाच्या कथागीतांनी गणेशोत्सवात जणू आनंदाचे उधाण यायचे. गणेशोत्सवात नमन खेळे, जाखडी, दशावतार, भारूड, मेळे हे सर्वकाही सादर व्हायचे. जागरण, गोंधळ, भराड आदी विधीनाट्ये ही सर्व लोककलांच्या प्रारंभीची नाट्ये होत. या विधिनाट्यांमध्ये आणि कलगी-तुर्यामध्ये गणेशाचे वंदन असते.
भेदिकाद्वारे आध्यात्मिक कुटे सादर करणारे कलगीपक्ष तुरापक्षाचे शाहीर गणाच्या उत्पत्तीसंबंधीही परस्परांना कूट प्रश्न विचारीत असत. हे पठ्ठे बापूराव आणि भाऊ फक्कड यांच्या गणांवरून स्पष्ट होते. ‘गणपती नाचून गेल्यावरती शेंदूर ठेवला कोणासाठी’ असा प्रश्न पठ्ठे बापूराव यांनी केला असता, ‘गणपती नाचून गेल्यावरती शेंदूर वाहू यक्षिणीप्रती’ असे उत्तर दुसर्या एका गणातून भाऊ फक्कड यांनी दिले आहे. गणपती ही यक्षकुळातील देवता असल्याचे भाऊ फक्कड यांना ज्ञात होते. गणांची निर्मिती करताना या गणांद्वारे परस्परांना आव्हान देण्याचा गानप्रकार म्हणूनही या रचानाकारांनी गणांचे उपयोजन केले. पठ्ठे बापूरावांचा हा गण पाहा-
लवकर यावे सिद्ध गणेशा
आतमधी कीर्तन वरूनी तमाशा
माझा भरवसा तुम्हावरी खासा
विघ्न पिटविशी दाही दिशा
झेंडा मिरवशी आकाश पाताळी
वैरीकरिती खाली मिशा
पठ्ठे बापूराव कवीच्या कवनी
बाजार बुणग्याचा झाला हशा
पठ्ठे बापूराव हे कलगीपक्षाचे शाहीर होते. त्यांनी या गणातून तुरेवाल्या शाहिरांना भेदिकाच्या लढतीत नामुष्की पत्करावी लागेल, असा हल्ला चढविला आहे. ‘वैरी करिती खाली मिशा’ ही ओळ त्याचेच द्योतक आहे. तुर्रेवाल्यांना ‘बाजारबुणगे’ असे संबोधून त्यांचा हशा झाला असल्याची प्रतिक्रिया पठ्ठे बापूरावांनी नोंदविली आहे. अशा रीतीने गणांच्या निर्मितीतही कलगी-तुरा संघर्षाचे नाट्यमय सूचन झालेले आहे. जागरणासारख्या विधिनाट्यांमधून अशा स्वरूपाचे गण सादर होतात. पण, भेदिकाच्या लढतीचे स्वरूप नसते, तर गणपतीचे संकीर्तन एवढाच मार्यादित हेतू असतो.
गणांतील गणपतीची रूपे
गणांतील गणपती हा कधी बालरूपात, कधी विद्येचा अधिपती, कधी सकळ कलांचा अधिपती, कधी विघ्नविनाशक अशा स्वरूपांत येतो. या गौरीनंदन अशा गणपतीचे शंकरराव जाधव-धामणीकर यांनी शब्दबद्ध केलेले रूप पाहा-
आज वंदन करितो, गौरी नंदन
नवविध विद्या करितो भक्ती
भक्तासी द्यावीमुक्ती
हीच आमुची सर्व शक्ती लावितो पणा॥१॥
चौदा विद्येचा गणपती। चौसष्ट कला तुझे हाती
बालकासी द्यावी स्फूर्ती। गावया गुणा॥२॥
नमो तुज सरस्वती। ब्रह्म वीणा घेऊन हाती।
स्वर गायनाने डुलती सभा रंगणा
शाहीरशंकर करी गर्जना। रक्षी रक्षी भक्ता जना।
बबन नामदेव दावा। अंतरी खुणा
गौरीच्या नंदनाची आराधना करताना भक्तही बालक होतात व ‘बालकासी द्यावी स्फूर्ती’ असे आशीर्वचन मागतात.
गणपती ‘विघ्नहारक’ असल्याने तो रणात निश्चित तारून नेईल, अशी श्रद्धा गणाद्वारे व्यक्त केली जाते. गणपतीचे योद्धा म्हणून असलेले रूप मार्तंड भैरव व मणिमल्ल दैत्यांच्या युद्धात आपण आधी पाहिले आहेच. उल्कामुख दैत्याचा वध करणारा गणपती रणात रक्षण करीत या श्रद्धेपोटी शंकरराव जाधव-धामणीकर यांनी रचलेल्या गणातील हे वर्णन पाहा-
या गणा या या रणा या। विघ्न हारा या तारा या ॥धृ॥
तुझ्याच स्मरणी जग हे तरले। अखंड व्यापुनी त्रिखंड उरले।
दुखंड मनाला कधी न पुरले। पाखंड मनाला माराया॥१॥
काम, क्रोध अनिवार। होतो मजवर मारा फार।
पडेल कार्याचा हा भार। जडल रोग तो बाराया ॥२॥
ॠद्धी-सिद्धीचा तू सागर। दु:ख क्लेश हाराया।
विकल्पबुद्धीचा हा घोर। ज्ञान अमृत पाजावा॥३॥
कवी शंकर म्हणे कृपासिंधु। दीननाथा दीन बंधू।
वारंवार तुजशी वंदू। दु:ख क्लेश हाराया॥४॥
गणाचे आशयसूत्र
जागरण या विधिनाट्यात सादर होणारे हे गण पाहता या गणांच्या सादरीकरणामागे जे आशयसूत्र दिसते ते असे-
१. कार्यारंभी गणाचे वंदन अशीर्वचन प्राप्तीसाठी करावे.
२. गणेश ही सकल कलांची देवता आहे. कलेच्या प्रारंभीच या देवतेकडून रंगऊर्जा घ्यावी.
३. अरिष्टांचे निवारण व्हावे म्हणून गणपतीचा धाव करावा. ही अरिष्टे दोन प्रकारची असतात. भौतिक पातळीवरची आणि आधिभौतिक पातळीवरची. भौतिक अरिष्टे म्हणजे आर्थिक आपत्ती, रोगराई इत्यादी व आधिभौतिक अरिष्टे म्हणजे काम, क्रोध आदी षड्रिपूंपासून अभय प्राप्त व्हावे म्हणून गण सादर करणे.
४. गणातून ‘गणा’शी आणि ‘गणां’शी संवाद. गण म्हणजे व्यक्तींचा समूह या समूहाशी संवाद साधण्याचा आरंभ गणाद्वारे व प्रत्यक्ष गणपतीशी संवाद साधण्याचा प्रयत्न करीत असतो. अनेक गणांमध्ये सादरकर्ता, म्हणजेच उपासक येथे गणपतीशी संवाद साधतोय व आशीर्वचन मिळतेय, हे आशयसूत्र असते.
शंकराची आराधना, खंडोबाची आराधना आणि गण यानंतर जागरणात इष्ट देवतांना पाचारण केले जाते, ते पदरूप आवाहनाच्या रूपाने. गोंधळातही असेच गण सादर होतात.
भारुडातील गण
भारूड हा अध्यात्मिक उद्बोधन आणि समाजप्रबोधनाचा अतिशय प्रभावी असा लोककलाप्रकार. भारुडाचे स्वरूप मूळचे भक्तिनाट्याचे. या भक्तिनाट्याचा प्रारंभच मुळात गणेशस्तवनाने होतो. कारण, ‘विठ्ठल, गणपती दुजानाही’ ही संतांची भावना भक्तांमध्येही अवतरलेली असते. लालबाग, परळ, माझगाव, भायखळा या परिसरांमध्ये एकेकाळी भारुडी भजनमंडळी होती. काळभैरव प्रासादिक भारूड भजन मंडळ, संत ज्ञानेश्वर प्रासादिक भारूड भजन मंडळ, भैरवनाथ प्रासादिक भारूड भजन मंडळ अशी मंडळे प्रामुख्याने पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, राजगुरू नगर तालुक्यातील भारूड मंडळे तसेच वाईदेशी मंडळे ही भारूडे सादर करायचे. त्यात गणपती, रिद्धी-सिद्धी, सरस्वती ही सोंगे हमखास असायची. भारुडातला गण असा -
तुज नमो नमो ओमकार स्वरूपा
ओमकार स्वरूपा नमो नमो ओमकार स्वरूपा
ओमकार स्वरूपा सद्गुरू समर्था
अनाथांच्या नाथा तुज नमो
तुज नमोनमो ओमकार स्वरूपा
मुख्य गायक गळ्यात टाळ अडकवून उंच उड्या घेत काराचे असे संकीर्तन करतो. तेव्हा गणपती. रिद्धी-सिद्धी ही पात्रे भारुडात येतात.
दशावतार, भारूड, लळीत ही तीन ही भक्तिनाट्ये त्यामुळे या भक्तिनाट्यांमध्ये गणपती, रिद्धी-सिद्धीचे सोंग हमखास असते. लळितात, दशावतारात गणेशाची टिंगल मस्करी व्हायची, ती ‘तुजमज नाही भेद, केलासहज विनोद’ या आंतरिक जाणिवेने. देव भावबळे बद्ध करण्याचाच हा प्रकार घाटावरल्या मंडळींची ही लळिते आणि कोकणातील मंडळींचा दशावतार याने कामगार भागात भक्तिचैतन्याचे जणू उमाळे यायचे. कळींगण पारसेकर, मोचेमाडकर ही कोकणातील दशावतारी मंडळे मुंबईत खेळ करायची, तर बाळकृष्ण लिंगायत हे मुंबईत दशावतारी मंडळे चालवायचे.दशावतारातही गणपती, ॠद्धी-सिद्धी, सरस्वती ही पात्रे येतात.
मुळात दशावताराचा उल्लेख दिसतो तो दासबोधात. शामजी काळे यांनी इसवी सन १७२८ साली दशावतार कर्नाटकातून कोकणात आणला. दशावताराचे वाङ्मयीन उल्लेख दासबोधापासून मिळू लागतात. समर्थ रामदासांनी त्याविषयी म्हटले आहे, ते असे-
खेळता नेटके दशावतारी। तेथे येती सुंदर नारी।
नेत्र मोडिती कळाकुसरी। परी अवघे धटिंगण॥
या उल्लेखावरून असे अनुमान करण्यात येते की, रामदासांच्या काळी महाराष्ट्रात दशावतार नाट्य प्रचारात असावे आणि मध्यंतरी ते लुप्त झाल्यामुळे काळे यांनी पुन्हा ते कर्नाटकातून महाराष्ट्रात आणले असावे. परंतु, रामदासांच्या महाराष्ट्र व कर्नाटक या दोन्ही प्रदेशांत संचार असल्यामुळे त्यांनी केलेला उल्लेख कर्नाटकातील नाट्यविषयीही असणे शक्य आहे. इसवी सनाच्या सातव्या शतकात विष्णुपूरच्या मल्लराजाने दशावतारी खेळांची प्रथा सुरू केली, असे सांगतात. कर्नाटकातील ‘यक्षगान’ हे त्याचे मूळ रूप असून, त्यातूनच महाराष्ट्रातील दशावतार नाट्य उदय पावले आहे. दशावतार नाट्य ग्रामदेवतांच्या उत्सवात गावोगावी होत असते.
तमाशा या लोकनाट्य प्रकारात गायनाची शैली किंवा गायन प्रकार हा इतर गायनशैलीपेक्षा भिन्न आहेत. तमाशातील गण हा कुठून, कसा उदयाला आला याचा विचार केल्यास लक्षात येते की, महाराष्ट्राच्या संस्कृतीत सुरुवातीच्या काळात प्रतिष्ठान पैठण येथे सातवाहन राजाचे राज्य होते. याच राजाच्या कारकिर्दीत रतिनाट्यसारखे कलाप्रकार सादर करण्याची प्रथा होती. रतिनाट्याची सुरुवात ही मंगलचरणाने होत असायची. या मंगलचरणासच ‘गण’ म्हणून संबोधले आहे. मंगलचरणामध्ये तीन देवतांची स्तुतीपर गीते गायली जायची. ही स्तुतीगीते म्हणजेच ‘गण’ होय. यामध्ये पहिला गण शंकर आणि पार्वतीचा, दुसरा गण लक्ष्मी आणि नारायणाचा व तिसरा गण गणपतीचा अशा प्रकारच्या स्तुतीगीतांवरून तमाशातील गणाला रतिनाट्यसारखा लोककला प्रकार उपायकारक ठरला, असे म्हणता येईल.
पेशवाईतील दुसर्या बाजीरावाच्या काळापर्यंत म्हणजेच अठराव्या शतकाच्या सुरुवातीला ५० वर्षांचा काळ लावणी फडाच्या तमाशावर भरभराटीस आणण्यास उपायकारक आहे, असे म्हणता येईल. याच काळामध्ये लावणी फडाचा तमाशा नावारूपाला आला आणि एकापेक्षा एक अशा सरस शाहिरांनी तमाशा रंगभूमीवर जन्म घेतला. त्यातल्या त्यात शाहीर हैबती घाटग्यांनी गणेशाला वंदन करण्यासाठी तीन स्तुतीपर गणाच्या भेदिक रचना केलेल्या आहेत. त्यांनी कलगीला माता समजून महत्त्व दिले आहे आणि गणपतीला विनंती केली आहे की, ‘हे गणपती बाप्पा मोरया, तू सुखकर्ता आहेस, दु:खहर्ता, विघ्नहर्ता आहेस. तेव्हा आमच्यावर प्रसन्न होऊन आम्हाला सद्बुद्धी दे. अशा या शाहीर हैबती घाटगेच्या गणाच्या ओळी खालीलप्रमाणे -
श्री गजानन गणपती । मंगलमूर्ती
दयावी मज मती समारंभाला । हो ।
त्याचप्रमाणे शाहीर पठ्ठे बापूराव यांच्या कारकिर्दीत त्यांनी त्यांच्या गणविशेषात ३५ गण रचना केलेली आहे. त्यांनी आपल्या गणात गणपतीचे सांकेतिक स्वरूपात पारंपरिक वर्णन केलेले आहे ते खालीलप्रमाणे-
गण माझ्या अंगणी नाचित आलेला सारथी बनीला।
माझ्या मनाचा पाझर खणला-
चौदा विद्येचा द़ृपद
नवरस-गायनी खूप रंग जमला। कवने केली
बागायत खरी पानस्थळ, नवे जिराइत।
पठ्ठे बापूराव कवितेचा पटाईत खूप रंग जमला।
अशा प्रकारे या शाहिरांनी गणपतीला आद्य दैवत मानत गणपतीवर स्तुतीगीते गणाच्या स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. लोककलेतील गणेशाचे रूप खरोखरच लोभसवाणे आहे.