छत्तीसगढ सरकार धर्मांतरास प्रोत्साहन देत असल्याचा आरोप आसामच्या मुख्यमंत्र्यांनी केला असतानाच फसवून, भूलथापा मारून धर्मांतर कसे केले जाते, याचा एक प्रकार उघडकीस आला आहे. देवरी कछार चर्चने एक पत्रक प्रसिद्ध केले असून, त्यामध्ये चर्चमध्ये प्रार्थना केल्यामुळे अर्धांगवायूचा एक रुग्ण कसा बरा झाला, याची माहिती देण्यात आली आहे.
छत्तीसगढमध्ये काँग्रेसचे भूपेश बघेल यांचे सरकार सत्तेवर आल्यानंतर त्या राज्यात सनातन संस्कृतीविरुद्ध कटकारस्थान केले जात असल्याचा आरोप आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांनी केला आहे. त्याचप्रमाणे बघेल सरकार सत्तेवर आल्यापासून त्या राज्यात रोहिंग्या मुस्लिमांची घुसखोरीदेखील मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचेही आसामच्या मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. एकदा का रोहिंग्यांची घुसखोरी सुरू झाली की, ती थांबविणे कठीण असल्याचे सरमा यांनी म्हटले आहे. तसेच, वनवासी जनतेच्या धर्मांतरण कार्यामध्ये बघेल सरकारनेही संबंधितांशी हातमिळवणी केली असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. जेव्हापासून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ‘इंडिया’ आघाडीची निर्मिती केली, तेव्हापासून त्या आघाडीने हिंदू समाजाच्या विरुद्ध वातावरण निर्माण करण्यास प्रारंभ केला, असेही आसामच्या मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
काँग्रेस पक्ष धर्मांतर करण्याच्या कामामध्ये गुंतला असल्याचे सांगून राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना अयोध्येमधील राम मंदिरात नेण्यात यावे, अशी सूचना आसामच्या मुख्यमंत्र्यांनी केली. “त्या दोघांनी राम मंदिरास भेट दिली, तर ते हिंदू आहेत, यावर मी विश्वास ठेवेन. पण, ते तिकडे मुळीच जाणार नाहीत,” अशी पुस्तीही त्यांनी जोडली. राहुल गांधी यांनी त्या मंदिरास भेट दिली, तर ते बाबराच्या विरुद्ध असल्याचा शिक्का त्यांच्यावर बसेल, असे ते म्हणाले. “आम्ही जेव्हा आसाममधील मदरसे बंद केले, त्यावेळी आसाममधील काँग्रेस नेते गळे काढून रडत होते. त्यावर तुम्ही तुमच्या मुलांना मदरशांमध्ये पाठवाल का, अशी विचारणा मी त्यांच्याकडे केली होती.”
एवढेच नाही तर छत्तीसगढ सरकार धर्मांतरास प्रोत्साहन देत असल्याचा आरोप आसामच्या मुख्यमंत्र्यांनी केला असतानाच फसवून, भूलथापा मारून धर्मांतर कसे केले जाते, याचा एक प्रकार उघडकीस आला आहे. देवरी कछार चर्चने एक पत्रक प्रसिद्ध केले असून, त्यामध्ये चर्चमध्ये प्रार्थना केल्यामुळे अर्धांगवायूचा एक रुग्ण कसा बरा झाला, याची माहिती देण्यात आली आहे. आपण धर्मांतर करीत नसल्याचे दाखवून देण्यासाठी ‘येशू मसीहा धर्म बदलने नही; परंतु जीवन बदलने आया’ असा उल्लेख त्या पत्रकावर करण्यात आला आहे. सुरगुजा जिल्ह्यातील लुनदरा भागातील ही घटना आहे. अर्धांगवायू झालेल्या मंगल साई नावाच्या व्यक्तीस चर्चमध्ये नेण्यात आल्यावर, त्याचा आजार बरा झाल्याचा आणि त्यास पुन्हा संवेदना प्राप्त झाल्याचा दावा करण्यात आला आहे. ख्रिस्ती धर्मगुरू अशा भूलथापा मारून वनवासींचे धर्मांतर करीत आहेत आणि हे सर्व बघेल सरकारच्या डोळ्यांदेखत सुरू आहे.
भाजप नेत्याची अण्णाद्रमुकवर टीका
राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा अजूनपर्यंत घटक असलेल्या अण्णाद्रमुक आणि त्या राज्यातील भारतीय जनता पक्ष यांच्यातील संबंधांमध्ये सध्या तणाव निर्माण झाल्याचे दिसते. तामिळनाडू राज्यात भाजपला मिळत असलेला प्रतिसाद लक्षात घेऊन भाजपला दाबून ठेवण्याचा प्रयत्न अण्णाद्रमुक करीत असल्याचे दिसून येत आहे. पण, भाजप कोणाचाही गुलाम नाही, अशा शब्दात अण्णाद्रमुकला प्रदेशाध्यक्ष अण्णामलाई यांनी सुनावले आहे. काही दिवसांपूर्वी अण्णाद्रमुकचे नेते इ. के. पलानीस्वामी लोकसभेच्या जागांसंदर्भात चर्चा करण्यासाठी दिल्लीला गेले होते. भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याशी त्यांनी चर्चा केली. पण, सूत्रांनुसार भाजपने अण्णाद्रमुक पक्षाकडे ३९ पैकी १५ ते २० जागा मागितल्या असल्याचे कळते. पण, त्या पक्षाकडून भाजपला कसलेही आश्वासन दिले गेले नसल्याचे समजते. दरम्यान, द्रविडी नेते अण्णादुराई यांच्यासंदर्भात भाजप नेते अण्णामलाई यांनी केलेल्या विधानाबद्दल अण्णाद्रमुक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
अण्णादुराई यांचा जाणूनबुजून अपमान केल्याचा आरोप अण्णाद्रमुकने केला आहे. “अण्णादुराई यांच्यासारख्या नेत्यांचा अपमान आमचा पक्ष सहन करणार नाही,” असे अण्णाद्रमुकचे नेते माजी मंत्री जयकुमार यांनी म्हटले आहे. पण, “आपण अण्णादुराई यांचा मुळीच अपमान केला नाही. आपण जो इतिहास आहे, तो सांगितला,” असे ते म्हणाले. मुथू रामलिंग थेवर यांनी सनातन धर्माचा पाठपुरावा केला म्हणून त्यांना १९५२ मध्ये कशाप्रकारची वागणूक देण्यात आली, ते आपण निदर्शनास आणून दिले, असे अण्णामलाई यांनी म्हटले आहे. सनातन धर्म हा आमचा श्वास आहे. तामिळ संस्कृती आणि सनातन धर्म यांचे रक्षण करण्यासाठी आपण राजकारणात आलो असल्याचे अण्णामलाई यांनी स्पष्ट केले. “युती ही २०२४च्या निवडणुकीसाठी असेल. भाजप स्वबळावर २०२६ मध्ये तामिळनाडूमध्ये सत्तेवर येईल,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. एकूणच तामिळनाडूमध्ये भक्कम पाय रोवण्याच्या दिशेने भाजपचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे.
होयसळ मंदिरे ’युनेस्को’च्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये!
कर्नाटक राज्यातील होयसळ मंदिरांचा ‘युनेस्को’ने जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये नुकताच समावेश केला आहे. ‘नोबेल पुरस्कार’ विजेते गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी स्थापन केलेल्या ‘शांतिनिकेतन’चा ‘युनेस्को’ने जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याच्या पाठोपाठ आता जागतिक वारसा यादीत होयसळ मंदिरांचा समावेश झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. बेलूर, हळेबीड आणि सोमनाथपुरा येथील मंदिरे ‘युनेस्को’च्या वारसा यादीत समाविष्ट झाली आहेत. भारत सरकारने या मंदिरांचा समावेश वारसा यादीत करावा, अशी शिफारस ‘युनेस्को’ला केली होती. ‘शांतिनिकेतन’चा या वारसा यादीत समावेश झाल्याबद्दल समस्त भारतीयांसाठी ही अत्यंत अभिमानाची बाब असल्याचे प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. “गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या कल्पनेतून साकार झालेले आणि भारताच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा वारसा असलेले ‘शांतिनिकेतन’ वारसा यादीत समाविष्ट झाल्याची घटना भारतीयांसाठी अभिमानही आहे,’‘ असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.
चीनचे संरक्षणमंत्री तीन आठवड्यापासून गायब!
चीनचे संरक्षणमंत्री ली शांगफू हे गेल्या काही आठवड्यांपासून अचानकपणे राजकीय पटलावरून गायब झाल्याचे वृत्त आहे. चीनच्या या संरक्षणमंत्र्यास पदावरून हटविण्यात आले असावे, असे अमेरिकेचे म्हणणे आहे. अलीकडेच व्हिएतनामच्या काही संरक्षण अधिकार्यांसमवेत चर्चा करताना त्या बैठकीतून चीनच्या संरक्षणमंत्र्यांना बाहेर पडावे लागले होते. तेव्हापासून ते कोठे आहेत, त्यांचे काय झाले याबद्दल कसलीच माहिती उपलब्ध झालेली नाहे. चीनचे माजी परराष्ट्रमंत्री क्वीन गांग हे असेच चीनच्या मुख्य राजकीय पटलावरून गायब झाले होते. चीनचे संरक्षणमंत्रीही असेच गायब झाले असल्याची चर्चा होत आहे. चीनचे माजी परराष्ट्रमंत्री जुलै २०२३ मध्ये सार्वजनिक जीवनातून गायब झाले होते. त्यांना पदावरून का बाजूला करण्यात आले, त्याबद्दल चीनकडून कसलेही स्पष्टीकरण देण्यात आले नव्हते. साम्यवादी चीनमध्ये एखादी व्यक्ती नकोशी झाली की, ती अचानक कशी गायब होते. हे या उदाहरणावरून दिसून येते.
९८६९०२०७३२