मुंबई : दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित 'सुभेदार' चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. नरवीर सुभेदार तान्हाजी मालूसरे यांच्या शौर्यगाथेवर आधारित या ऐतिहासकपटात अभिनेता अजय पुरकर यांनी तान्हाजींची भूमिका साकारली असून प्रेक्षकांना कोंढाणा किल्ल्याचा तो इतिहास पुरकर यांच्या अभिनयातून याचही देही याची डोळा अनुभवता आला आहे. दरम्यान. या चित्रपटाने ब़ॉक्स ऑफिसवरही चांगली कामगिरी केलेली पाहायला मिळत आहे. हिंदी चित्रपटांच्या गर्दीत 'सुभेदार' चित्रपटाने आपली जागा निर्माण केली असून आत्तापर्यंत या चित्रपटाने ८.७४ कोटी कमावले आहेत.
‘सुभेदार' चित्रपटातील त्यांच्या दमदार अभिनयानंतर अजय पुरकर यांची वर्णी थेट दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत लागली आहे. सध्या अनेक मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार आपल्या अभिनयाच्या जोरावर इतर भाषिक चित्रपटसृष्टीत यश मिळवत आहेत. त्यात अजय पुरकर यांच्यामुळे आमखी एक नाव जोडले गेले. अजय पूरकर 'स्कंदा' या चित्रपटातून त्यांच्या दाक्षिणात्य मनोरंजनविश्वातील कारकीर्दीला सुरुवात करणार आहेत.
नुकताच 'स्कंदा' या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त एका कार्यक्रमाला अजय पुरकर यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमात चित्रपटाचे दिग्दर्शक बोयापती श्रीनू यांनी अजय पूरकर यांचं प्रचंड कौतुक केलं. यावेळी त्यांनी नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'सुभेदार' चित्रपटाचा उल्लेखही केला. या कार्यक्रमातील एक व्हिडिओ अजय पूरकर यांनी त्यांच्या सोशल मीडियावरुन शेअर केला आहे.
काय आहे या व्हिडिओत?
अजय पूरकर यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओत दिग्दर्शक बोयापती श्रीनू यांनी अजय पुरकर यांनी ओळख करुन देताना म्हटले,“हे अजय पूरकर, मराठी रंगभूमीवरील एक उत्कृष्ट कलाकार असून. त्यांनी तान्हाजी मालुसरे यांची व्यक्तिरेखा उत्तमरित्या साकारली. त्यांनी आपल्या 'स्कंदा' चित्रपटातही चांगला अभिनय केला आहे. त्या भूमिकेबद्दल आता मी काही सांगू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला चित्रपट पाहावा लागेल. त्यांचा सुभेदार हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे," अशा शब्दात त्यांनी पुरकर यांचे कौतुक केले.
दरम्यान, 'स्कंदा' हा दाक्षिणात्य चित्रपट तेलुगु, तमिळ, कन्नड, मल्याळम आणि हिंदी अशा पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार असून बोयापती श्रीनू दिग्दर्शित हा चित्रपट १५ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात राम पोथिनेनी, सई मांजरेकर, श्रीलीला या कलाकारांच्याही महत्वाच्या भूमिका असणार आहेत.