वैचारिक प्रबोधनाची पंचसूत्री

    02-Sep-2023
Total Views | 73
Article On RSS Sarsanghchalak Dr. Mohanji Bhagwat

‘श्री नरकेसरी प्रकाशन संस्थे’च्या हिंगणा एमआयडीसी परिसरातील ‘तरुण भारत’च्या ‘मधुकर भवन’ या नूतन वास्तूचा लोकार्पण सोहळा गुरुवार, दि. ३१ ऑगस्ट रोजी रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी बोलताना सरसंघचालकांनी रा. स्व. संघाची वाटचाल, ‘तरुण भारत’चा प्रवास यांसह पाच विषयांसंबंधीच्या प्रबोधनाची आवश्यकताही प्रकर्षाने अधोरेखित केली. तसेच ‘तरुण भारत’ वृत्तपत्राबरोबरच अन्य माध्यमांनीही या विषयांवरील प्रबोधनाची निकड त्यांनी बोलून दाखविली. त्यानिमित्ताने ‘तरुण भारत’च्या कार्यक्रमात सरसंघचालकांनी मांडलेले हे उद्बोधक असे विचारपाथेय...

वैचारिकदृष्ट्या प्रबोधन करता-करता ’तरूण भारत’ हे वृत्तपत्र आज स्वयंसेवकांच्या जीवनातील आवश्यकता बनून गेला आहे. ’तरूण भारत’ वाचलंच पाहिजे. तो किती पानांचा आहे? त्यात छापून येणारा फोटो नीट दिसतोय का? याबाबतीत बरेच किस्से जरी असले तरी ’तरूण भारत’ हा पाहिजेच! याचे कारण असे की, रा. स्व. संघ आणि ‘तरुण भारत’ यांचे वय साधारण सारखं आहे. दोघांचीही वाटचाल जोडीने सुरू झाली. संघ आणि ’तरूण भारत’ सुरू झाले, तेव्हा दोघांचा एकमेकांशी संबंध यायचं फारसं काही कारण नव्हतं. परंतु, तेव्हाचं वातावरण पाहिले तर सर्वांचाच ध्येयवादी बाणा असायचा. विचार वेगवेगळे असले तरी प्रामाणिकता, त्याग, तपस्या या गोष्टी विशेषतः नेतृवर्गात सामान्य होत्या. मुख्य म्हणजे, तेव्हा देशावर पारतंत्र्य असल्याने ते दूर करणे, हे सर्वांचंच पहिलं काम होतं. त्यामुळे वैचारिक मतभेद असले तरी आपसांतले संबंध हे अत्यंत घनिष्ठ होते. या परिस्थितीला तडा गेला-तो गांधीहत्येनंतर. त्यामुळे द्वेष वाढला आणि नंतर ’तरूण भारत’ला संघाचा हात लागला.

एकप्रकारे संघ विचारांचे व्रत घेऊन ’तरूण भारत’ची वाटचाल आज सुरू आहे. व्यावसायिकदृष्ट्या यापूर्वी तो कसा चालायचा आणि सध्या कसा चालतोय, ही एक वेगळी गोष्टं आहे. कुठल्याही वर्तमानपत्राचे मुख्य काम ’बातम्या देणे’ असं सामान्य माणसाला वाटतं. त्यादृष्टीने पाहिलं तर ’तरूण भारत’चे मूल्यमापन वेगवेगळ्या काळातून वेगवेगळ्या प्रकारे करता येईल. परंतु, एक काळ असा होता की, ’तरूण भारत’ हे विचार देणारे एकमेव वृत्तपत्रं होतं. त्या विचारांवर लोकांचा विश्वासही बसायचा; कारण इथून येणारी गोष्ट ही सत्य आणि हितकारकच असेल, असा त्यांचा अनुभव होता. ’अप्रिय सत्य बोलू नये’ असा नियम किंवा वाणीविवेक जरी असला तरी अप्रिय सत्यही मांडायला ’तरूण भारत’ कमी करीत नाही. त्यामुळे त्याची जी प्रतिष्ठा उत्पन्न झाली, ती आजवर सर्वस्थितीत तशीच राहिली. याला अर्थातच कारण आहे ते येथील हाताने काम करणार्‍या माणसांपासून ते प्रबंधन बघणार्‍या वरिष्ठांपर्यंत सर्वांचीच असलेली निष्ठा. मुळात त्या सर्वांचा एक ध्येयवाद आहे; तो म्हणजे जगाला मार्गदर्शन करणारा भारत उभा राहिला पाहिजे. असा भारत भारतीय मूल्यांच्या आधारावरच उभा राहू शकतो. म्हणून भारतीय मूल्यांच्या आधारावर स्वतंत्र भारताच्या जीवनाची पुनर्रचना आणि स्वतंत्र भारताच्या वैश्विक योगदानाबद्दल सामर्थ्याची जागृती या दृष्टीने सगळं सुरू आहे.

संघाचेही काम याकरिताच सुरू झाले. म्हणजेच डॉ. हेडगेवारांच्या मनात संघस्थापनेच्या पूर्वी याबद्दल एक विचार होता. पूर्वी नागपूरला काँग्रेसचं एक अधिवेशन झालं होतं, त्यात डॉ. हेडगेवार व्यवस्था प्रमुख होते. त्यावेळी प्रस्ताव समितीला त्यांनी दोन प्रस्ताव दिले होते; जे त्यावेळी घेतले नाहीत. त्यातील ’गोवंश हत्या बंदी’चा हा पहिला प्रस्ताव आणि ’काँग्रेसने संपूर्ण स्वराज्य, हे आपलं ध्येयं घोषित करावं’ हा दुसरा प्रस्ताव होता. ही मागणी तेव्हाच्या काँग्रेसमधल्या सगळ्या तरुणांची होती. सुभाषबाबू असो किंवा जवाहरलालजी, हे सगळे एका वयाचे लोक होते. तेव्हा यासाठी ते विशेष आग्रह करत होते. याउलट ज्येष्ठ मंडळी मात्र ’जरा दमाने घ्या...’, ’१८५७ ला आपण पराभूत झालो... तसं पुन्हा होता कामा नये...’ असा विचार करायचे. यामुळे त्यांच्यासाठी ते मवाळ आणि तरुण मंडळी याबाबतीत जहाल होते. रेटत-रेटत ती मागणी १९२८-२९ पर्यंत नेली आणि शेवटी १९३० मध्ये काँग्रेसने त्याची घोषणा केली. १९२० च्या काँग्रेसमध्ये हा प्रस्ताव जेव्हा डॉक्टरांनी दिला, तेव्हा त्यांनी यात पुढे असंही म्हटलं होतं की, ’स्वतंत्र भारत विश्वातल्या देशांची पूंजीच्या सापळ्यातून मुक्तता करेल, हेही घोषित केलं पाहिजे.’ यावरून डॉक्टरांच्या विचारांचा कॅन्व्हास त्यावेळीसुद्धा स्वतःपासून ते विश्वापर्यंत असा होता. म्हणूनच संघाची सुरुवात झाली.

ज्याप्रमाणे संघापुढे स्वतःला टिकवणं एक आव्हान होतं, तसंच काहीसं आव्हान १९४८ नंतर ’तरूण भारत’पुढेही होतं. पण, ती परिस्थिती सुद्धा काही दिवसांनी गेली आणि मग अखंड हिंदू समाजाला आपलं म्हणणं समजलं पाहिजे, याकरिता काय करावं लागेल, कसं करावं लागेल, त्यांना संघटित कसं करता येईल, याबाबत विचार करण्यात आला. हिंदुस्थान हे हिंदू राष्ट्र आहे आणि ते सत्य आहे म्हणजेच संघ ते करणार; पण सगळेच लोक, अशी अपेक्षा करतात की, याला हरकत नाही. पण, इतर भारतीयांचीही काळजी करा. अशी काहीशी परिस्थिती समाजात वावरल्यावर दिसते. वैचारिकदृष्ट्या सगळे भारतीय म्हणजे हिंदू. हिंदू म्हणजेच सगळे भारतीय. आज जे भारतात आहेत, त्यांचा हिंदू संस्कृती, हिंदू पूर्वज आणि हिंदू भूमी यांच्याशीच सगळ्यांचं नातं आहे, बाकी कशाशीही नाही. हे काही लोकांना समजलं आहे, तर काहींना समजूनही सवय किंवा स्वार्थामुळे कळतंय पण वळत नाही, असं आहे. काही लोकांना त्याचा विसर पडलाय, एवढाच काय तो फरक. पण, लोकांच्या मते, संघाची स्थिती अशी आहे की, ‘सगळ्यांची काळजी करावी.’

कॉम्रेड वर्धन यांची एकदा सभा झाली होती. मात्र, ’तरूण भारत’मध्ये त्यासंदर्भात बातमी आली नव्हती, तर बाळासाहेबांनी विचारलं की, ’ए. बी. वर्धन भाषणात काय म्हणाले, हे समजण्याकरिता मला दुसरा पेपर घ्यावा लागेल का?’ मुळात रिपोर्टिंग सगळ्याचं केलं पाहिजे. त्याचं तथ्यपरीक्षण केलं पाहिजे. म्हणजेच वैचारिकदृष्ट्या आपला एक बाणा आहे. तो कधी सोडला नाही पाहिजे. वैचारिक मुळं पक्की ठेवून वातावरणात किती आणि केव्हा लवचिक व्हायचं, हे स्वातंत्र्य आहे. अशाप्रकारेच संघाचंही एक-एक क्षेत्रं वाढत गेलं. पुढे येणारा काळही साधारण याच विचारांचा येणार आहे. ’तरूण भारत’ तर त्याच विचारांचा वारसा चालवतो. त्या विचारांना विश्वामध्ये नुसती मागणीच नाही, तर विश्वाला या विचारांशिवाय तरणोपाय नाही. असं सगळ्यांना कळून चुकलंय. काही लोकं बोलतात, काही लोकं बोलत नाहीत. जगातल्या कुठल्याही भागात जा, तुम्हाला भावना मिळेल. तिचे अस्तित्वं कळेल. त्यामुळे एक वैश्विक दायित्व देशावर आणि स्वाभाविक समाजावरही येणार आहे. स्वाभाविकता समाजाला तयार करू पाहणार्‍या संघटनेवर येणार आहे आणि त्या समाजाचा वैचारिक परिकोश करणार्‍या माध्यमांवरही येणार आहे. त्यामुळे ’तरूण भारत’ची आजवरची निष्ठेनी, श्रद्धेनी आणि नेटाने केलेली वाटचाल हा ’तरूण भारत’शी संबंधित लोकांचा एकप्रकारे गौरवाचा विषय आहे आणि असा ’तरूण भारत’ नेटाने पुढे नेणारी पूर्वीपासून आत्तापर्यंतची जी जी मंडळी आहे, ते सगळे अभिनंदनास पात्र आहेत. परंतु, वाटचाल अद्याप संपलेली नाही. त्यादृष्टीने साधन संपन्नता हा एक विषय असतो.

संतांचे संसार नीट चालतच नाही, अशी एक समजूत आहे. तसंच, ध्येयनिष्ठ लोकांना व्यवहारनिष्ठ जग कळत नाही, हेही एक आहे. परंतु, असं नाही. परमार्थ आणि प्रपंच, हे दोन्ही एकावेळी चालवायचे असतात. परमार्थ विवेकाच्या आधाराने त्या प्रपंचातली काजळी काढून तो शुद्ध करायचा असतो. ’प्रपंच मुळातच नासका । तो परमार्थे करावा फिका’ असंही आहे. प्रपंचाच्या आधारावर जो परमार्थ चालतो, तो यशस्वीच होतो. त्याला काहीही कमी नसतं. कारण, परमार्थशील व्यक्तींच्या जवळ परमार्थाची संपत्ती येते. ती शडईश्वरीययुक्त असते. ’तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम’ म्हणजेच योगेश्वर कृष्ण आणि धनुर्धर पार्थ जिथे आहेत, तिथे सर्व प्रकारची समृद्धी आहे, लक्ष्मी आहे, न ढळणारी नीती आहे; असा प्रपंच असतो. आता त्या प्रपंचाच्या पातळीला ’तरूण भारत’ आला आहे, याचा आनंद आहे.

येत्या काळात वैचारिक प्रबोधनाच्यादृष्टीनेसुद्धा काही लक्ष्यं आपण सर्वांनी घेतली पाहिजेत. एखादं विमान निघतं, तेव्हा त्याचं एक-एक इंजिन सुरू होतं. ते हवेत उडल्यावर बर्‍याच वेळानंतर त्याची सर्व इंजिनं (यंत्र) काम करायला लागतात. ते जमिनीवर उतरून त्याचे दरवाजे उघडत नाहीत, तोपर्यंत ते चालू असतं. अशी वैचारिक प्रबोधनात जी आपली इंजिनं चालू झाली, ती सगळी चालू ठेवावी लागणारच आहेत. परंतु, त्याला जोडूनच आता नवीन इंजिनं सुरू करावी लागणार आहेत. आपल्या देशाची आणि संघ विचारांची ही अवस्था असल्यामुळे आपल्याला एक उदाहरण जगापुढे प्रस्तुत करतील, अशा माणसांचा शोध घेणे आवश्यक आहे. त्याकरिता आपल्याला विचार द्यावे लागतील. यासाठी आपल्याला केवळ पाच गोष्टींनी सुरुवात करावी लागेल. पहिलं म्हणजे समाजात भेद नको, विषमता नको. समाजात सद्भाव पाहिजे, सहयोग पाहिजे. भाषा, पंथ, पंथ-संप्रदाय, जात-पात या सगळ्या गोष्टींना सुट्टी मिळाली पाहिजे. त्यांना सुट्टी मिळेल न मिळेल, त्या आपल्या चालीने जातील. त्याची फार काळजी करायची आवश्यकता नाही. पण, आपसांतलं एकमेकांचं नातं हे आत्मीयतेचं, सौहार्दाचं, सद्भावाचं आणि बरोबरीचं असलं पाहिजे. हे बुद्धीने सगळ्यांना मान्य आहे. पण, मनात पुष्कळ गोष्टी घर करून असतात. त्यामुळे अशा गोष्टी सवयीत यायला पुष्कळ वेळ लागतो. तोपर्यंत सतत हे वैचारिक प्रबोधन व्हावं लागतं, माहीत असलेलं पुन्हा सांगावं लागतं. ती सारखी आठवण मनाला झाली, तर मनातल्या गाठींवर उपाय नक्कीच मिळतो आणि त्या गाठी सहज सुटतात. ते प्रबोधन सतत होत राहिलं, तर कालांतराने ते वागण्यातही उतरतं. ते झालं पाहिजे.

दुसरी गोष्टं म्हणजे, ’भेद’ ही एक जागतिक प्रकारची समस्या आहेच. जरी भारताकडे सगळे लोकं बोट दाखवत असले, तरी मुळात भेद ही बाहेरची उत्पत्ती आहे. जिथे मनुष्य असूनही ते मनुष्य म्हणायच्या लायकीचे नाहीत. कारण, त्यांनी या गोष्टी मान्य केलेल्या नाहीत. आज जे लोकांना आवडतं, मंगल वाटतं, त्याकरिता अनुशासन पाळावं लागेल. या अनुशासनाला मुळात विरोध आहे. अनिर्बंध व्यक्तिस्वातंत्र्य म्हणजे स्वैरता. मनुष्याने जी बंधनं निर्माण केली, ती सगळी तोडली पाहिजेत. याकरिता बंधनांचा उगम जिथून सुरू होतो, त्या गोष्टी ध्वस्त केल्या पाहिजेत. म्हणजेत इंग्रजीत म्हटलं तर एकप्रकारे ’सॅडिस्टिक’ असा विचार या लोकांचा आहे. याला ’वोकिझम’, ’पोस्ट मॉडर्न कल्चरॅलिझम’ वगैरे अशी गोंडस नावं दिली जातात. आतापर्यंत ज्याच्यामुळे समाजाची धारणा झाली, कुटुंब एकत्र नांदली, अशा कुटुंबात लहान मुलांना वडिलांचं ऐकावं लागतं; ही गुलामी आहे.

मग ते कुटुंब उद्ध्वस्त करा आणि मुलांना स्वैर होऊ द्या, स्वतंत्र होऊ द्या, असा त्यांचा विचार असतो. हे कळत असूनही माध्यमांतून, बोलण्यातून, भाषणांमधून, पुस्तकातून हे सगळं येत असतं. त्यामुळे पृथ्वीवरील मनुष्यप्रजातीला एक धोका उत्पन्न झाला आहे, आपलं घर तुटेल याची जाणीव झाली आहे. त्यांना आपल्याप्रमाणे आपली पुढची पिढी राहील का, याची भीती आणि खंत वाटू लागली आहे. यादृष्टीने आपापलं कुटुंब सुशिक्षित करण्यासाठी संस्कारांचं प्रबोधन पाहिजे. जिथे अशी परंपरा असेल, त्याठिकाणी त्यांचं प्रबोधन पाहिजे. आपल्या देशाच्या परंपरेचा आपल्या देशात प्रबोधन झाले पाहिजे. आपल्या देशात खूप विविधता असली, तरी परंपरा सगळ्यांची एक आहे. स्वतःला हिंदू न म्हणणार्‍यांचीसुद्धा परंपरा तीच आहे. लग्न समारंभातले त्यांचे शिष्टाचार, त्यांची गाणी, वेशभूषा, भाषा या सगळ्या गोष्टी त्याच आहेत. कारण, मुळात त्याच्यामागची दृष्टी ही एक आहे. त्याचे प्रबोधन सर्वांना विशेषतः नव्या पिढीला झालं पाहिजे. संघाच्या कुटुंब प्रबोधन गतिविधीतून संघस्वयंसेवक ते करितच असतात.

तिसरी गोष्ट म्हणजे, पर्यावरण हा आज सर्वांना चिंतीत करणारा आणि प्रेरक ठरणारा विषय आहे. पर्यावरणाच्यादृष्टीने काही करायचं ठरवलं की, एक पाठिंबा आज सहज उभा राहतो. मात्र, पर्यावरणाची काळजी करणारा स्वतःच्या आचरणात पर्यावरणाच्या हिताचा किती विचार करतोय, हे पाहणे गरजेचे आहे. विकास आणि पर्यावरण सुरक्षा यांच्यामधला मार्ग कोणता याचे प्रबोधन होणे आवश्यक आहे. चौथे म्हणजे, भारताला जर जगाकरिता उभं राहायचे असेल, तर स्वतःला ‘आत्मनिर्भर’ व्हावे लागेल. यासाठी ‘स्वदेशी’ या विषयाचे प्रबोधन झाले पाहिजे. स्वदेशी म्हणजे केवळ बाजारातून वस्तू घ्यायचा प्रश्न नाही. मला लागणार्‍या गोष्टी मी परिश्रमाने कमवेन, परिश्रमाने घडवेन आणि संयमाने उपभोगेन. मी जगावं म्हणून कोणाचा रोजगार मारणार नाही, असं प्रबोधन स्वदेशीबाबत झाले पाहिजे. पाचवी गोष्टं म्हणजे, नागरिक अनुशासन, नागरी कर्तव्य आणि नागरिकता बोध या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत. कारण, अक्षरशिक्षण वाढले असले, तरी सुसंस्कृतता योग्य गतीने वाढत नाहीये. अशाने भांड्याला भांडं लागतं. त्यामुळे त्याचेही प्रबोधन होणे गरजेचे आहे. या पाच विषयांचं प्रबोधन जोरात व्हायला हवं! यापूर्वीची इंजिनं त्यांच्याप्रमाणे काम करीत राहतीलच.

परंतु, आणखीही पाच इंजिनं जोडण्याची आज आवश्यकता आहे. याबाबत काम करणार्‍यांनी त्यांचं काम करायली सुरुवात केली आहेच. मात्र, त्या अनुभवातून ज्या गोष्टी शिकायला मिळतात, त्यांचं प्रबोधन, त्यांच्यामागच्या वैचारिक बैठकीचं प्रबोधन, त्याच्यामागील दृष्टीची जाणीव लोकांना करून देणं, हे काम माध्यमांकडून व्हायला हवं. माध्यमंच नाही, तर सगळ्यांकडून ते व्हायला हवं. ’तरूण भारत’ हे केवळ वार्तापत्रच नाही, तर ते ’व्रती’ असं वृत्तपत्र आहे. ’की घेतले न हे व्रत अंधतेने। लब्धप्रकाश इतिहास निसर्ग माने। जे दिव्य, दाहक म्हणूनी असावयाचे। बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे॥’ असं ’तरूण भारत’ने जाणीवपूर्वक स्वीकारलं आहे. आजवर आपण जे निष्ठेने केलंत ते पुढेही करत राहो, यासाठी परमेश्वर आपणांस बळ देईल, असा विश्वास व्यक्त करतो. धन्यवाद!

(शब्दांकन : ओंकार मुळ्ये)

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121