मानव-व्याघ्र सहजीवनातील भीषणता दाखवणारा ‘टेरिटरी’

    02-Sep-2023
Total Views | 74
Article On Human-Tiger Conflict Territory Films

काळानुरूप मानवाच्या मूलभूत गरजा या अधिक व्यापक झाल्यामुळे माणूस निसर्गाशीदेखील दोन हात करू लागला. परिणामी, निसर्गाच्या सान्निध्यात जगणार्‍या वन्यजीवांना त्यांचा निवारा सोडून भटक्या विमुक्त जातींप्रमाणे आसरा शोधत फिरावे लागत असून, हे भयाण वास्तव जगाला समजण्याचे आणि त्यातून निसर्गाचे, प्राण्यांचे संवर्धन करण्याची खर्‍या अर्थाने गरज भासू लागली. हीच गरज सचिन श्रीराम दिग्दर्शित ‘टेरिटरी’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आली आहे.

जंगलातील बलशाली प्राणी म्हणजे वाघ. जंगलातील वाघाचे वास्तव्य जितक्या परिसरात असते आणि जिथे जिथे तो आपल्या खुणा प्रस्थापित करून ‘टेरिटरी’ तयार करतो, त्या ‘टेरिटरी’ची गोष्ट म्हणजे हा चित्रपट. एकीकडे महाराष्ट्रात वाघांची संख्या वाढत चालली, ही आनंदाची बाब जरी असली तरी तो तितकाच चिंतेचादेखील विषय. चिंता यासाठी की वाघांची हत्या करून गावकरी तर सुटकेचा नि:श्वास सोडतात. याच वाघांच्या जवळपास प्रत्येक अवयवाची तस्करी करून गावाबाहेरील लोकं त्याचा मोबदला मिळवतात आणि हेच सत्य या चित्रपटात दाखवले असून गावकरी, वाघ आणि वाघाच्या तस्करीचा शोध, याचे उत्तम चित्रण चित्रपटात पाहायला मिळते.

‘टेरिटरी’ या चित्रपटाचे कथानक सांगायचे झाल्यास, यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा जवळील टिपेश्वरच्या जंगलात वाघ मोठ्या संख्येने आढळतात. गावाची पाळंमुळं जंगलाच्या दिशेने फोफावत असल्यामुळे वाघाची ‘टेरिटरी’ दिवसेंदिवस आपसुकच कमी होत असून, परिणामी मानव-वाघ हा संघर्ष पेटलेला दिसतो. गावकर्‍यांवर वाघ हल्ला करतो आणि त्यांची गुरे मारून आपली भूक भागवतो. परंतु, माणसांवरील हल्ले आणि आपल्या गुरांचे मरण गावकर्‍यांना सहन होत नसल्यामुळे गावकरी वाघाला जीवे मारण्याचे ठरवतात. ‘लक्ष्मी’ या वाघिणीच्या दोन बछड्यांची ‘जय’ आणि ‘वीरू’ या दोन वाघांची हत्या आणि त्यांची तस्करी होण्यापासून त्यांना वाचवायला वन कर्मचारी आणि शहरातून आलेले ‘सीबीआय’ अधिकारी कसा कस लावतात, हे चित्रपटात दाखवण्यात आले आहे.

‘टेरिटरी’ या चित्रपटात वनपाल अर्थात दरोग्याची भूमिका अभिनेते किशोर कदम यांनी अत्यंत स्वाभाविकपणे निभावली आहे. वास्तविक विषयांवरील चित्रपटात भूमिका साकारण्यासाठी किशोर यांचा हातखंडा आणि त्याची प्रचिती ‘टेरिटरी’च्या माध्यमातून पुन्हा एकदा अनुभवण्यास मिळाली. चित्रपटाचा विषय हा वाघ, गावकरी, तेथील स्थानिक वन कर्मचारी आणि शहरातून आलेल्या ‘सीबीआय’ अधिकार्‍यांभोवती फिरतो. आपल्या गावात बाहेरून, शहरातून कुणी मोठे अधिकारी आले, तर गावातील पोलीस किंवा वन कर्मचार्‍यांची जी मानसिकता असते की, शहरातून आलेल्यांना आपलं गाव, जंगल आणि आपला वाघ काय समजणार? हा विचारांचा धागा दिग्दर्शक सचिन यांनी अगदी घट्ट पकडला आहे.

तसेच, गावातील दरोगा म्हणजेच वनपालाची स्वभाव वैशिष्ट्ये, वागण्या-बोलण्याची पद्धत, विचारधारा हीदेखील लेखनातून, दिग्दर्शनातून आणि सरतेशेवटी अभिनयातून ठळकपणे अधोरेखित झालेली दिसते. दुसरीकडे गावकर्‍यांसाठी वाघ हा केवळ वन अधिकार्‍यांच्या मालकीचा असून, त्याचा गावकर्‍यांच्या ‘टेरिटरी’त वाढलेला वावर माणसांना किती खालच्या स्तरावर नेऊ शकतो, हेदेखील अत्यंत खुबीने दिग्दर्शकाने दाखवले आहे. वाघाला सामोरं जाताना उत्स्फूर्तपणे किंवा स्वाभाविकपणे गावकर्‍यांच्या हातून घडलेली कृती ही वन्यजीवांपेक्षा किती हिंस्र असू शकते, याचीही प्रचिती हा चित्रपट बघताना नक्कीच येते.

हुशार, चपखल, बुद्धिमान, चौकस विचार करणारा असा ‘सीबीआय’ अधिकारी अभिनेते संदीप कुलकर्णी यांनी हुबेहुब साकारला. गावातील लोकांची विचारधारा, तेथील स्थानिक वन कर्मचार्‍यांची मानसिकता या सगळ्यांचा सारासार विचार करत वाघांच्या तस्करीचा शोध एक-एक धागेदोरे पकडून कसा घेतला जातो, याचे उत्तम प्रतिनिधित्व संदीप यांनी केले. दरम्यान, सचिन श्रीराम यांचा दिग्दर्शकीय पदार्पण असलेल्या या चित्रपटात त्यांनी स्थानिक कलाकारांना दिलेले प्राधान्य वाखाण्याजोगे आहे. संदीप कुलकर्णी यांचे पात्र सुरुवातीपासूनच तथ्याला पकडून चालणारे दाखवले असले, तरी चित्रपटाच्या शेवटच्या वळणावर मात्र एका प्रसंगात त्या पात्राची तथ्यहीनता कथानक संपवण्याच्या जिद्दीने हरवल्यासारखी वाटते. त्याव्यतिरिक्त विदर्भाच्या एका लहानशा खेड्यातील संस्कृती, गावकर्‍यांचे स्वभाव गुण, गावातील प्रत्येक जनावराचा जगण्यासाठीचा संघर्ष आणि एकूणच चित्रपटाची कथा, चित्रीकरण, अभिनय या सर्वच बाबी जमेच्या म्हणाव्या लागतील.

भल्यामोठ्या जंगलात वाघांची ‘टेरिटरी’ असते आणि कोणत्या वाघाची ‘टेरिटरी’ कुठून कुठवर आहे, हे त्या प्रत्येक वाघाच्या निशाणीच्या खुणा कशा वेगळ्या आहेत आणि त्या गावातील तज्ज्ञ माणूस त्या खुणा कशा ओळखतो, याचे बारीक-बारीक धागेदोरे उत्तमरित्या पकडून या चित्रपटात मांडण्यात आले आहेत. या चित्रपटात जशी गावकर्‍यांची एक बाजू आहे, तशीच वाघाची बाजूदेखील सांगण्यात आली आहे. स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी वाघ शिकार करीत असतो. परंतु, वाघ आपले भक्ष्य म्हणून माणसाला ग्रहण करत नाही, हे सत्यदेखील सांगितले आहे. तसेच, पैशांच्या मोहापायी वाघाला जीवे मारून त्याच्या प्रत्येक अवयवाची तस्करी करून, त्या निष्पाप जीवाला मरणानंतरही मनुष्य किती वेदना देऊ शकतो, याचे वेदनादायी सत्य मन पिळवटून टाकते.

वन अधिकार्‍यांचा पदानुक्रम असतो. कोणत्याही सरकारी कर्मचार्‍याचा त्यांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांसोबत वागण्या-बोलण्याचा देखील एक विशिष्ट ‘प्रोटोकॉल’ असतो. आपल्यापेक्षा वरिष्ठ वन अधिकार्‍यांसमोर उभे असताना किंवा त्यांच्यासमोर जाताना बोलण्याची ‘जय हिंद’ करण्याची एक विशिष्ट पद्धत असते, हे कायद्याचे बारकावे काही अंशी दिग्दर्शकांच्या हातून निसटल्याचे जाणवते. परंतु, गावातील असूनही गावकर्‍यांच्या विरोधात जाणारा वन कर्मचारी आणि शहरातून येऊनही गावकर्‍यांच्या बाजूने विचार करणारा ‘सीबीआय’ अधिकारी, ही दोन्ही पात्र चित्रपटाच्या सुरुवातीपासून ते शेवटापर्यंत आपापल्या ठरावीक मुद्द्यांवर ठाम असतात आणि शेवटी दोघांच्या त्या मतांना एक प्रेक्षक म्हणून आपणही दुजोरा देऊन जातो, हे अप्रत्यक्ष पण ठळकपणे मनाला भिडण्याचे काम दिग्दर्शकांनी योग्यरित्या केले आहे.

दरम्यान, संपूर्ण चित्रपटात प्रत्यक्ष वाघाचे चित्रीकरण दिसत नसले, तरी टिपलेल्या वाघांच्या व्हिडिओ संग्रहाचा योग्य वापर करण्यात आला आहे. संपूर्ण चित्रपटात आशिया खंडातील सर्वात मोठा वाघ ‘जय’ याच्या नावाचा संदर्भ घेत चित्रपटाचे कथानक रंगवत वाघांच्या तस्करीचे वास्तव उलगडत जाते. जनमानसामध्ये भूतदयेपेक्षा वन्यजीवांच्या संवर्धनाचा दृष्टिकोन रुजवण्याची अधिक गरज आहे, याची जाणीव चित्रपटाचे कथानक अप्रत्यक्षरित्या करुन देते. माणसाची मानसिकता घटनांच्या अनुक्रमे बदलत जाते, मात्र, मूक प्राण्यांचा स्वतःच्या स्वार्थासाठी वापर करत आपला जीव वाचवण्यासाठी आणि कायद्याच्या चौकटीत अडकावे लागू नये, म्हणून त्यांच्या जीवाची किंमत करणारा मनुष्य कसा असू शकतो, याचे वास्तवादी दर्शन घडवणारा चित्रपट म्हणजे ‘टेरिटरी.’

चित्रपट : टेरिटरी
दिग्दर्शक : सचिन श्रीराम
कलाकार : संदीप कुलकर्णी, किशोर कदम
रेटिंग : **** 

रसिका शिंदे-पॉल

अग्रलेख
जरुर वाचा
काँग्रेस संबंधित कंपन्यांवर ईडीची टांगती तलवार, कार्यवाहीस लवकरच सुरूवात होणार

काँग्रेस संबंधित कंपन्यांवर ईडीची टांगती तलवार, कार्यवाहीस लवकरच सुरूवात होणार

ED काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांच्याशी संबंधित असणार्‍या कंपनीवर सक्तवसुली संचालनालयाने शनिवारी कार्यवाहीस सुरूवात केली. या मालमत्तेत दिल्ली, मुंबई आणि लखनऊमधील प्रमुख असणाऱ्या मालमत्तांचा समावेश आहे. काँग्रेसच्या संबंधित असणाऱ्या कंपनीशी नॅशनल हेराल्ड प्रकरणात असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड कंपनीकडे ६०० कोटी रुपयांहून अधिक किंमतीची मालमत्ता असल्याचे बोलले जात आहे. त्यापैकी देशाची राजधानी दिल्लीतून बहादूर शाह जाफर मार्गावरील प्रतिष्ठित हेराल्ड हाऊस आहे...

अजमेरमध्ये २३ वर्षांपूर्वी भारतात अवैधपणे घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

अजमेरमध्ये २३ वर्षांपूर्वी भारतात अवैधपणे घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Bangladeshi राजस्थानातील अजमेर पोलिसांनी २३ वर्षांपूर्वी भारतात घुसखोरी केलेल्या बांगलादेशी घुसखोरी व्यक्तीच्या मुसक्या आवळल्या आहेत. व्हिसाशिवाय अवैधपणे बांगलादेशी व्यक्तीने भारतात घुसखोरी केली आणि त्याला तब्बल २३ वर्षानंतर ताब्यात घेण्यात आले आहे. संबंधित अवैधपणे घुसखोरी करणाऱ्याचे नाव हे मोहम्मद शाहिद असून त्याचे वय वर्षे हे ४० आहे. तो अजमेरमधील अंदर कोट परिसरात अवैधपणे वास्तव्य करत होता. एटीएएफने एकूण अकरा कारवायांमध्ये एकूण २१ घुसखोरांना पकडले आहे. दरम्यान, आता दर्गा पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121