घारापुरी मोहीम फत्ते; समुद्राखालील चौथ्या केबलला दुरुस्त करण्यात महावितरणला यश
18-Sep-2023
Total Views | 205
मुंबई : देशाच्या इतिहासात प्रथमच समुद्र तळाखालून सर्वात लांब म्हणजेच ७ कि. मी. केबल टाकून विद्युतीकरण करण्यात आलेल्या तसेच जागतिक वारसा असलेल्या घारापुरी बेट. स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतर प्रथमच या बेटावर वीज २०१८ साली वीज पोहोचली असून यासाठी २२ केव्ही, सिंगल कोअर सबसी केबल (३+१अतिरिक्त केबल) समुद्राखालून टाकण्याचा पराक्रम महावितरणने केला आहे.
या चार केबल्स पैकी दोन केबल्स नाव्हा खाडी ते मोराबंदर दरम्यान समुद्रामध्ये नादुरुस्त झाल्यामुळे घारापुरी बेटावरील राजबंदर, शेतबंदर, मोराबंदर या तिन्ही गावांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. सदर वीजपुरवठा २ फेज द्वारे चालू करण्यात आला होता. परंतु, थ्री फेज वीजपुरवठा नसल्यामुळे पाणीपुरवठा करणारा विद्युत पंप बंद झाला होता. समुद्राच्या आत असलेल्या केबल मधील दोष शोधणे व दोष नक्की कोणत्या ठिकाणी आहे ते ठिकाण शोधणे . तसेच, दोषी केबल पाण्यावर ठेवून त्यास सबमरीन जोईंट मारणे अशी आव्हानात्मक कामे महावितरण पुढे होती. सर्व केबल्स एकाच रंगाचे असल्यामुळे केबल्स मधील दोष शोधण्याचे काम अतिशय अवघड झाले होते. पावसाळी, वादळी वातावरण, खवळलेला समुद्र, समुद्राचा तळामध्ये असलेला पाण्याचा दाब व पाण्याखाली वाहणारे प्रवाह यामुळे आव्हान अधिकच कठीण होते. आपल्या जीवाची पर्वा न करता महावितरणने हे आव्हान स्वीकारले. त्यांच्या ३७ दिवसांचा अथक प्रयत्नांमुळे एका नादुरुस्त केबल्सचा दोष काढून केबल चालू करण्यात आली व घारापुरी बेटावरील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.
महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी घारापुरीचा वीजपुरवठा लवकरात लवकर सुरळीत करण्याचे निर्देश दिले होते. या कामाबाबत संचालक (संचलन) संजय ताकसांडे सातत्याने कामाचा आढावा घेत होते. अशा कामासाठी मुख्यालयातून आवश्यक असलेली पूर्ण मदत त्यांनी दिली होती. सह व्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे व भांडूप परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनिल काकडे यांनी जातीने लक्ष देऊन कामाला गती देण्यासाठी वाशी विभागाचे अधीक्षक अभियंता (प्रभारी), श्री.सिंहाजीराव गायकवाड यांना विशेष सूचना दिल्या होत्या.
घारापुरी येथील दोन नादुरुस्त सिंगल कोर समुद्राखालील केबल मधील दोष समुद्राच्या आत असल्यामुळे ते शोधणे अत्यंत कठीण होते. वादळ वाऱ्यासहित प्रचंड मुसळधार पाऊस, समुद्रातील भरती ओहोटी व त्यामुळे उदभवणारी अपरिहार्य परीस्थितीवर मात करत नादुरुस्त सिंगल कोर केबलमधला दोष शोधण्याचे काम पनवेल शहर विभागाअंतर्गत असलेल्या भिंगरी उपविभागातील कर्मचाऱ्यांनी, अति. कार्यकारी अभियंता, देविदास बैकर यांच्या नेतृत्वाखाली केले व संततधार पावसात युध्दपातळीवर काम करून २६ जुलै २०२३ रोजी तीनही गावांना पुन्हा प्रकाशमय केले.
या सर्व कामामध्ये महावितरणला मोलाची मदत मे. सी हॉर्स सर्विसेस या कंपनीचे चेतन पवित्र व विश्वनाथ भोईर या भूमिपुत्रांनी ५ ते ६ गोताखोरांच्या मदतीने प्रयत्नाची शर्थ केली व त्यामुळेच महावितरणला समुद्राखालील नादुरुस्त केबल दुरुस्त करणे शक्य झाले. या कामासाठी आवश्यक असलेले तांत्रिक मदत करण्याचे काम मे.श्वेता पाॅवरटेक चे रामावतार सिंग चौहान यांनी वेळोवेळी येऊन दिला. तसेच प्रकाश इलेक्ट्रिकल्स चे भोसले व बाळू. तसेच, मे. ओम इलेक्ट्रिकल्स यांची पण महावितरणला मदत झाली. यांच्या बरोबर मे. भाग्यलक्ष्मी बोटचे पाटील यांनी सुद्धा आवश्यकते प्रमाणे बोटी उपलब्ध करून दिल्या.
मे. पोशा अॅन्ड कंपनीचे वैष्णव यांनी केबल जोईंटचे काम केले. या सर्वांच्या प्रयत्नांमुळे व महावितरण कोंकण प्रादेशिक विभागाचे सह व्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे, मुख्य अभियंता सुनील काकडे व अधीक्षक अभियंता (प्रभारी) सिंहाजीराव गायकवाड यांनी वेळोवेळी समुद्रावर प्रत्यक्ष जाऊन योग्य मार्गदर्शन केले व अधिकारी , कर्मचारी व अजेन्सीच्या कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य उंचावले. कार्यकारी अभियंता सतीश सरोदे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता देविदास बैकर सहाय्यक अभियंता रणजीत देशमुख व गव्हाण विभागातील प्रत्येक कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या विशेष मेहनतीमुळे सर्व विपरीत परिस्थितीवर मात करून चौथी अतिरिक्त केबल सुद्धा दुरुस्त करून घारापुरीचा वीजपुरवठा पूर्ववत करण्याची मोहीम फत्ते केली.