मुंबई : जगप्रसिद्ध कवी रवींद्रनाथ टागोर यांच्याशी संबंधित असलेल्या शांतीनिकेतनचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे. रविवारी सौदी अरेबियामध्ये झालेल्या जागतिक वारसा समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यात शांतिनिकेतन आश्रम आहे.
१८६३ मध्ये रवींद्रनाथ टागोर यांचे वडील देवेंद्रनाथ टागोर यांनी शांतिनिकेतनची आश्रम म्हणून सुरुवात केली होती. त्यानंतर रवींद्रनाथ टागोर यांनी १९०१ मध्ये प्राचिन भारतातील गुरुकुल पद्धतीवर आधारित निवासी शाळा आणि कला केंद्रात शांतिनिकेतनचे रुपांतर केले.
पुढे १९२१ मध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी याठिकाणी विश्व भारतीची स्थापना केली. १९५१ मध्ये त्याला केंद्रीय विद्यापीठ आणि राष्ट्रीय महत्त्वाची संस्था म्हणून घोषित करण्यात आले. रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांच्या आयुष्यातील बराच काळ शातिनिकेतनमध्येच घालवला.
आता शांतीनिकेतनचा जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे. याविषयी प्रतिक्रिया देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे प्रतीक असलेल्या शांतीनिकेतनचा जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा मला आनंद आहे. सर्व भारतीयांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे.
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनीदेखील याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, देशातील पहिले नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांना हीच खरी श्रद्धांजली आहे. दरम्यान, शांतीनिकेतनचा जागतिक वारसा यादीत समावेश करण्याच्या घोषणेनंतर विश्वभारती विद्यापीठात आनंद साजरा करण्यात येत आहे. विद्यापीठाच्या इमारती आणि परिसर रंगीबेरंगी दिव्यांनी सजवण्यात आला होता.