‘एल निनो’ आणि भडकते वणवे

    18-Sep-2023   
Total Views |
Indonesia battles forest fires as dry season continues

गेल्या काही दिवसांपासून इंडोनेशियातील अनेक भागांत वणवे लागण्याचे प्रमाण वाढले असून सर्वत्र धुराचे लोट पसरले आहेत. याचे कारण म्हणजे ‘एल निनो’च्या वाढत्या प्रभावामुळे हवामान अधिक शुष्के होऊन ते आगीसाठी अधिक अनुकूल होते. इंडोनेशिया सरकारच्या पर्यावरण आणि वन मंत्रालयाने यावर्षी दि. १ जानेवारी ते ५ सप्टेंबर या कालावधीत वणवे पेट घेतील असे ३ हजार, ७८८ हॉटस्पॉट जाहीर केले आहेत. मागील वर्षी याच कालावधीतील ‘हॉटस्पॉट’च्या तुलनेत ही संख्या चारपटीने वाढली आहे.

यातील बहुतांश हॉटस्पॉट हे उत्तर सुमात्रा, रियाउ, जाम्बी, दक्षिण सुमात्रा, पश्चिम कालीमंतन, मध्य कालीमंतन, दक्षिण कालीमंतन, पूर्व कालीमंतन, उत्तर कालीमंतन आणि पापुआ या दहा प्रांतांमध्ये आहेत. या प्रांतांमधील हवामानाच्या परिस्थितीमुळे ऐतिहासिकदृष्ट्यादेखील या भागांमध्ये वणवे लागण्याची शक्यता जास्तच राहिली आहे. या प्रांतांमध्ये जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत २ हजार, ६०८ हॉटस्पॉट्स ओळखले गेले आहेत. हे हॉटस्पॉट्स २०२२ मधील याच कालावधीतील हॉटस्पॉटच्या तुलनेत जवळपास सहापटीने वाढले आहेत. सतत पेटणार्‍या वणव्यांच्या धुरामुळे अनेक मोठ्या शहरांमध्ये नागरिकांना श्वास घेणेदेखील कठीण झाले होते. दक्षिण सुमात्राची राजधानी पालेमबांगमध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिक भाग असल्यामुळे तेथील नागरिकांना याचा मोठा फटका बसला.

इंडोनेशियातील हवामान संस्था, (BMKG)च्या आकडेवारीनुसार, अलीकडे पालेमबांगमधील हवेची गुणवत्ता अधिकच खराब आहे. येथील हवेतील प्रदूषकांचा एक वर्ग इतका सूक्ष्म आहे की, ते श्वासनलिकेद्वारे मानवी शरीरात शिरकाव करते आणि श्वसनरोगास कारणीभूत ठरते. सप्टेंबरच्या सुरुवातीपासून सुमारे ६० मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटर(µg/m3) इतकी प्रदूषके हवेत आढळून आली आहेत. ‘युएस एन्व्हायर्नमेंटल प्रोटेक्शन एजन्सी’ (EPA) च्या मानकांनुसार, या श्रेणीतील हवेची गुणवत्ता धोकादायक आहे आणि याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. या खराब हवेच्या गुणवत्तेचा परिणाम पालेमबांग येथे राहणार्‍या अनेक रहिवाशांवर झाला आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, या वर्षी जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये ‘अप्पर रेस्पीरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन’ची प्रकरणे चार हजारांनी वाढली आहे. ‘बीएमकेजी’नुसार जमीन आणि जंगलातील वाढत्या आगीच्या प्रमाणाला ‘एल निनो’ कारणीभूत आहे.

२०१९ नंतर पुन्हा ‘एल निनो’चा परिणाम दिसून येत आहे. परंतु, तेथील तज्ज्ञांच्या मते, ‘एल निनो’मुळे फक्त हवामान कोरडे होते आणि आग लागण्यास पोषक ठरते. परंतु, जंगलाला लागलेली आग साहजिकच मानवाकडूनच लावण्यात आली आहे. कार्बन-समृद्ध परिसंस्था असलेल्या पीटलॅण्ड्समध्ये ज्वलन प्रक्रिया झाल्यावर मोठ्या प्रमाणात कार्बनडाय ऑक्साईडचे उत्सर्जन होते. या आगी लागण्याच्या घटना इंडोनेशियाच्या हरितगृह वायू उत्सर्जनात लक्षणीय योगदान देतात.

पीट वॉचडॉग पंताऊ गंबुट यांनी केलेल्या निरीक्षणात ऑगस्टमध्ये पीट लॅण्डस्केप भागात १४ हजार, ४३७ हॉटस्पॉट्स आढळून आले आहेत. या आकडेवारीनुसार, ८९ जिल्हे आणि १९ प्रांतांमध्ये २७१ पीट भागात आग लागली. पर्यावरणीय ’एनजीओ’च्या मदतीने केलेल्या आणखी एका विश्लेषणात जानेवारी ते ऑगस्ट २०२३ या कालावधीत एकूण ४५ हजार हेक्टर (१,११,१९७ एकर) पीट इकोसिस्टम जळल्याचे दिसून आले.पीटलॅण्डवरील आग ताबडतोब हाताळणे आवश्यक आहे. या आगींमुळे धुराचे लोट निर्माण होतात जे सार्वजनिक आरोग्यासाठी घातक आहे आणि यामुळे आर्थिक नुकसान देखील होऊ शकते.

दरम्यान, २०१५ आणि २०१९ मध्ये, आगीत अनुक्रमे २.६१ दशलक्ष हेक्टर (६.४५ दशलक्ष एकर) आणि १.६४ दशलक्ष हेक्टर (४.०५ दशलक्ष एकर) जमीन जळून खाक झाली. २०१५ आणि २०१९च्या आगीचे प्रसंग इतके गंभीर होते की, त्यांनी मलेशिया आणि सिंगापूरमध्ये मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले होते. ‘बीएमकेजी’च्या तज्ज्ञांनुसार, ‘एल निनो’चे पुनरागमन होऊनही यावर्षी आगीचा धोका २०१५ आणि २०१९च्या तुलनेत कमी आहे. हॉटस्पॉट्सची संख्या वाढत असतानाही, यावर्षी सीमापार धुकेच्या समस्येची पुनरावृत्ती होणार नाही, असे देशाच्या आपत्ती निवारण एजन्सी, ‘बीएनपीबी’च्या प्रमुखांचे मत आहे. सरकारने कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केल्यास आगींचे प्रमाण कमी करण्यात यश मिळू शकते.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

उमंग काळे

पर्यावरण प्रतिनिधी, वन्यजीव छायाचित्रकार.
 
जंगलात फिरून विविध जीव कॅमेरात कैद करण्याची आवड, मध्य भारतातील बहुतांश जंगलात फिरण्याचा अनुभव. रामनारायण रुईया महाविद्यालयातून 'बी. एम. एम.' पदवी प्राप्त करून पर्यटन शास्त्रात पदव्युतर शिक्षण. आणि नाविन्याचा ध्यास.