इम्फाळ : मणिपूरमध्ये रजेवर गेलेल्या डिफेन्स सर्व्हिसेस कॉर्प्स (DSC) मधील भारतीय सैन्यातील 41 वर्षीय सेर्टो थांगथांग कॉमची हत्या करण्यात आली आहे. कॉम या भारतीय लष्कराच्या जवानाचे अज्ञात लोकांनी अपहरण केले आणि नंतर त्यांची हत्या केली.
वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मणिपूरमधील लिमाखॉंग मिलिटरी स्टेशनवर तैनात भारतीय लष्कराचे जवान रजेवर आपल्या घरी आले होते. दरम्यान ही धक्कादायक घटना इम्फाळ पश्चिम येथील तरुंग येथे घडली. हे ठिकाण त्यांच्या घरापासून सुमारे 14 किलोमीटर अंतरावर आहे. जिथे अज्ञात हल्लेखोरांनी त्यांची गोळ्या झाडून हत्या केली.
या प्रकरणात, अधिकाऱ्यांनी सांगितले की, दि. १७ सप्टेंबर रोजी मणिपूरच्या इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील सोगोलमांग पोलिस स्टेशन अंतर्गत मोंगजामच्या खुनिंगथेक गावात एका भारतीय लष्कराच्या जवानाचा मृतदेह सापडला होता. कांगपोकपी जिल्ह्यातील लिमाखोंग येथे लष्कराच्या संरक्षण सुरक्षा कॉर्प्स (DSC) प्लाटूनचा सेर्टो थांगथांग कोम असे त्यांचे नाव आहे. त्यांचा भाऊ आणि मेहुण्यांनी मृतदेहाची ओळख पटवली आहे. डोक्यात एकच गोळी लागून जवानाची हत्या झाल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान स्थानिक पोलीस शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत आहेत.
या प्रकरणाची माहिती देताना, जनसंपर्क अधिकारी (पीआरओ) आणि संरक्षण मंत्रालय, नागालँड, मणिपूर आणि उर्वरित अरुणाचल प्रदेशचे प्रवक्ते यांनी देखील सोशल मीडियावर लिहिले आहे की कॉम हे तरुंग येथे सुट्टीवर आले असताना त्यांचे अपहरण करण्यात आले. आणि नंतर त्यांची हत्या करण्यात आली. कॉम यांना पत्नी आणि दोन मुले आहेत.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १६ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास रजेवर असलेल्या कॉन्स्टेबल कॉम यांचे अज्ञात सशस्त्रधारी लोकांनी त्यांच्या घरातून अपहरण केले. त्यानंतर स्थानिक पोलीस आणि लष्कर सतत जवानाचा शोध घेत होते.
या संपूर्ण घटनेचा साक्षीदार असलेल्या कॉमच्या १० वर्षाच्या मुलाच्या म्हणण्यानुसार, त्याने सांगितले की, अचानक तीन बदमाश घरात घुसले, त्यावेळी जवान कॉम घराच्या व्हरांड्यावर बसून त्याच्याशी बोलत होते. अचानक त्यांनी वडिलांच्या डोक्यात पिस्तूल रोखले आणि बळजबरीने त्यांना पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये बसवले आणि सोबत घेऊन गेले.
दरम्यान लष्कराकडून मिळालेल्या माहितीनुसार, या जवानाच्या पश्चात पत्नी, एक मुलगी आणि एक मुलगा असा परिवार आहे. लष्कराने माहिती देताना सांगितले की, कुटुंबीयांच्या इच्छेनुसार अंत्यसंस्कार केले जातील. पीडित कुटुंबाला शक्य ती सर्व मदत करण्यासाठी लष्कराने दिल्लीहून एक पथक पाठवले आहे. या हत्याकांडाचा तीव्र निषेध करतो आणि या कठीण प्रसंगी त्यांच्या कुटुंबासोबत उभे असल्याचे लष्कराने एक निवेदन जारी केले आहे.