अनेक भारतीय शास्त्रांपैकी योग व मानसशास्त्र यांच्यावर अमेरिकेत होत असलेल्या संशोधनात भाग घेतलेल्या व अशाच इतर ठिकाणी भाग घेतलेल्या डॉ. आइन्स्टाईन व डॉ. ग्रीन यांसारख्या संशोधकांबरोबर चर्चा केलेल्या जगप्रसिद्ध सामाजिक मानसशास्त्रज्ञ, संशोधक व अध्यापक डॉ. पंढरीनाथ प्रभू यांनी लिहिलेल्या ‘भारतातील शास्त्रांचा उद्गम व विकास ः मानससामाजिक मूलाधार व आज घ्यावयाचे धडे,’ यात अनेक संदर्भ तपासून लिहिलेल्या व विद्वानांची मान्यताप्राप्त ग्रंथातील विवेचन नुकत्याच संपन्न झालेल्या ‘जी २०’ परिषदेच्या निमित्ताने थोडक्यात मांडत आहे.
गेली नऊ वर्षे भारताच्या पुढाकाराने ‘संयुक्त राष्ट्रसंघा’ने पृथ्वीच्या उत्तर गोलार्धातला सर्वात मोठा दिवस २१ जून हा ’जागतिक योग दिन’ म्हणून साजरा करण्याचे जाहीर केल्यापासून जगात योगासने करून तो साजरा केला जातो. गेल्यावर्षी दि. २१ जूनला भारतातही हिमालयातल्या उंच ठिकाणापासून ते समुद्राच्या खोल पाण्यात योगासने करून, नवनवे विक्रम केले गेले व त्यांच्या जाहिराती केल्या गेल्या. हे सर्व पाहिल्यावर ‘योग दिन’ हा फक्त ‘इव्हेंट’ करण्याचा दिवस आहे की, नियमित आचरण करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठीचा दिवस आहे, याची शंका निर्माण होते. भारतातील अतिप्राचीन ऋषि-मुनींनी ध्यानस्थ बसून अंतःप्रज्ञेद्वारा जी शास्त्रीय ज्ञानसंपदा निर्माण केली, त्या शास्त्रांनुसार यज्ञ, संस्कार इत्यादी विधींचे शास्त्रीय तंत्रज्ञान व त्या आधारित जीवनशैली निर्माण केली. अशा ज्योतिर्गणित, ज्योतिष, आयुर्वेद, योग विद्या, अध्यात्मशास्त्र किंवा मानसशास्त्र या भारतीय शास्त्रांबद्दल आम्हा भारतीयांना किती माहिती आहे. हाही प्रश्न निर्माण होतो.
योगविद्या व अध्यात्म किंवा मानसशास्त्र (मेडिटेशन) या नित्य आचरणाच्या क्रियांपासून कोणते फायदे होतात, याबद्दल काही सन्मान्य अपवाद सोडले, तर आपण सामान्यजन अजूनही अनभिज्ञ आहोत. ही वस्तुस्थिती आहे. ’लोका सांगे ब्रम्हज्ञान, स्वतः कोरडे पाषाण’ अशी आपली परिस्थिती आहे.वैद्यकशास्त्र व आरोग्य यांच्याशी निकटचा संबंध असलेला; परंतु स्वतंत्रपणे निर्माण व विकसित झालेला आणि तोही केवळ भारतात, असा शास्त्रीय विषय म्हणजे ’योगशास्त्र’ हा आहे. वैद्यकशास्त्राप्रमाणे ’योगशास्त्र’ शास्त्र (थिअरी) व व्यवहार (प्रॅक्टिस) आहे व हे दोन्ही भाग एकमेकांशी निगडित आहेत. वैदिक काळापासून काही पिढ्या व शतके प्रचलित असलेले, विखुरलेले व गुरू-शिष्य परंपरेने चालत आलेले योगविद्या संबंधीचे प्रचंड व्याप्तीचे सर्व सैद्धांतिक ज्ञान, पतंजली मुनींनी एकत्र करून, सुसंगतरितीने, पद्धतशीरपणे थोडक्या शब्दांत सूत्रबद्ध, म्हणजे केवळ १९६ सूत्रांत पराकाष्टेच्या कौशल्याने ग्रंथित केले. पतंजलींचा ’पातंजल योगसूत्र’ हा ग्रंथ प्रचंड ज्ञानभांडार संक्षेपात मांडण्याच्या कलेचा एक अत्युत्कृष्ट नमुना आहे व त्यासाठी त्यांनी आपल्या अंतःप्रज्ञेचाच उपयोग प्रामुख्याने केला आहे.
योग म्हटल्या नंतर आपल्या मनात योगासनांचे निरनिराळे शारीरिक प्रकार (योगासने) उभे राहतात.ते सर्व शरीरावर व शरीराच्या अंतर्बाह्य व्यवहारांवर हळूहळू मनाचे प्रभुत्व प्रस्थापित करण्याकरिता करावयाचे असतात. हे ’हठयोगचा’ भाग आहेत.पतंजलींचे ध्येय हठयोगसारखे ’मनाचे प्रभुत्व शरीरावर प्रस्थापित करणे.‘ एवढ्यापुरते मर्यादित नाही, तर त्यापुढे जाऊन ’व्यक्तीचे मन, शरीर, निसर्ग व एकंदर परिसर यांचे एकत्व यांचा ’योग’ म्हणजे अंतिम पातळीवरचा ’योग’ प्रस्थापित करणे. हे आहे. हे उच्च ध्येय, हा खरा अंतिम योग, हा पतंजलीच्या योगसूत्रांचा विषय असल्याने ‘पातंजल योग’ला ’राजयोग’ असे म्हणतात. प्राथमिक योगसाधनेने योग्याला प्रथम मन व इच्छाशक्ती यांच्या शरीरावर असलेल्या अधिकाराचा शोध लागतो. याचा परिणाम म्हणजे, शरीरातील व शरीराबाहेरील ‘अनैच्छिक क्रिया’ त्याच्या इच्छेच्या आधीन(ऐच्छिक) झाल्या आहेत, असे आढळून येते. पुढल्या पायरीवरच्या योगसाधनेने निसर्गावर आपले प्रभुत्व आहे, असे अनुभवास येते, अशा प्रकारे योगसाधना करीत असताना योग्याला ज्या निरनिराळी शक्ती किंवा सामर्थ्ये प्राप्त होतात, त्यांना ’सिद्धी’ म्हणतात. या सिद्धींची प्रात्यक्षिके पाहून व सर्व प्रकारच्या शास्त्रीय खबरदार्या घेऊन तपासणी केली असता. त्या खर्या असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यापैकी काही सिद्धी अशा आहेत-भूत व भविष्याचे ज्ञान, पशुपक्ष्यांच्या बोलीचे ज्ञान, मनकवडेपणा, अंतर्धान पावणे, दूरचे दिसणे, भुकेवर ताबा मिळवणे, इत्यादी. अष्टसिद्धी ‘अणिमा, महिमा, गरिमा, लघिमा, प्राप्ती, प्राकाम्य, ईशित्व, वशित्व’ व आणखीही काही सिद्धी आहेत.
योगविद्येने पाश्चात्यांनी रूढ केलेल्या ’फिजिओलॉजी व न्यूरोलॉजी’ या वैद्यकीय विषयांत मोठी क्रांती घडवून आणली आहे. १९६२ साली अत्याधुनिक यंत्रोपकरणांच्या साहाय्याने योगविद्येचा व्यवहारोपयोगी अभ्यास व संशोधन सुरू झाले. योग्यांवर प्रयोग करून ते ध्यानावस्थेत असताना त्यांच्या मेंदूतून निघणार्या सूक्ष्म विद्युत तरंगांचे (ब्रेन व्हेव्ज) ज्ञान झाले. ज्या तरंगांद्वारे मेंदूचे संदेश विविध अवयवांकडे जाऊन त्यांचे पुन्हा मेंदूकडे उत्तर पाठवणे, या क्रियेला ’जैवप्रतिसंभरण’ किंवा ’बायोफीडबॅक’ म्हणतात. योग्यांच्या ध्यानस्थ अवस्थेत निर्माण होणार्या, या ’बायोफीडबॅक’ क्रियेचे तंत्र (बायोफीडबॅक ट्रेनिंग/थेरपी ः बीएफटी) कृत्रिमरितीने निर्माण करून व त्याचा प्रयोग अनेक रुग्णांवर करून अर्धशिशी, निद्रानाश, पक्षाघात, हृदयविकार, चिडचिड, आत्मविश्वासाचा अभाव अशा अनेक व्याधींवर यशस्वी उपचार केले जात आहेत.
१९२५ साली जन्मलेल्या व वयाच्या २४व्या वर्षी ‘करवीर पीठा’चे शंकराचार्य म्हणून नियुक्ती झालेल्या स्वामी राम या योगी महाराजांनी परदेशात जाऊन आधुनिक विज्ञानाच्या संकेतानुसार, योगशास्त्र प्रायोगिक विज्ञानाच्या शाखेत आणण्याचा प्रयत्न करणार्या शास्त्रज्ञांस साहाय्य करावे, अशी अंतःप्रेरणा झाल्यावर युरोपमध्ये तीन वर्षे पाश्चात्य मानसशास्त्र, तत्त्वज्ञान व वैद्यकशास्त्र यांचा अभ्यास केला. १९७० साली डॉ. ग्रीन व त्यांचे सहकारी यांनी स्वामी राम यांच्यावर आधुनिक उपकरणे वापरून व शास्त्रीय संशोधनाचे सर्व नियम पाळून अनेक प्रयोग केले. स्वामी राम यांनी हृदयाचे ठोके कमी जास्त करणे, रक्त प्रवाहावर नियंत्रण दाखवणे, दूर ठेवलेली सुई मनाच्या शक्तीने फिरवून दाखवणे असे अनेक प्रकार केले. त्यांचे निष्कर्ष व नोंदणी आजही उपलब्ध आहेत. तसेच, ’बायोफीडबॅक’द्वारे केलेल्या अनेक रोगोपचारांवरील संशोधन आज उपलब्ध आहे. आजही १४० पेक्षा जास्त संस्थात ‘बीएफटी’ व योगिक शक्तीवर संशोधन चालू आहे.
शिक्षणात, प्रजनन शास्त्रात व वेदना नियंत्रण शास्त्रात ‘बायोफीडबॅक’ साधनांची निर्मिती करून उपचार करण्याच्या अनेक संधी निर्माण होत आहेत.अलीकडे अमेरिकेत व भारतातही महर्षी महेश योगी यांच्या ’ट्रान्स्डेन्टल मेडिटेशन’(टीएम) या विषयाचे आकर्षण लोकांत वाढू लागले असून, अमेरिकेत ’महर्षी इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी’ म्हणून याच विषयाच्या संशोधन व शिक्षणाला वाहून घेतलेले एक विश्वविद्यालय स्थापन झाले आहे.भारतीय शास्त्रांचे महत्त्व व त्यांची सत्यता जाणवल्याने अमेरिकेतल्या शालेय शिक्षणापासून ते सैनिकी, अंतराळवीर व युनिव्हर्सिटींच्या शिक्षणक्रमात योग-प्राणायाम व ध्यान (मेडिटेशन) यांचा समावेश करण्यात आला असून, डॉक्टरेट सारख्या उच्च पदव्या घेण्याचीही सोय उपलब्ध आहे.थोडक्यात, औषधे, डॉक्टर व इतर कोणत्याही बाह्य वस्तू व बाह्य उपचारांवर अवलंबून राहण्याची गरज नसून, आपल्या शारीरिक व मानसिक रोग व्याधींवर स्वतःच यशस्वी उपचार करून, आपले स्वास्थ्य आपणच जपणे. हे आपल्याच हातात आहे.तसेच, आजच्या प्रदूषित पर्यावरण, अन्नधान्यात व नित्य उपयोगाच्या वस्तूत आढळणार्या कृत्रिम रसायनांच्या प्रभावामुळे मनुष्याची रोगप्रतिकारक व रोगनिवारक शक्ती कमी-कमी होत आहे व त्यामुळे स्थूलता, मधुमेह, हृदयविकार, मूत्रपिंड विकार, कर्करोग, पचनसंस्था व यकृताचे विकार वाढत चालले आहेत. त्यावर प्रचलित रासायनिक औषधोपचार पद्धतीत कोणतीच उपाययोजना उपलब्ध नाही.
त्यामुळे रोगांचे मूळ कारण शोधून काढून त्यावर योग्य नैसर्गिक आहार, योग व ध्यान यांचा समावेश असलेली, विनाऔषधे व विनाइंजेक्शन, केवळ रुग्णांची लक्षणे जाणून घेऊन, प्रबोधन, प्रशिक्षण व समुपदेशन करून माणसाचे हरवलेले स्वास्थ्य परत मिळवून देणारी एक नवी ’फंक्शनल मेडिसिन’ नावाची उपचार पद्धती उदयास आली आहे. या उपचारांमुळे आज अनेक असाध्य रोग व लक्षणे दीर्घकाळ सहन करीत असलेले रुग्ण आज निरामय जीवन जगत आहेत. निरामय जीवन जगण्यासाठी आहार-विहार-आचार-विचार हे चार आधारस्तंभ आहेत. हे आपण लक्षात ठेवणे गरजेचे आहे.डॉ.प्रभू पुढे म्हणतात की, “आमचे आजपर्यंत हजारो वर्षे काळाच्या खडतर कसोटीवर पारखून तावून सुलाखून आलेले व टिकलेले आज नावाजलेल्या पाश्चात्य शास्त्रज्ञांनीही अत्यंत उपयुक्त ठरवलेले विचार, सिद्धांत व कृती आता त्यांनी आम्हाला दाखवून द्यावे, त्याकडे त्यांनी आमचे लक्ष वेधावे, तेव्हा त्या गोष्टींचे महत्त्व आम्हाला कळावे व पुष्कळदा त्यांनी दाखवून दिल्यावरही आम्ही त्याकडे दुर्लक्ष करावे, ही एक भारतीयांची गंभीर शोकांतिका आहे. आज भारतात अनेक क्षेत्रांत, विशेषतः शास्त्रांत संशोधनात्मक काम करणार्या शेकडो व्यक्ती अशा आहेत की, त्याही आपापल्या कुवतीनुसार कमी-अधिक प्रतीची सृजनशील निर्मिती व संशोधन करीत आहेत. हे कार्य शास्त्रांच्या प्रगतीत भर टाकणारे आहे.
प्राचीन भारतीय शिक्षणक्रमात गुरुमुखातून श्रवण करणे व ग्रंथ वाचन व पठण करणे, या कर्तव्यांबरोबरच मनन, चिंतन व निदिध्यासन हीदेखील विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनातील कर्तव्ये होती. मनन, चिंतन व निदिध्यासन या तीनही क्रियांमध्ये अंतर्मुखी वृत्ती अंगभूत आहे. मनन हे बाह्यांद्रिये ज्ञानाच्या पलीकडे जाऊन अंतःप्रतिभेला जागृत करणारे पहिले पाऊल. चिंतन हे दुसरे पाऊल, निदिध्यासन म्हणजे ’गाढ व पुनःपुन्हा ध्यान करणे, हे अंतःप्रतिभेला उत्स्फूर्त करणारे तिसरे अधिक निर्णायक पाऊल आहे. आपल्या आजच्या शिक्षणक्रमात केवळ श्रवण-पठणावर भर दिला जातो. श्रवण-पठण ही माहिती मिळवण्याची साधने आहेत. त्यांनी संपूर्ण व खरे ज्ञान मिळत नाही. खरे शिक्षण केवळ माहितीच नाही, तर मन घडवणारे व प्रगल्भ करणारे,” असे असले पाहिजे.
आज प्रगत देशातल्या हॉटेलमध्ये ’व्हेगन’(शाकाहारी),’ग्लूटेन फ्री’ (गहू व इतर धान्यात आढळणारे ‘अॅलर्जी’ निर्माण करणारा घटक नसलेले), ’ऑरगॅनिक फूड’ (नैसर्गिकरित्या पिकवलेले अन्न धान्य) अशा पाट्या झळकत आहेत. तेथील जनता मांसाहार टाळून शाकाहाराकडे वळत आहे. खाद्य पदार्थांच्या व औषधांच्या वेष्टनावर ’शुगर फ्री’,’अल्कोहोल फ्री’,’कलर फ्री’,’ग्लूटेन फ्री’,’लॅकटोज फ्री’ अशी लेबल्स दिसत आहेत. तेल कोणते वापरले हेही दिसत आहे. समुद्री मिठाऐवजी ’हिमालयन पिंक मीठ’, रिफाईण्ड शुगर ऐवजी ’ब्राऊन शुगर’, रिफाईण्ड फ्लोर(मैदा)ऐवजी फायबर असलेले पीठ(आटा),रिफाईण्ड तेलांऐवजी शुद्ध खोबरेल तेल यांची मागणी वाढत आहे. हळद, तीळ, खोबरेल तेल, भारतीय मसाले, मुगासारखी कडधान्ये, डाळी, तृणधान्ये, पालेभाज्या, फळे यांचा आहारात समावेश वाढत्या प्रमाणात होत असल्याने त्यांची मागणी वाढत आहे. अश्वगंधा, शतावरी, च्यवनप्राश अशा आयुर्वेदिक औषधांची मागणी वाढत आहे. आज पाश्चात्य देशात अस्सल भारतीय गायींची निपज केली जात आहे, भारतीय ‘गीर’ जातीच्या गायीच्या ए२(२) दर्जाच्या दुधाची मागणी वाढत चालली आहे. थोडक्यात, जग मूळची भारतीय नैसर्गिक जीवनशैली व आहारपद्धती अंगीकारताना दिसत आहे.
आपल्या शेतकर्यांना, औषधे, खाद्य पदार्थ, व खाद्य तेल, उत्पादकांना अर्थार्जनाच्या उत्तम संधी निर्माण होत आहेत.जागोजागी योगासने, ध्यान शिकण्यासाठी ’स्टुडिओ’, कार्यशाळा, मार्गदर्शन केंद्र, परिषदा यांचे पेव फुटले आहे. ओंकार, गायत्री मंत्र, स्तोत्रे यांच्या उच्चारण व नित्य पठणाचे प्रमाण वाढत चालले आहे. पर्यावरण शुद्धीसाठी काही ठिकाणी यज्ञ, अग्निहोत्र यांचे प्रयोग केले जात आहेत. यातही आम्हा भारतीयांसाठी उत्तम अर्थार्जनाच्या संधी आहेत. या संधींचा फायदा घेण्यासाठी आपण स्वतः आपल्या प्राचीन शास्त्रीय ज्ञानसम्पदेचा अभ्यास करून योग्य, असे प्रशिक्षण घेऊन, नियमितपणे योग साधना व ध्यानसाधना करून एक आदर्श निर्माण करणे आवश्यक आहे.
आज भारत ’वसुधैव कुटुम्बकम्’ या भारतीय विचारानुसार ’वृक्ष वल्ली आम्हा सोयरी वनचरे’ या वृत्तीनुसार ’विश्वगुरू’, ’महानायक’, ’मार्गदर्शक’ अशा भूमिका साकार करत असताना, आम्हा भारतीयांना आपल्याच प्राचीन ज्योतिर्गणित, ज्योतिषशास्त्र, आयुर्वेद, योगशास्त्र, अध्यात्मशास्त्र, मानस शास्त्र अशा अनेक शास्त्रांच्या जागतिक प्रसारामुळे, आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमांतून, जगातल्या अनेक भाषांत शिक्षणाच्या सोयी निर्माण होत आहेत. जागतिकीकरणामुळे शिक्षक, उत्पादक व उद्योजकांना या शास्त्रांचे ज्ञान संपादन करून अर्थार्जनाच्या संधी उपलब्ध होत आहेत. तेव्हा ही आपली विश्व कल्याणकारी संस्कृती जगातल्या सर्व लाभार्थ्यांना उपलब्ध करून देणे. हे नियतीने आपल्यावर सोपवलेले दायित्व आहे. ही जबाबदारी पाळत असताना, भारतीय संस्कृतीधर्माच्या मूळ तत्त्वांना धक्का न लावता, देश-काल-परिस्थितीनुसार त्यात योग्य बदल करून आचरण करीत असताना, आपल्या वृत्ती-उक्ती-कृतींमुळे नवभारताची प्रतिमा मलीन होणार नाही. याची काळजी घेणे. हेही तेवढेच महत्त्वाचे आहे.
अर्थार्जनासाठी जागतिक दर्जाची उत्पादने निर्माण करणे, जागतिक बाजारात विक्रीसाठी प्रामाणिकता व विश्वासार्हता निर्माण करणे, मृदू व सभ्य भाषेत मुद्देसूद संभाषण व पत्रव्यहार, योग्य पेहराव, स्वच्छता, नीटनेटकेपणा पाळून उत्तम व्यक्तिमत्त्व जपून समोरच्यावर छाप पाडणे, वेळेचे महत्त्व जाणणे, मेजवानी, पार्ट्या, मिटिंगमध्ये वावरताना तिथले-तिथले शिष्टाचार (एटिकेट्स) पाळणे, इंग्लिश भाषा ही आज जगातली भाषा असल्याने त्या भाषेवर प्रभुत्व मिळवणे, संस्कृत भाषेचे ज्ञान असणे इत्यादी गोष्टी आजच्या जगात अत्यंत आवश्यक आहेत. हे कायम लक्षात ठेवणे गरजेचे आहे.आज आपल्या अनेक देशानी सन्मानित केलेल्या, जगन्मान्यदृष्ट्या नेतृत्वाखाली निर्माण होणार्या नवभारताबद्दल जगात आश्चर्यमिश्रित कुतूहल निर्माण झाले आहे व त्यामुळे आज अनेक उद्योजक, निवेशक व पर्यटक यांची भारतवारी होत आहे. तसेच, भारतीयांचेही परदेश पर्यटन वाढत आहे. ही एक अर्थार्जनाची व नवभारताला परदेशात ’प्रोजेक्ट’ करण्याची उत्तम संधी आहे.
-ज्ञानचंद्र वाघ