वैश्विक ‘मोदी यात्रा’

    16-Sep-2023
Total Views | 34
PM Narendra Modi Article Wriiten By Minister Chandrashekhar Bawankule

‘सब का साथ, सब का विकास, सबका विश्वास’ हा मंत्र घेऊन प्रारंभ झालेली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दमदार वाटचाल ‘वसुधैव कुटुम्बकम्’ या वैश्विक सूत्रापर्यंत पोचली. याचसोबत ’चांद्रयान’ या भारताच्या चंद्रविषयक मोहिमेपर्यंतची यशकथा म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय मनाला मिळवून दिलेला जबर आत्मविश्वास आहे.

मागील नऊ वर्षांत भारत हे जगातील आघाडीचे राष्ट्र बनले. त्यासाठी या नऊ वर्षांत अनेक कठोर निर्णय घेतले गेले. सर्वसामान्य जनतेसाठी सरकारने घेतलेल्या निर्णयांची तंतोतंत अंमलबजावणी केली गेली. म्हणूनच आजचा भारत ‘नवा भारत’ आहे. आता अजून मोठा पल्ला गाठायचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिलेले स्वप्न भव्य आणि विशाल आहे, ज्यामुळे भारताचे जागतिक स्थान विश्वगुरुचे असेल. येणार्‍या २५ वर्षांत म्हणजे, भारत १००वा स्वातंत्र्य दिन साजरा करीत असताना भारताला २०४७ पर्यंत विकसित देश बनवण्याचे ध्येय मोदी यांचे आहे. पंतप्रधानांनी ’पंचप्रण’ लक्ष्यांची रूपरेषा आखली आहे. त्यासाठी जे काही आवश्यक आहे, ते आता ठरवले जात आहे. पायाभूत सुविधा, ‘मेक इन इंडिया’, ‘डिजिटल इंडिया’, ‘भारतमाला प्रकल्प’, ‘सागरमाला’, समर्पित मालवाहू मार्गिका, राष्ट्रीय लॉजिस्टिक धोरण, औद्योगिक मार्गिका, ‘उडान-आरसीएस’, ‘भारत नेट’, पर्वतमाला हे सर्व प्रकल्प या व्हिजनसाठी अतिशय मूलभूत आहेत. मध्यमवर्गीयांसाठी खूप काही केले जात आहे. रेल्वे, रस्ते आणि दूरसंचार पायाभूत सुविधांचा सर्वाधिक लाभ मध्यमवर्गाला मिळतो. दरवर्षी दीड कोटी नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत. ‘मेक इन इंडिया’मुळे ‘अ‍ॅपल’ आणि ‘टेस्ला’सारख्या कंपन्या भारतात येत आहेत. गेल्या ६०-६५ वर्षांपासून गमावलेला सरकारवरील विश्वास आता परत येत आहे.

रस्ते आणि महामार्ग पायाभूत सुविधा विकासाच्या सर्व प्रकल्पांची आज जी अभूतपूर्व प्रगती झाली आहे, ती मोदी यांच्या सक्षम आणि कार्यतत्पर नेतृत्वाशिवाय आणि त्यांच्या दूरदृष्टीशिवाय कधीही शक्य झाली नसती. पंतप्रधानांनी ’पीएम गती शक्ती नॅशनल मास्टर प्लॅन’ जारी केला. पायाभूत सविधा क्षेत्राला अधिक ’गती’ देऊन त्याद्वारे नवभारत उभारणीसाठी अधिक ’शक्ती’ देण्यासाठी हा आराखडा आखण्यात आला. ’आत्मनिर्भर भारताचा निर्धार हा त्याचेच प्रत्यंतर खरेतर भारताच्या शताब्दीचा पाया आहे.

पूर्वी स्थानिक विकासासाठी भारत सरकारकडून ७० हजार कोटी रुपये जात असत. आज ही रक्कम तीन लाख कोटी रुपयांपेक्षाही जास्त झाली आहे. पूर्वी गरिबांच्या घरांसाठी ९० हजार कोटी रुपये खर्च केले जात होते. आज ही रक्कम चौपट होऊन चार लाख कोटींपेक्षाही जास्त रक्कम गरिबांसाठी घर उभारण्याकरिता खर्च केले जात आहेत. पूर्वी गरिबांना युरिया स्वस्त मिळावा, जी युरियाची पिशवी जगभरातल्या काही बाजारात तीन हजार रुपयांना विकली जाते, ती युरियाची पिशवी शेतकर्‍यांना ३०० रुपयांत मिळावी, यासाठी देशाचे सरकार दहा लाख कोटी रुपये, देशाच्या शेतकर्‍यांसाठी युरिया अनुदानापोटी देत आहे. ‘मुद्रा योजना’ २० लाख कोटी त्यापेक्षाही जास्त रक्कम देशातल्या युवकांना स्वरोजगारासाठी, आपल्या व्यवसायासाठी, आपला कारभार उभारण्यासाठी देण्यात आले आहेत. आठ कोटी लोकांनी नवा व्यवसाय सुरू केला आहे. इतकेच नव्हे, तर प्रत्येक व्यावसायिकाने एक किंवा दोन जणांना रोजगार पुरवला आहे. आठ-दहा कोटी लोकांना रोजगार देण्याचे सामर्थ्य या ‘मुद्रा योजने’मुळे साकार झाले आहे.

सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांना सुमारे साडे तीन लाख कोटी रुपयांचे साहाय्य देत कोरोनाच्या संकट काळातही त्यांचा व्यवसाय बुडू दिला नाही, त्यांना तग धरता आला. ‘वन रँक, वन पेन्शन’ माझ्या देशातल्या जवानांचा एक सन्मानाचा विषय होता. ७० हजार कोटी रुपये देशाच्या तिजोरीतून आज पोहोचले आहेत. विश्वकर्मा जयंतीपासून ‘विश्वकर्मा योजने’ला प्रारंभ होणार आहे. हाताने परंपरागत कौशल्य काम करणार्‍याना या योजनेचा लाभ होईल.

मध्यमवर्ग आनंदी

मध्यमवर्ग कुटुंबीयांना जेव्हा प्राप्तीकराची मर्यादा दोन लाखांवरून सात लाखांपर्यंत वाढते, तेव्हा सर्वात मोठा लाभ पगारदार व मध्यम वर्गाला होतो. देशात मध्यमवर्ग या निर्णयामुळे आनंदी आहे. विकासातील वेग प्रचंड आहे. २०१४ पूर्वी इंटरनेटचा डाटा अतिशय महाग होता. आज सर्वात स्वस्त डाटा मिळत आहे. प्रत्येक कुटुंबाचे पैसे वाचत आहेत. ‘५ जी’ची सुरुवात केली, आणि जगात सर्वाधिक वेगाने ‘५ जी’ची अंमलबजावणी सुरू करणारा भारत आहे. ७०० पेक्षा अधिक जिल्ह्यांपर्यंत आता आम्ही पोहोचलो आणि आता ‘६ जी’चीदेखील तयारी करतो आहोत. त्यासाठी कृती दलदेखील स्थापन केले आहे.

जनशक्ती आणि जलशक्तीची ही ताकद भारताच्या पर्यावरण रक्षणासाठीही उपयुक्त ठरणार आहे. १८ हजार गावांपर्यंत वीज पोहोचविणे, जन-धन बँक खाती उघडणे, मुलींसाठी शौचालय बनवणे, सगळी लक्ष्य वेळेच्या आधीच संपूर्ण शक्तिनिशी पूर्ण केली जातील. ‘पीएम किसान सन्मान निधी’मध्ये अडीच लाख कोटी रुपये शेतकर्‍यांच्या खात्यात थेट जमा केले आहेत. ‘जल जीवन मिशन’ प्रत्येक घरामध्ये शुद्ध पाणी पोहोचवण्यासाठी दोन लाख कोटी रुपये खर्च केले आहेत. ‘आयुष्मान भारत योजना’ गरिबाला आजारपणामुळे रुग्णालयात दाखल होण्यासाठी जी पैशाची समस्या येत होती, त्यातून गरिबाला मुक्त करण्यासाठी, त्याला औषधोपचार मिळावेत, आवश्यकता असल्यास त्याच्यावर शस्त्रक्रिया व्हावी. उत्तम रुग्णालयात व्हावी, त्याला ‘आयुष्मान भारत योजने’अंतर्गत ७० हजार कोटी रुपये खर्च करीत आहोत.

जबर आत्मविश्वास

‘सब का साथ, सब का विकास, सबका विश्वास’ हा मंत्र घेऊन प्रारंभ झालेली मोदी यांची दमदार वाटचाल आता ’वसुधैव कुटुम्बकम्’ या वैश्विक सूत्रापर्यंत पोहोचली. याचसोबत, ‘चांद्रयान’ या भारताच्या चंद्रविषयक मोहिमेपर्यंतची यशकथा म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय मनाला मिळवून दिलेला जबर आत्मविश्वास आहे. शेतकरी, शेतमजूर, गरीब, शोषित, पीडित, वंचित, दलित अशा सर्व घटकांना न्याय देत सुरू झालेल्या अनेक योजना, त्यांची प्रभावी अंमलबजावणी आणि जनतेला मिळालेला लाभ, हे सारेच जनतेपुढे आहे. कोरोनाकाळातील मोदीजींचे नियोजन हा या विकासपर्वातील त्यांच्या कार्यशैलीचे जागेपण आणि उदारता दर्शविणारे ठरले. ‘वसुधैव कुटुम्बकम्’ या श्लोकाचा खरा अर्थ आपल्याला कोरोनाकाळातील मानसिक आपत्तीने शिकविला. ‘जी २०’ परिषदेची मांडणी करताना मोदी यांनी हाच सिद्धांत जगासमोर मांडला. तो अधिक व्यापक झाला.

विकासाची मानवकेंद्री प्रक्रिया २०१४ साली नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर सुरू झाली. पहिल्याच गांधी जयंतीला ‘स्वच्छ भारत अभियान’ प्रारंभ झाले. स्वच्छता म्हणजे केवळ रस्त्यावरील कचरा झाडणे नव्हे, तर संपूर्ण स्वच्छतेवर त्यांनी भर दिला. देशभरातील गावोगावी, शहरोशहरी शौचालये बांधण्यासाठी सरकारच्यावतीने अनुदान देण्यात आले आणि गावे गोदरीमुक्त केली, हे त्यांच्या या ‘स्वच्छ भारत अभियाना’चे सर्वात मोठे यश मानले पाहिजे.


‘राम मंदिर’ हा भारतीय जनता पक्षाच्या कार्यक्रमाचा एक भाग होता. अयोध्येतील पवित्र जन्मभूमीवर श्रीरामाचे भव्य मंदिर झाले पाहिजे, यासाठी भारतीय जनता पक्षाने मोठा लढा दिला. अयोध्येत कोट्यवधी रामभक्तांचे आस्थाकेंद्र असलेले राम मंदिर निर्माण होत आहे. अयोध्या जागतिक दर्जाचे शहर करण्याचे प्रयत्न सुरु झाले.

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे ‘कलम ३७०’ आणि ‘३५ ए’ रद्द केले जाऊ शकत नाही, अशी दर्पोक्ती करणार्‍यांना ही मोदी यांनी चोख प्रत्युत्तर दिले. गृहमंत्री अमित शाह यांनी दि. ५ ऑगस्ट २०१९ रोजी संसदेत विधेयक सादर केले आणि ते प्रचंड मताधिक्क्याने पारित झाले. देशाच्या इतिहासात एका नव्या नोंदीचा समावेश झाला, जे धाडस कुणी कधीच दाखवू शकले नाही.

देशाला स्वातंत्र्य मिळून ७४ वर्षे पूर्ण झाली, त्या दिवशी ‘आझादी का अमृत महोत्सव’ या व्यापक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली. या महोत्सवांतर्गत देशभर वातावरण निर्मिती करण्यात आली. नागरिकांच्या मनात राष्ट्रभक्तीचे स्थान मजबूत करण्याचा प्रयत्न झाला. याचसोबत ‘हर घर तिरंगा अभियाना’ला तर अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला. देशाभिमान जागृत करतानाच स्वदेशीवर देण्यात आलेला भर, हे या अभियानाचे खास वैशिष्ट्य राहिले. ‘तिहेरी तलाक’ला मोदी यांच्या कार्यकाळातच तलाक देण्यात आला. मुस्लीम महिलांवर जो अन्याय होत होता, तो दूर करण्याचा मोठा प्रयत्न पंतप्रधानांनी यशस्वी केला.

दोन वर्षे देश कोरोना विषाणूच्या साथीने ग्रस्त होता. बडी राष्ट्रे हवालदिल झाली होती. अशा स्थितीत मोदी यांच्या नेतृत्वात भारतातील स्थिती नियंत्रणात होती. ज्या गतीने विक्रमी वेळेत भारतात लसीकरणाची मोहीम राबविण्यात आली, ती अभूतपूर्व होती. या मोहिमेची तुलना कुठल्याच देशातील लसीकरणाशी होऊ शकत नाही, याचे सगळे श्रेय मोदी यांचेच आहे.

२०१४ मध्ये मोदी सत्तेत आले, तेव्हा भारत जागतिक अर्थव्यवस्थेत दहाव्या क्रमांकावर होता. आज जगातल्या पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनलो आहोत. मोदी यांची हमी आहे की, येत्या पाच वर्षांत देश जगातल्या पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये स्थान मिळवेल.

चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्ष
(शब्दांकन : रघुनाथ पांडे, प्रदेशाध्यक्ष यांचे माध्यमप्रमुख)
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121