‘न भूतो, न भविष्यती’ असेच नुकत्याच नवी दिल्ली येथे संपन्न झालेल्या दिमाखदार ‘जी २०’ शिखर परिषदेचे वर्णन करावे लागेल. केवळ भारताचेच नाही, तर अख्ख्या जगाचे लक्ष या शिखर परिषदेकडे होते. ‘जी २०’चे अध्यक्षपद भारताने सर्वार्थाने सार्थकी लावले. ‘वसुधैव कुटुम्बकम्’ या नीती-संस्कारांतर्गत ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ हा संदेश भारताने दिला आणि त्यादृष्टीने ‘जी २०’ची यशस्वी वाटचालही करुन दाखवली. त्याचबरोबर रशिया-युक्रेन युद्धासारख्या वैश्विक प्रश्नावर नवी दिल्ली घोषणापत्रातही सर्व देशांनी सहमती दर्शविली. त्याचबरोबर इंडिया-मिडल ईस्ट-युरोप कॉरिडोर, ग्लोबल बायोफ्यूल अलायन्स, आफ्रिकन युनियनचा ‘जी २०’ मध्ये समावेश यांसारख्या महत्त्वाकांक्षी विकास प्रकल्पांची मुहूर्तमेढही उल्लेखनीय ठरावी. तसेच ‘भारत मंडपम’मध्ये भारत मंडपम’मध्ये पावलोपावली उमटलेले प्रतिबिंब हे या परिषदेचा कळसअध्याय रचणारे ठरले. परंतु, दुर्देवाने संकुचित मानसिकतेच्या विरोधकांनी ‘जी २०’मुळे भारताला काय मिळाले, असा खुजा प्रश्न उपस्थित केला. त्यानिमित्ताने खरोखरीच ‘जी २०’ने भारताला, भारतीयांना आणि जगालाही किती भरभरुन दिले, त्याच्या फलश्रुतीचा आढावा घेणारा हा लेख...
‘जी २०’ दृष्टिक्षेपात
१. आर्थिक
‘आंतरराष्ट्रीय नाणेनिधी’ आणि ‘जागतिक बँके’सारख्या बहुपक्षीय विकास बँकांमध्ये सुधारणा करण्यात येणार
भारतासारख्या विकसनशील अर्थव्यवस्थांना विकास बँकांमध्ये योग्य ते प्रतिनिधित्व दिले जाणार.
कमी विकसित देश, भूपरिवेष्टित (चारही बाजूने जमिनीने वेढलेले), विकसनशील देश, छोटे बेट असलेले विकसनशील देशांचा जागतिक निर्णय प्रक्रियेत सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न केले जाणार.
विकसनशील देशांना कर्जाच्या जाळ्यातून मुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार.
२. व्यापार
जागतिक व्यापार संघटनेमध्ये सुधारणा करुन सर्वांना समान संधी दिली जाणार.
थेट परदेशी गुंतवणुकी (एफडीआय) साठी जगभरात सुलभ नियम बनवले जाणार.
जागतिक व्यापारामधील दस्तावेजांचे डिजिटलायझेशन करण्यात येणार.
३. पर्यावरण
जैवइंधनाच्या विकासासाठी ‘ग्लोबल बायोफ्यूल अलायन्स’ची स्थापना करण्यात आली.
जागतिक हवामान वाढ १.५ सेल्सियसपर्यंत मर्यादित ठेवण्यासाठी २०३० पर्यंत हरितगृह वायूचे उत्सर्जनात ४३ टक्के कपात करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले.
पॅरिस करारामधील तरतुदीप्रमाणे कमी विकसित आणि विकसनशील देशांना हरितगृह वायूचे उत्सर्जन रोखण्यासाठी विकसित देशांनी अर्थसाहाय्य करावे.
४. डिजिटल भरारी...
जागतिक पातळीवर शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करण्यासाठी शिक्षण क्षेत्राचे डिजिटलायझेशन करण्यात येणार.
शेवटच्या घटकापर्यंत आर्थिक विकास पोहोचवण्यासाठी भारत जगभरातील देशांमध्ये डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर (डीपीआय) उभारण्यासाठी मदत करणार भारत कमी विकसित आणि विकसनशील देशांमध्ये करीत असलेल्या आर्थिक डिजिटल पायाभूत सुविधांच्या उभारणीचे ‘जी २०’ सदस्य देशांनी कौतुक केले.
५. आरोग्य
भविष्यात कोरोनासारख्या महामारींचा सामना करण्यासाठी वैद्यकीय सुविधांचा विकास केला जाणार.
कमी आणि मध्यम उत्पादन गटातील देशांना स्वस्त दरात लस आणि औषधपुरवठा केला जाणार.
जागतिक हवामान बदलाचा मानवी आरोग्यावर होणार्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी ‘जागतिक आरोग्य संघटने’च्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आलेल्या ‘अलायन्स फॉर ट्रान्सफॉर्मेटिव्ह अॅक्शन ऑन क्लायमेट अॅण्ड हेल्थ’च्या कामाला गती दिली जाणार.
६. सामाजिक
२०३० शाश्वत विकास उद्दिष्टांना पूर्ण करण्यासाठी कमी विकसित आणि विकसनशील देशांना अर्थसाहाय्य केले जाणार, त्याचबरोबर विकसित देशांनी विकसनशील देशांना उद्दिष्टांना पूर्ण करण्यासाठी अर्थसाहाय्य करण्याचे आवाहन.
उपासमार आणि कुपोषण रोखण्यासाठी प्रादेशिक हवामानानुसार कृषी उत्पन्न घेण्यासाठी अर्थसाहाय्य आणि तंत्रज्ञान पुरवले जाणार.
बालमजुरी आणि सक्तीचे काम रोखण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार.
७. महिला सक्षमीकरण
२०३० पर्यंत डिजिटल लैंगिक भेदभाव दूर करण्यासाठी वचनबद्धता.
कामाच्या ठिकाणी स्त्री-पुरूष यांच्या वेतनामधील तफावत कमी करण्यावर आणि महिलांना योग्य आणि समान संधी देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार.
श्रमशक्तीमधील तफावत दूर करण्यासाठी ब्रिस्बेन गोलची अंमलबजावणी करणार.
१. हे युग युद्धाचे नाही...
जागतिक राजकारणात मागच्या दोन वर्षांत सर्वाधिक चर्चिला गेलेला विषय आहे रशिया-युक्रेन युद्ध. दि. २४ फेब्रुवारी २०२२ ला रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनच्या विरोधात ’स्पेशल मिलिटरी ऑपरेशन’ची घोषणा केली. तेव्हापासून रशिया-युक्रेन युद्धाला तोंड फुटले. या युद्धात युक्रेनच्या बाजूने अमेरिकेच्या नेतृत्वात पाश्चिमात्य देश उभे राहिले, तर रशियाच्या बाजूने चीन, इराण, उत्तर कोरिया सारखे देश. त्यामुळे शीतयुद्धाच्या समाप्तीनंतर पहिल्यांदाच एखाद्या मुद्द्यावर पुन्हा जागतिक पातळीवर दोन गट दिसून आले. या युद्धाचे आर्थिक, तेल व्यापार, अन्नसुरक्षा अशा विविध क्षेत्रांत विपरीत परिणाम दिसून आले.‘जी २०’च्यावेळीही संयुक्त घोषणापत्र जाहीर करताना रशिया-युक्रेन युद्धाच्या मुद्द्यावर भारताला सर्व देशांची सहमती मिळवता येणार नाही, असा अंदाज होता. पण, भारताने आपल्या कूटनीतिक ताकदीच्या बळावर रशिया-युक्रेन युद्धावर सर्व देशांची सहमती मिळवली. भारताने या घोषणापत्रात कुठेही रशियाचे नाव घेतले नाही, तरीही रशियाला योग्य तो संदेश देण्यात भारत यशस्वी ठरला.दिल्ली घोषणापत्रातील ८३ परिच्छेदांपैकी आठ परिच्छेद रशिया-युक्रेन युद्धावर आहेत. यामध्ये युक्रेनच्या संप्रभुतेचा सन्मान करण्याचे आवाहन रशियाला करण्यात आले आहे. त्यासोबतच रशियाला अण्वस्त्रांचा वापर आणि अण्वस्त्र वापराची धमकी देण्यापासून प्रवृत्त करण्यात आले आहे. गरीब आफ्रिका देशांसाठी आवश्यक असलेला धान्यपुरवठा पुन्हा सुरळीत चालू करण्यासाठी धान्यपुरवठा करारावर अंमलबजावणी करण्यासाठी दोन्ही देशांना सांगण्यात आले आहे.विशेष म्हणजे, ’आजचे जग युद्धाचे नाही’ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या संदेशाचा समावेश दिल्ली घोषणापत्रात करण्यात आला आहे. रशिया-युक्रेन युद्धावर अतिशय संतुलित, अशा दिल्ली घोषणापत्रामुळे रशिया-युक्रेन युद्ध शांतीपूर्ण मार्गाने थांबवण्याचा मार्ग मोकळा होईल.
२. आफ्रिकेसह सब का साथ...‘जी २०’ शिखर परिषदेच्या पहिल्याच दिवशी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ’आफ्रिकन युनियन’ला ‘जी २०’चे स्थायी सभासदत्व देण्यात येत असल्याची घोषणा केली. जागतिक राजकारणात आफ्रिका खंडातील देशांना कायमच दुर्लक्षित करण्यात आले आहे. पण, ‘जी २०’ सारख्या महत्त्वपूर्ण व्यासपीठावर ‘आफ्रिका युनियन’ला प्रतिनिधित्व देऊन भारताने एका दगडात अनेक शिकार केल्या आहेत.जागतिक पातळीवर ’ग्लोबल साऊथ’च नेतृत्व करण्यासाठी भारत आणि चीनमध्ये रस्सीखेच सुरू आहे. या ’ग्लोबल साऊथ’मध्ये आफ्रिका खंडातील सर्व देश, लॅटिन अमेरिकेतील देश आणि आशियातील जपान, दक्षिण कोरियासारखे काही मोजके देश सोडले, तर बाकीच्या सर्व देशांचा समावेश होतो. पैशाच्या जोरावर चीनने या देशांमध्ये आपला प्रभाव वाढवला होता. पण, चीनच्या कर्जाच्या जाळ्याला तोडण्याचे काम भारत आपल्या ‘सॉफ्ट पॉवर’ने करीत आहे.याचाच एक भाग म्हणून ‘आफ्रिका युनियन’ला ‘जी २०’ स्थायी सभासदत्व देण्यासाठी भारताने पुढाकार घेतला. ‘आफ्रिका युनियन’ ही आफ्रिकेतील ५५ देशांची संघटना. आफ्रिका खंडाच्या लोकसंख्येचा विचार केल्यास या ५५ देशांमध्ये १३० कोटींपेक्षा जास्त लोकं राहतात. नैसर्गिक संसाधनांनी बहरलेला आफ्रिका सध्या गृहयुद्ध आणि दहशतवादाने ग्रस्त आहे.आज आफ्रिका पाश्चिमात्य देशांच्या आणि रशिया-चीनच्या जागतिक राजकारणात भरडला जात आहे. या राजकारणात भाग न घेता, भारत आफ्रिकेतील लोकांच्या कल्याणासाठी काम करीत आहे. आफ्रिका खंडातील ४० टक्के लोकसंख्या १५ वर्षांच्या खालील आहे. त्यामुळे भविष्यात आफ्रिकेची अर्थव्यवस्था भरारी घेईल. युरोप आणि अमेरिकेचा काळ निघून गेला. आता आशिया खंडाचा काळ सुरू आहे. पण, भविष्याचा काळ हा आफ्रिकेचा असेल. त्यामुळेच भारत आज आफ्रिका खंडातील देशांसोबत चांगले संबंध प्रस्थापित करत आहे. यासोबतच ‘ग्लोबल साऊथ’च नेतृत्वसुद्धा भारताकडे येत आहे. हा चीनसाठी निश्चितच मोठा धक्का मानला जात आहे.
३. भारत-मध्य-पूर्व-युरोप इकोनॉमिक कॉरिडोर- भारत-मध्य-पूर्व-युरोप इकोनॉमिक कॉरिडोरच्या स्थापनेची घोषणा ‘जी २०’ शिखर परिषदेचे मुख्य आकर्षण ठरले. भारत आणि अमेरिकेच्या पुढाकाराने स्थापन झालेला हा इकोनॉमिक कॉरिडोर जलवाहतुकीने आणि रेल्वे वाहतुकीने भारत आणि युरोपला जोडण्याचे काम करणार आहे. - या इकोनॉमिक कॉरिडोरद्वारे भारताचा कार्गो भारतातून समुद्री मार्गाने सौदीच्या आणि युएईच्या बंदरापर्यंत पोहोचवला जाईल. त्यानंतर सौदीतून रेल्वे मार्गाने इस्रायलच्या हायफा बंदरापर्यंत हा कार्गो नेण्यात येईल. हायफा बंदरावरून हा कार्गो ग्रीसच्या बंदरावर उतरवला जाईल. तिथून हा कार्गो युरोपच्या बाजारांमध्ये पोहोचेल.
- सध्या भारतातून युरोपमध्ये कार्गो पोहोचण्यासाठी ३६ दिवसांचा कालावधी लागतो. या इकोनॉमिक कॉरिडोरमुळे भारतातून युरोपमध्ये कार्गो पोहोचण्यासाठी २२ दिवसांचा कालावधी लागेल. म्हणजेच या कार्गोमुळे ४० टक्के वेळेची बचत होईल. परिणामी वाहतुकीवरील खर्चही कमी होईल.
- या इकोनॉमिक कॉरिडोरमुळे आर्थिक फायदा होणार असला, तरी या कॉरिडोरचा मुख्य उद्देश हा आर्थिक नसून भूराजनीतिक आहे. २०१३ साली चीनने युरोपला जोडण्यासाठी तथाकथित ‘सिल्क रोड’च्या धर्तीवर ‘बीआरआय’ म्हणजेच (इशश्रीं रपव ठेरव खपळींळरींर्ळींश)ची स्थापना केली. या प्रकल्पाअंतर्गत चीनने जगभरातील गरीब देशांना मोठ्या प्रमाणात कर्ज वाटले. पण, हा प्रकल्प आता मागे पडला आहे. दिवसेंदिवस या प्रकल्पातून देश बाहेर पडत आहेत. त्यामुळे चीनच्या या ‘बीआरआय’ प्रकल्पाला टक्कर देण्यासाठी भारत आणि अमेरिकेने या इकोनॉमिक कॉरिडोरसाठी पुढाकार घेतला.
- या इकोनॉमिक कॉरिडोरचा थेट अमेरिकेशी काहीही संबंध नसताना अमेरिका या कॉरिडोरसाठी प्रयत्न करीत आहे. मागच्या काही वर्षांपासून अमेरिकेने मध्य-पूर्व क्षेत्राकडे दुर्लक्ष केले होते. याचाच फायदा घेऊन चीनने या क्षेत्रात आपला प्रभाव वाढवून अमेरिकेच्या वर्चस्वाला आव्हान देण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे अमेरिका या क्षेत्रात आपला प्रभाव टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहे.- भारत आणि युरोपदरम्यान वाहतुकीसाठी सध्या सुएझ कालव्याचा वापर केला जातो. पण, मार्च २०२१ मध्ये सुएझ कालव्यावर वाहतुकीसाठी अवलंबून राहणं किती धोक्याचे आहे, हे जगभरातील देशांच्या लक्षात आले. त्यामुळेच सुएझ कालव्यावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी भारत आणि अमेरिका प्रयत्नशील आहेत. या कॉरिडोरमुळे भारताचे सुएझ कालव्यावरील अवलंबित्व कमी होईल.- अशाप्रकारे भारताला ’भारत-मध्य-पूर्व-युरोप इकोनॉमिक कॉरिडोर’मुळे आर्थिक फायद्यांसोबतच भूराजनीतिक फायदासुद्धा होणार आहे. भारत या इकोनॉमिक कॉरिडोरमुळे चीनच्या ‘बीआरआय’ प्रकल्पाला पर्याय निर्माण करण्यात यशस्वी झाला आहे.
४. ‘ग्लोबल बायोफ्यूएल अलायन्स’चे महत्त्व‘जी २०’ शिखर परिषदेच्या दरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ ऊर्जेसाठी एकत्रित मिळून काम करण्यासाठी ‘बायो फ्यूएल अलायन्स’ची घोषणा केली. भारत, अमेरिका आणि ब्राझील हे संस्थापक असलेल्या या अलायन्समध्ये ‘जी २०‘मधील संयुक्त अरब अमिरात, इटली आणि अर्जेंटिनासह चार विशेष आमंत्रित सदस्यांचा समावेश आहे. जगभरात कार्बन आधारित इंधनाचा वापर कमी करणे आणि इथेनॉलसारख्या जैवइंधनाचा वापर वाढवणे, हे या अलायन्सचे मुख्य उद्दिष्ट आहे.जगातील ८० टक्के जैवइंधनाचे उत्पादन अमेरिका आणि ब्राझीलमध्ये घेतले जाते. यात अमेरिकेचा वाटा ५० टक्के इतका आहे, तर जैवइंधनाच्या जागतिक उत्पादनात भारताचा वाटा केवळ तीन टक्के इतका आहे. भारताने २०२५-२६ पर्यंत इंधनामध्ये २० टक्के इथेनॉल मिसळून इंधन पुरवण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवले आहे. त्यासोबतच भारताने २ हजार, ७० शून्य कार्बन उत्सर्जनाचे लक्ष ठेवलेले आहे. हे महत्त्वाकांक्षी लक्ष साध्य करण्यासाठी खनिज तेलाचा वापर टाळून जैवइंधनावर भर देण्याची गरज आहे.भारतात सध्या इंधनामध्ये दहा टक्के इथेनॉलचे मिश्रण केले जाते. त्यामुळे भारताला २० टक्के इथेनॉल मिश्रित इंधनावर गाड्या चालवण्याचे लक्ष्य गाठण्यासाठी मोठा पल्ला गाठायचा आहे. यासाठी भारताला मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीची आणि तंत्रज्ञानाची गरज लागणार आहे. त्यामुळे ‘बायो फ्यूएल अलायन्स’ची स्थापना भारतासाठी फायदेशीर ठरणार आहे. या अलायन्समुळे भारताला या क्षेत्रातील गुंतवणूक वाढवण्यासाठी, नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यात आणि सर्वसमावेशक सहकार्य निर्माण करण्यात मदत होईल.
५. ‘क्रिप्टो करन्सी’चे नियमन- ‘जी २०’च्या अध्यक्षपदाच्या काळात भारताने विविध क्षेत्रांशी निगडित ६० शहरांमध्ये २०० बैठका घेतल्या. यातीलच एक बैठक ‘क्रिप्टो’च्या नियमन करण्याच्या मुद्द्यावर होती. सध्या जगभरात क्रिप्टोचा वापर मनी लॉण्डरिंग आणि दहशतवाद्यांना पतपुरवठा करण्यासाठी केला जात आहे. यामुळे ‘क्रिप्टो’ चलनाचे नियमन करणे अत्यंत आवश्यक झाले आहे.- ‘क्रिप्टो’ हे तंत्रज्ञानावर आधारित एक आभासी चलन आहे. यावर कोणाचेही नियंत्रण नाही. यामुळे या आभासी चलनाच्या वापरावर लक्ष ठेवणे अवघड आहे. याचाच फायदा गुन्हेगारी प्रवृत्तींच्या लोकांकडून घेतला जातो. याला आळा घालण्यासाठी जगभरात प्रयत्न केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून ‘जी २०’ शिखर परिषदेमध्ये ‘क्रिप्टो’ चलनावर नियंत्रण आणि नियमन करण्यासाठी सर्व देशांनी सहमती दर्शविली आहे.- नवी दिल्लीतील ‘जी २०’ शिखर परिषदेच्या दोन दिवस आधी, ‘आंतरराष्ट्रीय नाणेनिधी’ (आयएमएफ) आणि ‘आर्थिक स्थिरता मंडळ’ (एफएसबी) यांनी ‘क्रिप्टो’वर शोधनिबंधदेखील प्रकाशित केला होता. या शोधनिबंधानुसार ‘क्रिप्टो’वर बंदी घालणे सध्यातरी अशक्य आहे. त्यामुळे ‘क्रिप्टो’ चलनाद्वारे होत असलेल्या गैरव्यवहारांना रोखण्यासाठी एक सर्वसमावेशक जागतिक धोरण आणि नियमन आवश्यक आहे.- ‘क्रिप्टो’ चलनावर जागतिक धोरण आणि नियम ठरवण्यासाठी ‘जी २०’च्याच व्यासपीठावर भारताच्या अध्यक्षतेखाली ऑक्टोबरमध्ये ‘जी २०’ सदस्य देशांच्या अर्थमंत्र्यांची आणि केंद्रीय बँकांच्या गव्हर्नरांची बैठक होणार आहे. या बैठकीचे अध्यक्षपद भारताकडे असल्यामुळे भविष्यातील महत्त्वपूर्ण ठरणार्या ‘क्रिप्टो’ चलनाविषयीचे धोरण ठरवण्यात भारताची महत्त्वाची भूमिका असणार आहे.
संकलन : पार्थ कपोले, श्रेयश खरात
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.