मुंबई : मालिका आणि टीआरपी हे गणित एकत्रितरित्याच चालते. मात्र, या गणितात झी मराठी वाहिनी मागे पडली आहे असे दिसते. झी मराठीच्या अनेक मालिकांचे वेळापत्रक देखील बदलले. तर 'यशोदा', 'लोकमान्य' या मालिकांनी अलीकडेच प्रेक्षकांचा निरोप घेतला. यानंतर झी मराठीवरील आणखी एक कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. अनेक राजकारणी, कलाकार यांच्या मनातील गोष्टी बाहेर काढणारा हा कार्यक्रम म्हणजे खुप्ते तिथे गुप्ते. हो. अवधूत गुप्ते यांचे सुत्रसंचालन असलेला 'खुप्ते तिथे गुप्ते' हा कार्यक्रम लवकरच निरोप घेणार आहे. त्याची पोस्ट स्वत: अवधूत गुप्तेने शेअर केली होती.
या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक
अवधूत गुप्ते याने इन्स्टाग्रामवर 'खुपते तिथे गुप्ते'च्या सेटवरचा व्हिडिओ शेअर करत प्रेक्षकांसोबत ही बातमी शेअर केली. अवधूतने असे म्हटले की, 'थोडे विसरावे लागते, आठवण्यासाठी... दूर जावे लागते पुन्हा भेटण्यासाठी! ह्या पर्वाचा शेवटचा भाग येत्या रविवारी!' अवधूतने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो मेकअप करताना दिसला. शिवाय सेटवर जाऊन त्याने पूजा केली, नारळ फोडला. 'खुपते तिथे गुप्ते'ची टीमही यावेळी उपस्थित होती.
दिग्गजांची कार्यक्रमात हजेरी
खुप्ते तिथे गुप्तेच्या शेवटच्या एपिसोडमध्ये खासदार सुप्रिया सुळे सहभागी होणार आहेत. ४ जूनपासून सुरू झालेल्या या कार्यक्रमात आजवर अनेक दिग्गजांनी हजेरी लावली आहे. या पर्वाची सुरुवातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीने झाली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, डॉ. अमोल कोल्हे, श्रेयस तळपदे, नारायण राणे, संजय राऊत, उर्मिला मातोंडकर, नितीन गडकरी, सई ताम्हणकर, समीर वानखेडे, वंदना गुप्ते, सुबोध भावे, जितेंद्र जोशी, अमृता खानविलकर, अभिजीत बिचुकले हे मान्यवर उपस्थिती होते.