चित्रपटांतून देशाची चांगली बाजूही जगापुढे आणण्याची गरज : पल्लवी जोशी
14-Sep-2023
Total Views | 40
1
रसिका शिंदे-पॉल
मुंबई : करोनाच्या सावटातून जगाला वाचवण्यासाठी ‘कोवॅक्सीन’ ही भारतीय लस तयार करणारे डॉ. बलराम भार्गवा आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केलेल्या महिला शास्त्रज्ञांची गोष्ट ‘द वॅक्सिन वॉर’ या चित्रपटातून लवकरच आपल्यासमोर येणार आहे. ‘द काश्मिर फाईल्स’, ‘द केरला स्टोरी’ असे सत्य घटनांवर आधारित यशस्वी चित्रपट दिग्दर्शित केलेले विवेक अग्निहोत्री यांनी पुन्हा एकदा एक नवा विषय मांडण्याचा विडा उचलला आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. यावेळी अभिनेत्री आणि निर्माती पल्लवी जोशी हिने पत्रकारांशी संवाद साधत चित्रपटाच्या कथानकाबद्दल आणि त्यात दाखवलेल्या नारी शक्ती बद्दल सविस्तर चर्चा केली.
चित्रपटाच्या विषयाचा आणि कोविडचा संबंध नाही
भारताने करोना काळात लोकांचे जीव वाचवण्यासाठी जी ‘कोवॅक्सिन’ लस तयार केली, त्यामागे महिला शास्त्रज्ञांनी किती मेहनत केली आणि कोणत्या मानसिक स्थितीत ती लस तयार केली यावर ‘द वॅक्सिन वॉर’ या चित्रपटाचे कथानक आधारित आहे. याबद्दल बोलताना पल्लवी जोशी म्हणाली की, “या चित्रपटातून भारतातील आणि देशाबाहेरील नागरिकांना भारत कोणत्याही अडचणींचा सामना कसा करु शकतो हे या चित्रपटातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. ‘द वॅक्सिन वॉर’ या चित्रपटाचे नाव ऐकल्यानंतर साहजिकच डोळ्यांसमोर करोनाचा भयावह काळ उभा राहतो. मात्र, करोनाचा आणि या चित्रपटाच्या कथानकाचा काहीही संबंध नसल्याचा खुलासा पल्लवी जोशीने केला आहे. “करोना महामारीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला तोंड देत डॉ. भार्गवा यांच्या मार्गदर्शनाखाली महिला शास्त्रज्ञांनी ही लस कशी तयार केली याबद्दल ही कथा माहिती सांगते. थोडक्यात सांगायचे झाल्यास ‘कोवॅक्सिन’ तयार करणाऱ्या शास्त्रज्ञांचा हा बायोपिक आहे. करोना जगभरात पसरल्यामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. त्यावेळी संपुर्ण जग ठप्प झाले होते. कोणतीही य़ंत्रणा सशक्तपणे सक्रिय नव्हती. अशा परिस्थीतीतही या सर्व शास्त्रज्ञांनी मिळून भारताची लस तयार केली. ती लस तयार करण्यासाठी सामान्यांच्या आकलनापलिकडे जाणाऱ्या अनेक अशक्य बाबी या शास्त्रज्ञांनी केल्या होत्या. त्या सर्व या चित्रपटात मांडण्याचा प्रयत्न केला आहे”, असे पल्लवी म्हणाली.
देशाची चांगली बाजू दाखवण्याची गरज आहे
तसेच, चित्रपटाच्या संहितेकरिता संशोधन कशाप्रकारे केले याबद्दल अधिक माहिती देताना पल्लवी म्हणाली की, “करोनाच्या पहिल्या लाटेपासूनच लॉकडाऊन लागल्याकारणाने अनेकजण त्यांच्या वैयक्तिक संशोधनात बुडाले होतेच. त्यावेळी मी आणि विवेक देखील याबद्दल विविध माध्यमांतून माहिती घेत होतो. त्यावेळी डॉ. बलराम भार्गवा यांनी लिहिलेले ‘गोईंग वायरल’ हे पुस्तक वाचनात आले, आणि एक विचार मनात आला की भारताने इतकी मोठी कामगिरी केली आहे. आजवर भारताची वाईट बाजू बऱ्याचदा चित्रपटांतून किंवा अन्य माध्यमातून दाखवली गेली. आपल्याकडे चांगल्या बाबी कोणत्या आहेत याची चर्चा किंवा त्या गोष्टी पश्चिमी देश फार दाखवत नाहीत किंवा त्याबद्दल जास्त चर्चा देखील करत नाहीत. याच विचाराने पेटून उठत आपल्या देशाची चांगली आणि अभिमानाची बाजू ही मोठ्या पडद्यावर आलीच पाहिजे असा अट्टहास बाळगत हा चित्रपट तयार केला आणि परदेशात देखील या चित्रपटाचे स्क्रिनिंग भारतात प्रदर्शनापुर्वी केले असून त्याला अतिशय उत्तम प्रतिसाद आला आहे”, असेही पल्लवी म्हणाली. शिवाय भावी पिढीसाठी आपल्या देशाबद्दल एक सकारात्मकता या चित्रपटातून निर्माण व्हावी हा देखील ध्यास मनात असल्याचे तिने सांगितले.
...म्हणून पुस्तकाचे मालकी हक्क एक रुपयांत विकले !
“डॉ. भार्गवा यांनी त्यांच्या पुस्तकाचा मालकी हक्क एक रुपयांनी दिला. कारण त्यांचं असं म्हणणं होतं की, ‘कोवॅक्सिन’ ही लस लोकांसाठी तयार केली होती. त्यामुळे त्यातून मिळणाऱ्या नफ्यावर आपला हक्क नसून तो केवळ सामान्य लोकांचा आहे अशी विचारधारा डॉ. भार्गवा यांची होती. शिवाय भारताने अजूनही ‘कोवॅक्सिन’ लस पेटंट केली नाही आहे, त्याचेही कारण त्यातुन मिळणारा नफा नको आहे असा अट्टहास असल्यामुळे ही कथा आम्हाला भावली आणि त्यातूनच द वॅक्सिन वॉर या चित्रपटाची संहिता लिहिली गेली”, अशी माहिती पल्लवीने दिली. तसेच, करोनाच्या सकारात्मक आठवणी कोणत्याही व्यक्तिच्या मनात नसताना त्याबद्दल कोणताही चित्रपट तयार करणे ही खरं तर जोखीमच होती. त्यामुळे त्या काळात एक सकारात्म घटना देखील घडली आणि ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची आणि त्या रिअल लाईफ हिरोंबद्दल अर्थात शास्त्रज्ञांबद्दल जगाला माहिती होण्याची गरज असल्यामुळे हा विषय लोकांच्या विस्मरणातून पुर्णपणे जाण्याआधीच हा चित्रपट तयार करण्याचा निर्णय घेतल्याचेही पल्लवीने सांगितले.
नितीन देसाईसोबत काम करणार होते पण....
बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्राची सुरुवात करणारी अभिनेत्री पल्लवी जोशी पुन्हा मराठी मनोरंजनसृष्टीकडे वळणार का? असा प्रश्न गेली अनेक वर्ष पडला असून त्याबद्दल पल्लवीनेच उत्तर दिले आहे. “गेल्या अनेक वर्षांपासून मराठी मनोरंजनसृष्टीत एक मोठा प्रकल्प करण्याचा विचार होता. त्यासाठी कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्याशी बोलणे झाले होते. मात्र, त्यांच्या निधनानंतर तो प्रकल्प शक्य होईल की नाही या संभ्रमात मी आहे”, अशी कबूली पल्लवीने दिली.
नानांनी आधी आम्हाला जेवण खाऊ घातलं आणि नंतर....
‘द वॅक्सिन वॉर’ या चित्रपटात डॉ. भार्गवा यांच्या भूमिकेसाठी नाना पाटेकर यांचीच निवड दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी केली होती. त्याबद्दलचा एक किस्सा सांगत पल्लवी म्हणाली, “या चित्रपटात नाना यांनीच काम केले पाहिजे असा अट्टहास विवेकचा होता. त्यानुसार नाना पाटेकरांना आम्ही फोन करुन चित्रपटाबद्दल सांगितले. त्यांनी आम्हाला पुण्यातील त्यांच्या घरी बोलावले. अगदी आपल्या हाताने त्यांनी आम्हाला जेवण बनवून दिले. आणि त्यानंतर चित्रपटाची कथा आम्ही त्यांना ऐकवली आणि नानांनी स्क्रिप्ट पाठव असं विवेकला सांगितलं. त्यानुसार स्क्रिप्ट नानांपर्यंत पोहोचली आणि चित्रपटात त्यांची एन्ट्री झाली”, अशी आठवण पल्लवीने सांगितली.
गिरीजा ओकचा ‘तो’ किस्सा
सध्या हिंदी चित्रपटसृष्टीत बायोपिकची लाट आली आहे. आणि ‘द वॅक्सिन वॉर’ हा चित्रपट देखील लस तयार करणाऱ्या शास्त्रज्ञांचाच बायोपिक आहे. त्यामुळे त्यांची व्यक्तिरेखा हुबेहुब किंवा त्यांच्या जवळपास जाणारे कलाकारच शोधण्याचे दिव्य समोर होते. मात्र, सर्व महिला शास्त्रज्ञांची उत्कृष्ट व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेत्री लाभल्या याचा आनंद असल्याचे पल्लवी म्हणाली. या चित्रपटात अभिनेत्री गिरीजा ओक हिने देखील एका महिला शास्त्रज्ञाची भूमिका साकारली आहे. गिरीजाबद्दलची एक महत्वाची बाब पल्लवीने यावेली सांगितली. “ज्यादिवशी चित्रपटाच्या संहितेचे वाचन सुरु होते, त्यादिवशी गिरीजा आमच्या उच्चारांमधील चुका काढत होती आणि आम्हाला ते शब्द कसे उच्चारावे हे सांगत होती. आधी आम्हाला वाटलं की काही अभिनेत्री किंवा कलाकारांना फार पुढे-पुढे करण्याची वाईट सवय असते तसं गिरीजा करत नाही आहे ना? परंतु, आम्हाला संभ्रमात पाहिल्यानंतर गिरीजा म्हणाली की मी बायो-सायन्सची विद्यार्थीनी असून मी या विषयाचा अभ्यास केला आहे. आणि हे ऐकल्यानंतर आमच्या मनातील शंका दुर झाली आणि चित्रपटाचे संपुर्ण चित्रिकरण पुर्ण होईपर्यंत आम्ही सर्व कलाकार गिरीजाकडे जाऊन आम्ही उच्चारत असणारे शब्द योग्य आहेत ना याची पडताळणी करत त्यांचे अर्थ देखील समजून घेत होतो”. तसेच, शास्त्रज्ञ आणि लस या विषयावर चित्रपट असून त्यातील बरेच शब्द किंवा वाक्यप्रचार हे विज्ञानाशी निगडित असून ते सामान्यांना समजतील इतक्या सोप्प्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न केल्याचेही पल्लवीने स्पष्ट केले.
आपल्या देशाबद्दल लहान मुलांच्या मनात अभिमान निर्माण करण्याची आणि भारताबद्दल चांगल्या गोष्टी दाखवण्याची हीच योग्य वेळ असल्यामुळे द वॅक्सिन वॉर हा चित्रपट लहान मुलांना दाखवण्याची विनंती यावेळी पल्लवीने केली. याशिवाय भारतीय महिला या पश्चिमी स्त्रीवादापेक्षा फार निराळ्या असून त्यांच्यातील संस्कार हे त्यांना अधिक सक्षम बनवतात आहेत हे या चित्रपटाच्या माध्यमातून प्रकर्षाने दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित आणि पल्लवी जोशी निर्मित ‘द वॅक्सिन वॉर’ हा चित्रपट २८ सप्टेंबर रोजी देशभरात प्रदर्शित होणार आहे.