देशाचं खायचं आणि निंदा करायची, हा आपल्याला मिळालेला शाप : नाना पाटेकर
14-Sep-2023
Total Views | 199
रसिका शिंदे-पॉल
‘द वॅक्सिन वॉर’ या विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित आगामी चित्रपटात डॉ. बलराम भार्गवा यांची भूमिका नाना पाटकेर यांनी साकारली आहे. मात्र, चित्रपटात त्यांची व्यक्तिरेखा साकारण्यापुर्वी नाना कधीच डॉ. भार्गवा यांना भेटले नसल्याचा खुलासा अभिनेते नाना पाटेकर यांनी केला. यावेळी या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचे विशेष कौतुक नानांनी केले. “संपुर्ण टीमने विषयाचे सखोल संशोधन केले आहे आणि मला डॉ. भार्गवांबद्दल जी माहिती दिली त्यावरुन मी त्यांची व्यक्तिरेखा साकारली असल्याची कबूली देखील नानांनी दिली. त्यामुळे चित्रपटात जे काही चांगलं काम झालं असेल ते विवेक अग्निहोत्रींमुळे आणि वाईट काही असेल तर माझ्यामुळे”, असे प्रामाणिक वक्तव्य देखील यावेळी नानांनी केले.
देशाचं खायचं आणि निंदा करायची, हा आपल्याला मिळालेला शाप
डॉ. भार्गवा यांची व्यक्तिरेखा साकारतानाचा अनुभव यावेळी नानांनी सांगितला. ते म्हणाले, “करोनाचे संकट भारतासह संपुर्ण जगावर ओढावल्यामुळे कमीत कमी वेळात ताकदीची लस तयार करणे अत्यंत गरजेचे होते. जितका वेळ जाईल तितकी माणसं मरत होती. त्यामुळे अनेक प्रसंगी डॉ. भार्गवा यांना कठोर पावले उचलावी लागली होती”, या शब्दांत त्यांनी त्यांच्या भूमिकेचा परिचय करुन दिला. पुढे ते म्हणाले, “सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे काही घटना या चित्रपटात दाखवता येत नाहीत. इतर परदेशी लसींनी जागतिक बाजारात स्वत:ला ज्या पद्धतीने मांडले आणि परदेशी मंडळींनी कशाप्रकारे भारताच्या लसीविरोधात मोर्चेबांधणी करून आपल्याच लोकांना आपल्या देशाबद्दल कसं वाईट बोलायला भाग पाडलं हा वाईट प्रकार आहे. आपण आपल्याच देशाच्या विरुद्ध देशात राहून, इथलं खाऊन, देशाची निंदा करायची आणि देशाविरोधात कारवाई करायची हा आपल्याला मिळालेला शाप आहे”, या शब्दांत नानांनी खंत व्यक्त केली. मात्र, सरतेशेवटी ‘कोवॅक्सिन’ ही भारताने तयार केलेली जगातील एक यशस्वी लस आहे हे सिद्ध झाल्याचा आनंद देखील त्यांनी व्यक्त केला. या सगळ्या अग्निदिव्यातून जाताना काय काय करावं लागलं होतं हे सांगणारा चित्रपट म्हणजे ‘द वॅक्सिन वॉर’, अशी या चित्रपटाबद्दल अगदी थोडक्यात माहिती नानांनी दिली.
विवेक अग्निहोत्री म्हणजे जीव ओतून काम करणारा दिग्दर्शक
‘द काश्मिर फाईल्स’, ‘द केरला स्टोरी’ यासारखे देशाला हादरुन दाकणारे चित्रपट दिग्दर्शित करणाऱ्या विवेक अग्निहोत्रींसोबत नाना पाटेकर यांनी या चित्रपटात पहिल्यांदाच काम केले आहे. यावेळी नानांनी विवेक अग्निहोत्री यांचे कौतुक करत जीव ओतून काम करणारा दिग्दर्शक असे म्हणत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. “ ‘द वॅक्सिन वॉर’ या चित्रपटाच्या सबंध चित्रिकरणादरम्यान विवेक कायम विचारात मग्न असायचा. विवेक बद्दल एक खास गोष्ट सांगायची तर, त्याच्यातील निर्माता ज्यावेळी तो दिग्दर्शकाच्या भूमिकेत असतो त्यावेळी कायम गैरहजर असायचा. त्याचे कारण असे की, त्यावेळी चित्रपटासाठी माझा किती पैसा लागला आहे याचा विचार विवेक करायचा नाही”, असे म्हणत नानांनी विवेक अग्निहोत्री यांचे मनापासून कौतुक केले.
नटाने कायम दु:खाच्या शोधात असले पाहिजे
१९७८ साली ‘गमन’ या चित्रपटातून अभिनयाची कारकिर्द सुरु करणारे अभिनेते नाना पाटेकर यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये वैविध्यपुर्ण भूमिका साकारल्या. ५० वर्षांच्या अभिनय कारकिर्दीतून भावी पिढीतील कलाकारांना त्यांनी मोलाचा संदेश दिला. “गेली ५० वर्ष या क्षेत्रात काम करत असताना नट म्हणून मी काल काय काम केलं हे विसरुन जात असेल तरच मी आज काम करु शकतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे नटाला त्याच्या सुख आणि दु:खाच्या व्याख्या रोज बदलता आल्या पाहिजे. माझं कालचं सुख आणि दु:खं मी सेटवर घेऊन आलो, तर माझं रोज काम एकसारखं होणार आहे, त्यात काहीच नाविण्य नसेल. माझ्यामते नट का कधीच सुखी नसु शकतो, त्याने कायम दु:खाच्या शोधात असले पाहिजे. कारण जितकी वेगळी दु:खं तुम्ही पाहता तितकी वेगळी कामं तुम्हाला करता येतात”.
.. म्हणून नानांची या चित्रपटासाठी केली निवड
‘द वॅक्सिन वॉर’ चित्रपटाचे कथानक ‘कोवॅक्सिन’ ही भारतीय लस शास्त्रज्ञांनी कशी तयार केली यावर आधारित आहे. यात डॉ. भार्गवा यांच्या मार्गदर्शनाखाली महिला शास्त्रज्ञांच्या टीमने अथक परिश्रमाने आणि अडचणींचा सामना करत लस तयार कशी केली ही सत्य घटना सांगण्यात आली असून नाना पाटेकर चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत. या चित्रपटात प्रमुख भूमिकेसाठी कसी निवड झाली याचा नानांनी एक किस्सा सांगितला. “या चित्रपटात एक संवाद आहे India Can Do It. तर मी प्रत्येक दिग्दर्शकाला प्रश्न विचारतो की माझी या भूमिकेसाठी निवड का केली तोच प्रश्न मी विवेकला विचारला. त्यावर त्याने मला असं उत्तर दिलं की, नाना तुम्ही ज्या तळमळीने हे वाक्य बोलू शकता आणि प्रेक्षकांना त्याची तीव्रता समजू शकते ती तत्परता इतर कोणत्याही अभिनेत्यात मला दिसली नाही. आणि ज्यावेळी तुम्ही ते वाक्य म्हणाल त्यावेळी प्रेक्षकांना नक्कीच वाटेल की हो भारत हे करु शकतो. आणि त्याचमुळे तुमची या भूमिकेसाठी निवड केली. आणि विवेकने हे सांगितल्यानंतर मी पुर्णपणे त्याच्या स्वाधीन झालो आणि ही भूमिका केली”. पुढे नाना असं देखील म्हणाले की, “पैसे अशा चित्रपटांमध्ये महत्वाचे नसतात तर इतक्या महत्वाच्या विषयांवरील चित्रपटाचा भाग होणं महत्वाचं असतं”.
हिंसाचार मुका असतो
सध्या बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करणाऱ्या चित्रपटांना नाव न घेता नानांनी चिमटा काढला. करोनानंतर ठप्प झालेली चित्रपटसृष्टी पुन्हा उभी राहायला हवीच. प्रेक्षकांनी चित्रपटगृहांत जाऊन चित्रपटाचा आस्वाद घेतला पाहिजे असं देखील नाना म्हणाले. “हिंसाचाराला माझ्यामते आवाज नसतो तर तो मुका असतो. सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस येणारे चित्रपट आणि त्यातील हिंसाचार पाहिला की नकोसं होतं. पण शेवटी आकडे महत्वाचे असतात”.
विक्रम गोखलेंच्या आठवणीत नानांचे डोळे पाणावले
दिवंगत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्यासोबत नटसम्राट या चित्रपटात नाना पाटेकर यांनी केलेलं काम आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन बसले आहे. मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीतील ताकदीच्या कलावंतामध्ये विक्रम गोखले यांचे नाव आवर्जून घेतले जाते. ७०-८० च्या दशकात एकत्रित एकाच मनोरंजनसृष्टीत काम करणाऱ्या विक्रम गोखले यांच्या आठवणीत नानांचे डोळे पाणावले. नाना म्हणाले, “विक्रम गोखले गेल्यामुळे माझं वैयक्तिक नुकसान झालं. जगातल्या पहिल्या १० नटांची नावं सांगा असं कुणी विचारलं तर त्यात एक नाव विक्रम गोखले यांचं असेल. विक्रम यांच्या जाण्यामुळे पाठीवर हात ठेवणाऱ्या थोरल्याला हात निघून गेला आहे याची खंत वाटते”, अशी दु:खद भावना नानांनी व्यक्त केल्या.
चित्रपटसृष्टीच्या इतिहास डोकावत नानांनी ज्या दिग्दर्शकांसोबत काम करण्यासाठी अनेक कलाकार झटत असत ते दिग्दर्शक आज या आक़ेवारीच्या किंवा बॉक्स ऑफिसच्या स्पर्धेत कुठेच दिसून येत नाहीत याकडे लक्ष वेधले. नाव न घेता त्या दिग्दर्शकाचे आजच्या या आधुनिक जगात अस्तित्वच राहिले नाही हे सांगत नानांनी चित्रपटसृष्टी ही काळानुरुप बदलत जाणार आहे असे म्हटले. त्यामुळे आपण खुप सामान्य आहोत यावर विश्वास ठेवला की असामान्य गोष्टी करण्याचा तुम्ही प्रयत्न करु शकता, असा सल्ला देखील यावेळी नानांनी दिला.
‘द वॅक्सिन वॉर’ या चित्रपटात नाना पाटेकर, पल्लवी जोशी, गिरिजा ओक, सप्तमी गौडा, रायमा सेन व अनुपम खेर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट देशभरात २८ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.