मुंबई : गोरेगावच्या आरे कॉलनीतील तलावात गेली अनेक वर्ष गणपती विसर्जनाची परंपरा आजतागायत सुरु आहे. मात्र स्वतःला पर्यावरणवादी म्हणवणाऱ्या काही अशासकीय संघटनांकडून (एनजीओ) पर्यावरण रक्षणाच्या नावाखाली ही परंपरा मोडीत काढण्याचा प्रयत्न वारंवार केला जातोय. हा एकप्रकारे हिंदूंच्या श्रद्धांवर घाला घालण्याचा प्रयत्न असल्याचे विश्व हिंदू परिषदेचे म्हणणे आहे. मात्र मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आरेमध्ये गणपती विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची व्यवस्था करणार असल्याचे सांगितले असतानाही अशा पर्यावरणवाद्यांकडून अनाठायी कुरघोडी होत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे यास विहिंप चोख प्रत्युत्तर देणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मुंबई भाजपचे अध्यक्ष अॅड. आशिष शेलार यांनी आपल्या पत्रकार परिषदेत आरेतील गणपती विसर्जनासंदर्भातला मुद्दा उचलला. आरेतील तलाव प्रदुषित होऊ नये म्हणून काही कथित पर्यावरणवाद्यांकडून गणपती विसर्जन थांबवण्याचा एकप्रकारे प्रयत्न होत असल्याचे ते म्हणाले. मंत्री मंगलप्रभात लोढा आरेमध्ये कृत्रिम तलावाची व्यवस्था करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली; जेणेकरून आरेतील गणपती विसर्जन थांबणार नाही. मात्र असे असतानाही कथित पर्यावरणवाद्यांकडून अनाठायी कुरघोडी होत असल्याने त्यास चोख प्रत्युत्तर देण्याची भूमिका विहिंप घेणार असल्याचे विहिंपचे मुंबई क्षेत्र मंत्री गोविंद शेंडे व मुंबई क्षेत्र सहमंत्री रामचंद्र रामुका यांनी सांगितले.
'संविधानाने सर्वांना समान न्याय व हक्क दिले असूनही केवळ हिंदूंशी दुजाभाव करीत अन्याय केला जात असून मा. न्यायालयाने हिंदूंना योग्य न्याय द्यावा व अन्य धर्मीयांची हिंदूंच्या श्रद्धांशी खेळण्याची लुडबुड थांबवावी', अशी मागणी विहिंपकडून करण्यात आली आहे. पुढे शासन व प्रशासनास विनंती करत त्यांनी हिंदूंच्या श्रद्धेला न्याय मिळवून देण्याबाबतही भूमिका मांडली आहे. "हिंदूंच्या धैर्याची परीक्षा घेतल्यास विहिंपच्या नेतृत्वात हिंदूंचे तीव्र आंदोलन उभे राहील आणि त्यानंतर होणाऱ्या परिणामांची संपूर्ण जबाबदारी उच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन व प्रशासनाची असेल", असा इशारा गोविंद शेंडे व रामचंद्र रामुका यांनी दिला आहे.