प्रवास विमा तुमच्या प्रवासादरम्यान विविध जोखीमांपासून संरक्षण देतो आणि तुमचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी फायदेशीर ठरतो. प्रवासादरम्यान सामानाची चोरी, वैद्यकीय आणीबाणी, प्रवासादरम्यान अपघात, पासपोर्ट हरवणे, उड्डाण विलंब किंवा उड्डाण रद्द होणे इत्यादी सर्व प्रकारच्या परिस्थितीत या विम्यापासून आर्थिक संरक्षण मिळते. म्हणूनच नियमित प्रवास करणार्या प्रवाशांना प्रवास विम्याजवळ माहिती असणे आवश्यक आहे.
प्रवास विम्याचे अनेक प्रकार आहेत. ग्राहक ज्या प्रकारची पॉलिसी खरेदी करतो, त्यात नमूद केलेल्या सुविधा त्याला मिळू शकतात. प्रवास विमा पॉलिसी घेताना त्यात कोणत्या जोखीमा कव्हर आहेत, ते जाणून घ्या. सर्वप्रथम तुमच्या गरजेनुसार पॉलिसीची निवड करा. तुम्ही भारतात तसेच परदेशात प्रवास करीत असाल, तर पॉलिसीत देशांतर्गत तसेच परदेश प्रवासाचा समावेश आहे ना, हे तपासा. तुम्ही फक्त देशातच प्रवास करणार असाल आणि नजीकच्या भविष्यात परदेशी जाण्याचा विचार नसेल, तर त्यानुसार पॉलिसी निवडा. या पॉलिसीत अगोदरपासून असलेले आजार, युद्धाचा धोका आत्महत्या आणि धोकादायक खेळ/साहस याबाबी कव्हर केल्या जात नाहीत.
पॉलिसी खरेदी करण्यासाठी फक्त ट्रॅव्हल्स एजंटचा सल्ला मानू नका. शक्य तितकी माहिती गोळा करून तुम्ही तुमचा पर्याय स्वत: निवडा. तुम्ही स्वस्त प्रवास विमा पॉलिसी खरेदी करण्याची घाई करू नका. कारण, कमी प्रीमियमची पॉलिसी तुमच्या सर्व गरजांची पूर्तता करू शकणार नाही. प्रवासात काही बदल झाला, तर प्रीमियमची रक्कम काही प्रमाणात परत मिळवण्याचा क्लॉज पॉलिसीत आहे की नाही, हे तपासा. प्रवास विमा ही प्रवासातही सपोर्ट सिस्टिम आहे. बहुतेक प्रवास विमा पॉलिसी ट्रिप रद्द होणे, सामानाचे नुकसान, चोरी, वैद्यकीय समस्या किंवा विमा अपहरण यामुळे होणार्या नुकसानाची भरपाई करतात. अनेक देशांनी त्यांच्या देशात येणार्या परदेशी पाहुण्यांसाठी प्रवास विमा अनिवार्य केला आहे.
प्रवास आरोग्य विमा
प्रवास आरोग्य विमा वैद्यकीय संरक्षणाचे फायदे देतो. जर तुम्ही परदेशात आजारी पडून हॉस्पिटलमध्ये दाखल झालात किंवा अपघात होऊन हॉस्पिटलमध्ये दाखल झालात, तर विम्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यापूर्वीच्या काही दिवसांच्या उपचाराचा, हॉस्टिलचा/हॉस्पिटलतून बाहेर आल्यावर काही दिवसांच्या उपचाराचा खर्च मिळू शकतो. यात शस्त्रक्रिया दंत उपचार, शुल्क, आकस्मिक वैद्यकीय सेवा, औषधाचा खर्च वगैरे कव्हर असतो.
सिंगल आणि मल्टी-ट्रिप विमा
सिंगल ट्रिप इन्शुरन्स पॉलिसी एकाच ट्रिपसाठी डिझाईन केलेली असते. मल्टी- ट्रिप पॉलिसी मात्र अनेक वेगवेगळ्या प्रवासांसाठी डिझाईन केलेली असते.
आंतरराष्ट्रीय विद्यार्थी प्रवासी विमा
परराष्ट्र मंत्रालयाकडे उपलब्ध माहितीनुसार, २०२२ मध्ये भारतातील १.३ दशलक्ष विद्यार्थी ७९ देशांत शिक्षण घेत होते. देशाबाहेर पदवी घेऊ इच्छिणार्या विद्यार्थ्यांमध्ये ऑस्ट्रेलिया, कॅनडा, युएई व अमेरिका हे देश जास्त लोकप्रिय आहेत.
परदेशातील वास्तव्यात त्यांच्याकडे सर्वसमावेशक प्रवासी विमा पॉलिसी असावयासच हवी. आरोग्य सेवांचा मोठा खर्च विद्यापीठाशी संबंधित गरज व ‘कोविड-१९’नंतर आरोग्यसेवांची वाढती रक्कम हे फरक लक्षात घेता, परदेशात जाणार्या विद्यार्थ्यांनी प्रवासी विमा घेऊन आपला प्रवास सुरक्षित करणे महत्त्वाचे असते. बर्याचदा विद्यार्थी व पालकांमध्ये कोणता आंतरराष्ट्रीय प्रवासी विमा घ्यावा, याविषयी संभ्रम असतो. विद्यार्थ्यांसाठी खास तयार करण्यात आलेले विमा कवच घ्यावे की, लघुकालीन लीझर प्रवासी विमा घ्यावा, हे त्यांना समजत नाही. परदेशात विद्यार्थ्यांना असलेली जोखीम आणि अभ्यासक्रमाचा कालावधी एका वर्षांपेक्षा जास्त काळाचा असेल, तर स्पेशलाईज्ड विद्यार्थी प्रवासी विमा घ्यावा.
आरोग्य बिघडणे, प्रवासास दिरंगाई होणे, बँगेज हरवणे/उशीर होणे, कायदेशीर बाबी अशा प्रकारच्या समस्यांसाठी स्पेशलाईज्ड विमाच चांगला. संबंधित देशातील ठरावीक विमा योजना तिथे आवश्यक असणारे संरक्षण पुरवू शकतातच असे नाही. अशावेळेस खास विद्यार्थी प्रवासी विमान महत्त्वाचा ठरू शकतो. या विम्यामुळे वैद्यकीय कारणांमुळे शिक्षणात व्यत्यय आला, तर नुकसान भरपाईही देतो. आंतरराष्ट्रीय प्रवासी आरोग्य विमा आणि प्रवासी विमा यातून निवड करताना भारतातील विद्यार्थी प्रवास विमा योजनेची निवड करावी यात अवैद्यकीय सुरक्षा कवचही उपलब्ध असतो. विद्यार्थी प्रवासी विमा योजनेचा प्रीमियम वाजवी असतो. विद्यार्थी प्रवासी विमा योजनेचा कालावधी एक वर्षांहून जात असतो, तर अन्य प्रवासी विमा योजनांचा कालावधी १८० दिवसांचा असतो. परदेशात राहण्याचा कालावधी लक्षात घेऊन त्यानुसार योग्य सुरक्षा कवच देणारी पॉलिसी निवडावी!
या योजनेत क्लेम सेटलमेंट प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचे आश्चर्याचे धक्के किंवा गैरसमजांशी सामना करावा लागत नाही.भारतात विमा खरेदी करण्याचा फायदा म्हणजे यात मिळणारे सर्वसमावेशक कव्हरेज! विद्यापीठात मिळणार्या विम्यात फक्त वैद्यकीय व संबंधित खर्च मिळतात. भारतीय विमा योजनेत प्रवास आणि सामानासाठीही संरक्षण मिळते. परदेशात ज्या विद्यापीठात अभ्यास करायचा आहे, तेथील गरजा पुरवणारी विमा पॉलिसी घ्यावी. या विम्यात खूपच कायदेशीर मदतीचा समावेश केलेला असतो. परिणामी, विमाधारकाला कायदेशीर प्रतिनिधित्व करण्यासाठी जबाबदारीची सोय असते. याशिवाय मालमत्तेचे अपघाती नुकसान केल्यास किंवा इतरांना इजा झाल्यास या विद्यार्थ्याचे लाएबिलिटी कव्हरेज उपयोगी येतो.
योग्य विमा निवडताना चौफेर विचार करणे आवश्यक असते. विद्यार्थी प्रवास विमा खरेदी करताना विविध विमा कंपन्यांच्या संकेतस्थळावर दिलेल्या योजनांमध्ये तुलना करावी. यामुळे विशिष्ट गरजा पूर्ण करणारी योजना निवडण्यास मदत होऊ शकते व आवश्यक वैशिष्ट्यांचा समावेश करून ती आणखी सर्वसमावेशक करता येते. विद्यापीठाच्या गरजाही विमा निवडताना लक्षात घ्याव्यात. विमा घेण्यापूर्वी, विमा कंपनीचे क्लेम सेटलमेंट गुणोत्तर लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. सरासरीपेक्षा जास्त टक्केवारी विना अडथळा क्लेम प्रक्रियेसाठी महत्त्वाची असते.
प्रवासी विमा कवच प्रत्येक देशात वेगवेगळेअसते. जागतिक स्तरावर कार्यरत असलेल्या ’ब्रॅण्डेड कंपनी’ चा विमा उतरवावा.
पॉलिसीतून कव्हरेज
पॉलिसी सामान्यपणे पुढील कव्हरेज देतात. पासपोर्ट हरवणे, सामान प्रवासाचे कागद इत्यादी हरवणे, प्रवासाला विलंब झाला किंवा प्रवास चुकला, उड्डाणाशी संबंधितअपघात, ड्रायव्हिंग लायसन्स हरवणे, अपघात किंवा आजारपण, अपहरण, दंत उपचार देशाबाहेर अंत्यसंस्काराचा खर्च व ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘कॅशलेस हॉस्पिटल सेशन’ उपलब्ध नसलेले कव्हरेज- सामान ठेवण्यास २४ तासांपेक्षा कमी विलंब, चाव्या हरवणे, स्थानिक उठाव किवा युद्धजन्य परिस्थितीमुळे विमान किंवा रेल्वे चुकणे, अगोदरपासून असलेले आजार, स्वत: करून घेतलेली दुखापत अल्कोहोल किंवा ड्रग्जचे व्यसन व सार्वजनिक ठिकाणी पासपोर्ट हरवणे. ही पॉलिसी ऑनलाईन खरेदी करता येते.
घरगुती प्रवास विमा- जर आपण आपल्या देशातच प्रवास करत असाल, तर घरगुती प्रवास विमा (डोमेस्टिक ट्रॅव्हल इन्शुरन्स)निवडा. यात भारतामध्ये कुठेही प्रवास करताना झालेल्या हानीची नुकसान भरपाई मिळू शकते.
समूह प्रवास विमा- ग्रुप ट्रॅव्हल इन्शुरन्स. काही वेळा तुमचे मित्र किंवा तुमच्या कामामुळे कंपनी आणि क्लायंटसोबत प्रवास करावा लागू शकतो. जर तुम्ही ग्रुपमध्ये प्रवास करू इच्छित असाल, तर ग्रुप ट्रॅव्हल इन्शुरन्स हा तुमच्यासाठी चांगला पर्याय असेल. यात सर्व नुकसानांची भरपाई केली जाते. यात संपूर्ण ग्रुपला या विम्याचा लाभ मिळतो.
मल्टी ट्रिप पॉलिसी- बर्याच जणांना खूपवेळा प्रवास करावा लागतो. म्हणजे त्यांचे वेळापत्रक खूप व्यस्त असते. त्यांना नेहमी वेगवेगळ्या ठिकाणी जावे लागते, अशांनी मल्टी-ट्रिप पॉलिसी घ्यावी.
ज्येष्ठ नागरिक प्रवास विमा- जर तुमचे वय जास्त असेल म्हणजे ७० ते ८० वर्षांच्यादरम्यान असेल, तर कुठेही प्रवास करण्यापूर्वी प्रवासी विमा उतरावयासच हवा. हा विमा ज्येष्ठांना त्यांचा प्रवास आनंददायी होण्यासाठी गरजेचा असतो.
आशिया प्रवास विमा- जर आपल्याला आशिया खंडातील देशांचा प्रवास करावा लागत असेल, तर त्यासाठी खास आशिया प्रवास विमा उपलब्ध आहे. आशियातील प्रवासादरम्यान झालेल्या नुकसानीची भरपाई या पॉलिसीतून मिळू शकते.
शेजेंन प्रवास विमा- शेंजेन हे एक क्षेत्र आहे. यात युरोप खंडातील २६ देश येतात. हा विमा घेणारे शेंजेन परिसरात राहत असतील किंवा प्रवास करीत असतील, तर प्रवासादरम्यान किंवा भारतात परत येईपर्यंत होणार्या नुकसानाची भरपाई मिळू शकते.