गेली आठ वर्षं समाजमाध्यमांवर पक्ष्यांची विविध आकर्षक छायाचित्रे सामायिक करणार्या पुण्यातील पक्षी छायाचित्रकार डॉ. सुधीर हसमनीस यांची ही गोष्ट...
मावळतीच्या सूर्याच्या क्षितिजावर पसरलेल्या लालबुंद छटांवर पक्षी स्वच्छंदी उडताना दिसले की, ते दृश्य डोळ्यांत कायम साठवणीत ठेवावं असं वाटतं. ते कैद करावं, यासाठी धडपड सुरू होते. पण, केवळ पक्षी उडतानाचीच नाही; तर त्यांच्या प्रत्येक हालचालींमध्ये एक सौंदर्य दडलेलं असतं. तो क्षण नेमका टिपण्याचं कसब काही मोजक्यांमध्येच! असंच नेमका क्षण आणि कॅमेर्याच्या लेन्समधून पक्ष्यांचं निरामय सौंदर्य दाखवणारं, एक नाव म्हणजे डॉ. सुधीर हसमनीस.
गेल्या आठ वर्षांपासून पक्षीनिरीक्षणाचा छंद जोपासून सामान्यांनाही त्यांच्या छायाचित्रांची भुरळ पाडणार्या सुधीर यांचा जन्म पुण्यातलाच. पुण्यातील भावे हायस्कूलमध्ये अकरावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक इथे त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण केलं. तसंच, पुढे ‘बिझनेस मॅनेजमेंट’मध्ये पदव्युत्तर पदवीही घेतली. अभ्यासामध्ये चांगलीच गती असलेल्या सुधीर यांनी नोकरी सांभाळत ‘इंडियन स्कूल ऑफ बिझनेस मॅनेजमेंट’मधून २०१३ साली ‘सर्जिक प्लॅनिंग प्रोसेस’ या विषयात ‘डॉक्टरेट’ ही पदवी मिळवली. भोरच्या एका लेदर आर्ट कंपनीपासून सुरू केलेला प्रवास १९७६ साली ‘टाटा मोटर्स’मध्ये घेऊन आला आणि पुढे निवृत्तीपर्यंत ते तिथेच रुळले. १९७६ ते २०१५ असा प्रदीर्घ काळ त्यांनी ‘टाटा मोटर्स’मध्ये काम केलं.
दरम्यान, २०१२ साली सुधीर यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी एक घटना घडली. २०१२च्या डिसेंबर महिन्यात आणि २०१३च्या जून महिन्यात अशा केवळ सहा महिन्यांच्या काळात त्यांना दोन वेळा हृदयविकाराचा झटका आला. डॉक्टरांनी किमान दोन महिन्यांची सक्तीची विश्रांती सांगितली. कंटाळवाणे दिवस घालवण्याखेरीज त्यांच्या खोलीच्या खिडकीतून पक्षी पाहायला त्यांनी सुरुवात केली आणि पक्षीनिरीक्षणाच्या छंदाचा इथे जन्म झाला. आपल्याला निवृत्तीनंतरच्या काळातही असा काहीतरी छंद असायला हवा, या विचारातूनच त्यांनी त्यांचे पक्षीनिरीक्षण सुरू ठेवले. त्यांचा हा छंद पाहून त्यांची भाची सायलीने त्यांना एक कॅमेराही भेट दिला होता.
लहानपणापासूनच पर्यावरणाची आवड आणि त्यामुळे पर्यावरणाच्या काही लहान-मोठ्या उपक्रमांतही ते सहभाग घेत आले होतेच. मात्र, निवृत्तीनंतर (२०१६ मध्ये) त्यांनी प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार सुधीर शिवराम यांच्या बरोबर ‘फोटोग्राफी’चा कोर्स केला आणि पक्ष्यांचे वेगवेगळे छायाचित्र काढणार्या या रेकॉर्डब्रेक उपक्रमाला सुरुवात झाली.
पक्षीनिरीक्षण आणि छायाचित्रण सातत्याने सुरू ठेवण्यासाठी दि. १ जानेवारी २०१६ या दिवशी त्यांनी दररोज एक नवीन ़छायाचित्र समाजमाध्यमांवर टाकेन, असं ’सेल्फ चॅलेंज’ घेतलं. आश्चर्य म्हणजे, एक वर्षासाठी घेतलेल्या या चॅलेंजचं आज आठवं वर्षं सुरू आहे. इतक्या सातत्यपूर्ण आणि स्तिमित करणार्या छायाचित्रांमुळे त्यांची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ आणि ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये देखील नोंद करण्यात आली आहे. गेली सात वर्षं सुरू असलेल्या या उपक्रमाचं आता आठवं वर्षं सुरू असून, डॉ. सुधीर आता ‘वर्ल्ड रेकॉर्ड’ करण्याच्या तयारीत आहेत. अविरतपणे कोणताही खाडा न करता, असं शिस्तबद्ध पद्धतीने आणि सातत्यपूर्ण काम करून एक आदर्शच त्यांनी इतरांपुढे ठेवला आहे. तांत्रिक बाबींमध्येही मागे न राहता ‘ई-बर्ड’ आणि ’मर्लिन’सारख्या विविध ऑनलाईन अॅप्सच्या माध्यमातून ही त्यांनी त्यांच्या नोंदी केल्या आहेत. विशेष म्हणजे, विरंगुळा आणि छंदापासून सुरू झालेल्या या उपक्रमातील नोंदी आज अनेक संशोधक आणि विद्यार्थ्यांच्या ही उपयोगी येत आहेत. मूळचे मेकॅनिकल इंजिनिअर असलेल्या सुधीर यांना भारतातील कमीतकमी ८० टक्के पक्षी प्रजाती अगदी सहज ओळखता येतात.
पक्ष्यांविषयीची किंवा कॅमेर्याविषयीची कोणतीही माहिती ते अगदी उत्स्फूर्तपणे विचारणार्यांना देतात. तसेच, पक्ष्यांच्या आणि वन्यजीव छायाचित्रणाचे विविध कार्यशाळाही मोफत घेतात. त्यांच्या विविध छायाचित्रांची आजवर २५ हून अधिक प्रदर्शने झाली आहेत, तर अनेक प्रदर्शनांचे ते परीक्षणही करतात. एवढंच नाही तर छायाचित्रणाच्या या छंदावर ‘चित्रकथी-जंगल फोटो स्टोरिज’ आणि ‘बर्ड्स ऑफ ओल्ड मॅगझिन हाऊस,’ अशी दोन पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. ‘बिझनेस मॅनेजमेंट’ या त्यांच्या मूळ विषयातीलही जवळ-जवळ १२ पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. पक्षीनिरीक्षण आणि छायाचित्रणाच्या निमित्ताने आजवर महाराष्ट्राबरोबरच भारतातील केरळ, गुजरात, काश्मीर हे राज्ये फिरले आहेत. परदेशातील केनिया, टांझानिया, ऑस्ट्रिया, भूतान आणि जर्मनी असे देशही फिरले आहेत. रेकॉर्डब्रेक छायाचित्र काढणार्या सुधीर यांना त्यांचा हा छंद जगभरातील पाच हजारांहून अधिक पक्षीअभ्यासकांपर्यंत घेऊन गेलाय, तर विविध भागांची ओळख ही करून दिली आहे.
याच पक्षीनिरीक्षण आणि त्यांचे सौंदर्य लहान वयातच मुलांच्या लक्षात यावं, या दृष्टिकोनातून त्यांच्या (IBirders) या संस्थेकडून पक्ष्यांविषयी आणि एकूणच त्यांची माहिती असणारी मॉड्यूल तयार करण्याचं काम सुरू आहे. ही मॉड्यूल्स शाळांना देण्यात येणार असून, विद्यार्थ्यांना त्याचा खूपच फायदा होईल. या मॉड्यूलच्या प्रायोगिक चाचण्या यशस्वी झाल्या असून, त्यावर पुढे काम सुरू आहे. अशाप्रकारे आपल्या छायाचित्रांतून कथा सांगणार्या या क्षणचित्रकथाकाराला दै. ‘मुंबई तरूण भारत’च्या शुभेच्छा!