मुंबई (प्रतिनिधी): सोलापुर जिल्ह्यातील माळढोक अधिवास असलेल्या ठिकाणांवरुन कोळ्याची एक नवी प्रजात तर राजस्थानमधील थार वाळवंटातुनही कोळ्याच्या एका नव्या प्रजातीचा शोध लावण्यात आला आहे. संशोधकांनी कोळ्याच्या दोन प्रजातींचा शोध लावला असुन यासंबंधीचा अहवाल युरोपियन जर्नल ऑफ टॅक्सॉनॉमी या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.
ऋषिकेश त्रिपाठी, प्रदिप शंकरन, निखील कुनी आणि सुदी कुमार या संशोधकांनी हे शोधकार्य पुर्ण केले आहे. सोलापुरातील बारोमणी गावात माळढोकांचा अधिवास असलेल्या ठिकाणांवरुन आढळल्यामुळे पाल्पिमॅनस माळढोक असे या प्रजातीचे नाव ठेवण्यात आले आहे. तर, राजस्थानमधील थार वाळवंटातील मरूभूमी राष्ट्रीय उद्यानात आढळल्यामुळे पाल्पिमॅनस गोडावन असे नव्याने शोधलेल्या दुसऱ्या प्रजातीचे नाव ठेवण्यात आले आहे. नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या माळढोक या प्रजातीच्या संवर्धनावर लक्ष केंद्रित करण्याच्या दृष्टीकोनातुन ही नावे दिली असल्याचे संशोधक सांगतात. इंग्रजीतील ग्रेट इंडियन बस्टर्ड म्हणजेच माळढोक पक्ष्यांच्या संवर्धनावर लक्ष देणे निकडीचे आहे. महाराष्ट्रातील स्थानिक नाव माळढोक तर राजस्थानंधील स्थानिक नाव गोडावन यावरुन या कोळ्याच्या प्रजातींची नावे देण्यात आली आहेत.
माळढोक पक्ष्यांच्या संकटग्रस्त स्थितीत असलेल्या पक्ष्यांच्या संवर्धनाबरोबरच या परिसंस्थेत अधिवास करणाऱ्या इतर असंख्य प्रजातींचे संवर्धन होणार आहे. त्यामुळेच ग्रेट इंडियन बस्टर्डच्या सन्मानार्थ या कोळ्यांचे नामकरण करण्यात आले आहे.
“संवर्धनाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या ठिकाणांवरुन कोळ्याच्या दोन प्रजातींचा शोध लागलेला आहे ही खुप आनंदाची गोष्ट आहे. या नव्याने शोधलेल्या प्रजातींना वर्गीकृत केल्यामुळे जैवविविधतेच्या समृद्धतेत भर पडली याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. या अधिवासाच्या संवर्धनाची गरजच या निमित्ताने अधोरेखित झाली असुन या परिसंस्थेचे जतन करण्याचे महत्त्व सांगते.”
- ऋषिकेश त्रिपाठी, संशोधक
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.
लेखिका रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेच्या पदवीधर आहेत. सध्या दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये पर्यावरण प्रतिनिधी म्हणून कार्यरत. यापूर्वी विविध 'ह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज', मुलाखती आणि इतर वार्तांकनासाठी काम. आवाज आणि सूत्रसंचालन या क्षेत्रांमध्ये काम आणि विशेष आवड.