अमेरिका G20 परिषदेबद्दल म्हणते- "भारतात झालेली G20 शिखर परिषद यशस्वी"
12-Sep-2023
Total Views | 34
नवी दिल्ली : भारतात झालेल्या G-२० शिखर परिषदेचे जगभरातून कौतुक होत आहे. अमेरिकेने याला संपूर्ण यश म्हटले आहे. तसेच दिल्लीचा जाहीरनामाही महत्त्वाचा ठरला आहे. ९ आणि १० सप्टेंबर २०२३ रोजी दिल्ली येथे ही परिषद आयोजित करण्यात आली होती.
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी ११ सप्टेंबर रोजी पत्रकारांशी बोलताना या कार्यक्रमाच्या यशाबद्दल प्रतिक्रिया दिली. त्यांना विचारण्यात आले की G२० शिखर परिषद यशस्वी झाली का? प्रत्युत्तरात ते म्हणाले, “आम्हाला (अमेरिकेचा) पूर्ण विश्वास आहे की G२० परिषद पुर्णपणे यशस्वी झाली. G२० ही एक मोठी संघटना आहे. रशिया हा G२० चा सदस्य आहे. चीन हा G२० चा सदस्य आहे.
मिलर यांनी G२० च्या नवी दिल्ली जाहीरनाम्याचे एक महत्त्वाचे विधान म्हणून वर्णन केले. यातून रशियाच्या अनुपस्थितीबाबत ते म्हणाले, “विविध विचारांचे सदस्य आहेत. प्रादेशिक अखंडतेचा आणि सार्वभौमत्वाचा आदर करण्याचे आवाहन करणारे निवेदन संस्थेने जारी केले या वस्तुस्थितीवर आमचा विश्वास आहे. या तत्त्वांचे उल्लंघन केले जाऊ नये असे नमूद केले आहे. "हे एक अत्यंत महत्त्वाचे विधान आहे, कारण रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाच्या केंद्रस्थानी हेच आहे."
भारताच्या अध्यक्षतेखाली झालेल्या G-२० शिखर परिषदेतून अनेक ठोस परिणाम समोर आले आहेत. जागतिक नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 'निर्णायक नेतृत्व' आणि ग्लोबल साउथच्या आवाजाला पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचे कौतुक केले आहे. या परिषदेच्या माध्यमातून भारताने ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ हा संदेश जगाला दिला. जागतिक नेत्यांनी याचे कौतुक केले आणि ते मान्य केले.
भारताने पहिल्यांदाच G२० शिखर परिषदेचे आयोजन केले होते. भारताने सर्वसमावेशक वाढ, डिजिटल इनोव्हेशन, हवामानातील लवचिकता आणि न्याय्य जागतिक आरोग्य प्रवेश यासारख्या विविध मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. गेल्या वर्षी इंडोनेशियाने G२० चे अध्यक्षपद भूषवले होते, तर भारतानंतर ब्राझील अध्यक्षपद भूषवणार आहे.