नवी दिल्ली : राज्यात बालविवाह करणाऱ्या अथवा त्याच्याशी संबंध असणाऱ्या ३ हजार व्यक्तींना येत्या दहा दिवसात अटक केली जाणार आहे, अशी घोषणा आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सर्मा केली आहे. भाजपच्या राष्ट्रीय महिला मोर्चाच्या कार्यकारिणीचे
आयोजन आसाममध्ये करण्यात आले होते. कार्यकारिणीच्या समारो आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सर्मा यांच्या उपस्थितीत झाले.
यावेळी संबोधित करताना सर्मा म्हणाले की, आसाम सरकारने बालविवाहाच्या घटनांची गंभीर दखल घेऊन त्याविरोधात कार्यवाही सुरू केली आहे. जवळपास गेल्या सहा महिन्यांमध्ये बालविवाह करणारे अथवा त्यामध्ये संबंध असणाऱ्या ५ हजार लोकांना अटक करण्यात आली आहे. जी२० शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर या कारवाईस तात्पुरते थांबविण्यात आले होते. मात्र, आता पुढील दहा दिवसातच असे प्रकार करणाऱ्या २ ते ३ हजार लोकांना अटक करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली.
राज्यात सामाजिक संकट कायम राहिल्यास विशिष्ट वर्गातील मुलींना प्रगतीची संधी कधीच मिळणार नसल्याचे मुख्यमंत्री सर्मा यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, काही लोक म्हणतात की आम्ही मुस्लिम विरोधी आहोत. मात्र, तिहेरी तलाक, बहुपत्नीत्व आणि बालविवाह दूर करण्यासाठी आमच्या सरकारांनी उत्तम काम केले आहे. त्याचप्रमाणे काँग्रेसच्या कार्यकाळापेक्षाही भाजपच्या कार्यकाळात मुस्लिमांसाठी जास्त काम झाले आहे. अनेक मुस्लिम देशांमध्ये अशा वाईट प्रथा आधीच बंद करण्यात आल्या आहेत. मात्र, राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी भारतात या प्रथा रद्द करण्यास विरोध केल्याचाही टोला सर्मा यांनी यावेळी लगाविला आहे.