जैवइंधनाची सुवर्णसंधी

    11-Sep-2023
Total Views | 62
Editorial On India US And Brazil in global biofuel push

आयातीत कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी तसेच पर्यावरणाला अनुकूल, अशा जैवइंधनाच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी ‘ग्लोबल बायोफ्युएल अलायन्स’ची घोषणा ‘जी २०’ शिखर परिषदेत करण्यात आली. भारतासह ब्राझील आणि अमेरिका याचे सहयोगी देश आहेत. जैवइंधनासाठीचे आदर्श ठरवून देण्याची सुवर्णसंधीच भारताला यानिमित्ताने मिळाली आहे.

भारतात झालेली ‘जी २०’ शिखर परिषद ही सर्वार्थाने यशस्वी ठरली. सर्वसहमतीने प्रसिद्ध करण्यात आलेला दिल्ली जाहीरनामा ही या परिषदेच्या यशस्वितेची पोचपावतीच. तथापि, या परिषदेत नेमके कोणकोणते करारमदार झाले, त्यासंबंधीची सविस्तर माहिती प्रसिद्ध होऊ लागली आहे. ‘ग्लोबल बायोफ्युएल अलायन्स’ (जीबीए) हा भारताचाच एक उपक्रम. याची घोषणा याच शिखर परिषदेत करण्यात आली. सर्व क्षेत्रांमध्ये विशेषतः वाहतुकीसाठी जैवइंधनाच्या वापराला प्रोत्साहन देणे, हा त्यामागील हेतू. हे जैवइंधन नूतनीकरण योग्य बायोमास संसाधने तसेच टाकाऊ पदार्थांपासून निर्माण केले जाते. हरितगृह वायू उत्सर्जन, आयातीत जीवाश्व इंधनावरील अवलंबित्व कमी करणारे आहे.

‘जीबीए’ तंत्रज्ञानातील प्रगती, त्यासाठी बाजारपेठ निर्माण करणे आणि जैवइंधनासाठीची मानके निश्चित करणे सुलभ करेल. भारताने यापूर्वीच इथेनॉल मिश्रित इंधनाचे ध्येय ठेवले असून, त्यायोगे आयातीत इंधनाची गरज कमी करण्यासाठी सुनियोजित कालबद्ध कार्यक्रम हाती घेतला आहे. स्वच्छ उर्जेला बळ हे भारताचे ध्येय. भारत देशात कृषी पदार्थ, घनकचरा आणि कचर्‍यातून बाहेर पडणार्‍या वायूंपासून जैवइंधन तयार करण्याची क्षमता प्रचंड अशीच आहे. जैवइंधन निर्मिती हा ग्रामीण रोजगार निर्मितीला हातभार लावणारा प्रकल्प आहे. शेतीमधील उत्पन्न वाढवण्याबरोबरच आयात तेलाची अवाढव्य बिले ते कमी करेल. म्हणूनच भारताच्या नेतृत्वाखाली ‘जीबीए’मधील सहयोगी देश जैवइंधन क्षेत्राला पुढे नेण्यासाठी चालना देतील. भारत आपल्या तेलाच्या एकूण गरजेपैकी ८० टक्क्यांहूनही अधिक गरज आयातीद्वारे भागवतो. देशांतर्गत कच्च्या तेलाचे उत्पादन हे मागणीच्या केवळ १७.९ टक्के इतकीच पूर्तता करते. म्हणूनच ‘जीबीए’ म्हणजे काय, हे समजून घ्यायला हवे.

भारत, ब्राझील आणि अमेरिका यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे. सहयोगाला प्रोत्साहन देणे आणि जगभरात शाश्वत जैवइंधनाचा अवलंब करण्यास गती देणे, हे या आघाडीचे उद्दिष्ट. शाश्वत जैवइंधनाच्या उत्पादनासाठी तसेच व्यापारासाठी अधिक अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी ‘जीबीए’ काम करेल. मानके आणि प्रमाणने विकसित करणे, गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे; तसेच व्यापार सुलभ करणे, यांचा यात समावेश आहे. शाश्वत जैवइंधनाच्या व्यापारातील अडथळे दूर करण्यासाठी ही भागीदारी काम करेल. सुसंवाद साधणे, शुल्क कमी करणे आणि विकसनशील देशांना यासाठी आवश्यक ते तांत्रिक साहाय्य प्रदान करणे, यासाठी ‘जीबीए’ काम करेल. राष्ट्रीय जैवइंधन कार्यक्रमातून मिळालेले ज्ञान अन्य देशांना देण्यात येईल. ते अधिक प्रभावी जैवइंधन धोरण आखणे; तसेच त्याची अंमलबजावणी करण्यास मोलाचे ठरेल.

विकसित तसेच अंमलबजावणी करणार्‍या देशांना तांत्रिक साहाय्य प्रदान करण्यात येईल. यात प्रशिक्षण देणे, क्षमतांचा विकास करणे; तसेच तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे, यांचा समावेश असेल. हा एक महत्त्वाकांक्षी उपक्रम असून, कमी कार्बन अर्थव्यवस्थेच्या जागतिक संक्रमणामध्ये मोठे योगदान देण्याची त्याची क्षमता आहे. शाश्वत जैवइंधनाच्या वापरास प्रोत्साहन देऊन, हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्यास, हवेची गुणवत्ता सुधारण्यास तसेच मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण करण्यास हा उपक्रम मदत करेल. जैवइंधनाचा प्रमुख उत्पादक तसेच ग्राहक असलेल्या भारतासाठी ‘जीबीए’चे विशेष महत्त्व आहे. भारताने वाहतूक क्षेत्रात जैवइंधनाच्या वापरासाठी लक्ष्ये निश्चित केलेली आहेत. ‘जीबीए’ ती साध्य करण्यासाठी मदत करेल. जैवइंधन उद्योग विकसित करण्याबरोबरच रोजगार निर्मिती करून अर्थव्यवस्थेला चालना दिली जाईल.

भारत आपल्या गरजेच्या ८० टक्क्यांपेक्षा अधिक कच्चे तेल आयात करतो. आयातीत तेलावरील अवलंबित्व कमी करण्यास याची मदत होणार आहे. देशाचे विदेशी चलन तर वाचेलच. त्याशिवाय ऊर्जा सुरक्षा सुधारेल. जैवइंधनामुळे विषारी वायूंचे उत्सर्जन लक्षणीयरित्या कमी होईल. त्यामुळे हवेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल. भारतातील प्रमुख शहरांमध्ये वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढत असल्यामुळे हवेची गुणवत्ता सुधारणे, ही गरज आहे. जैवइंधन क्षेत्र हे वाढणारे क्षेत्र असून, त्यात नवनव्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. अर्थव्यवस्थेला बळ मिळण्याबरोबरच जीवनमान सुधारण्यास त्याची मदत होईल. पर्यावरणास अनुकूल पद्धतीने उत्पादित केलेल्या शाश्वत जैवइंधनाच्या वापराला प्रोत्साहन मिळाल्याने, भारताला शाश्वत विकासाची उद्दिष्टे साध्य करता येतील.

जैवइंधनाच्या वापराला चालना देण्याच्या जागतिक प्रयत्नात ‘जीबीए’ हे एक मोठे पाऊल आहे. भारत ऊर्जा संक्रमणामध्ये महत्त्वपूर्ण असे योगदान देईल. कृषी कचर्‍यापासून जैवइंधन तयार केले जाऊ शकते, जे अन्नाची नासाडी टाळण्याबरोबरच कृषी उत्पन्न वाढीला मदत करेल. जैवइंधनाच्या उत्पादनामुळे ग्रामीण भागात रोजगार निर्माण होतील. गरिबी कमी होण्यास तसेच ग्रामीण भागाचा विकास होण्यास त्याचा हातभार लागेल. शाश्वत पद्धतीने घेतलेल्या कृषी पिकांपासून जैवइंधन तयार केले जाऊ शकते, जे हवामान बदलाची तीव्रता कमी करेल.

एकंदरीतच हा उपक्रम भारतासह संपूर्ण जगासाठी सकारात्मक विकास मानला जाईल. विशेषतः भारताला त्याची ऊर्जा सुरक्षा, पर्यावरणीय आणि आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी मदत करण्याची त्याची क्षमता आहे. भारतातील ऊर्जा संतुलन तसेच सुरक्षितता सुनिश्चितता करण्यासाठी जैवइंधनाचे धोरणात्मक महत्त्व अनन्यसाधारण असेच आहे. ‘मेक इन इंडिया’ या केंद्र सरकारच्या उपक्रमाला साजेसे असेच. ‘स्वच्छ भारत’ अभियानाला हातभार लावण्याची एक चांगली संधी यानिमित्ताने शेतकर्‍यांना मिळाली आहे. त्यांचे उत्पन्न वाढवणे, कच्च्या तेलाची आयात कमी करणे, रोजगार निर्मिती, पैशांचा अपव्यय टाळणे; तसेच संपूर्ण जगासाठी आदर्श, असा जैवइंधनाचा सक्षम पर्याय निर्माण करण्याची सुवर्णसंधी भारताला ‘जीबीए’च्या माध्यमातून मिळाली आहे, असे म्हटले तर फारसे वावगे ठरणार नाही.



अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121