भारत मंडपम, नवी दिल्ली : ‘जी२०’ शिखर परिषदेच्या अखेरच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय माध्यम कक्षास भेट देऊन परिषदेचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांसोबत अल्पसंवाद साधला. ‘जी२०’ शिखर परिषदेचे आयोजन नवी दिल्लीतील प्रगती मैदानातील नव्याकोऱ्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्रात करण्यात आले होते. या परिषदेचे वार्तांकन करण्यासाठी देशविदेशातून सुमारे दोन ते तीन हजार पत्रकार आले होते. त्यांच्यासाठी परिषदेस्थानी भव्य अशा दोन आंतरराष्ट्रीय माध्यम कक्षांची उभारणी करण्यात आली होती.
परिषदेच्या अखेरच्या दिवशी सायंकाळी साडेसात वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय माध्यमकेंद्रास भेट दिली. यावेळी पंतप्रधानांनी तेथे उपस्थित पत्रकारांना “कैसे रहा कार्यक्रम ?”, अशा प्रश्न केला. त्याचप्रमाणे “थँक यू मीडिया” असे म्हणून त्यांनी प्रसारमाध्यमांचे आभारही मानले. यावेळी त्यांनी अनेकांशी अगदी सहजतेने हस्तांदोलनही केले.
पंतप्रधान मोदी हे माध्यम कक्षास भेट देणार असल्याचे वृत्त दुपारीच समजले होते. त्यामुळे परिषदेच्या समारोपानंतर दुपारीच निरोप घेणाऱ्या प्रतिनिधींनी सायंकाळपर्यंत थांबण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पंतप्रधान नेमके कधी येणार, याची सर्वजण उत्सुकतेने वाट पाहत होते. पंतप्रधानांच्या आगमनापूर्वी त्यांच्या सुरक्षाव्यवस्थेने दुपारीच माध्यम कक्षाचा ताबा घेऊन आवश्यक ती कार्यवाही पूर्ण केली होती.
दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी यावेळी परिषदेसाठी कार्यरत सुरक्षा कर्मचारी, खानपान व्यवस्था बघणारे कर्मचारी आणि अन्य व्यक्तींसोबतही संवाद साधला.