संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचा विस्तार अत्यावश्यक : पंतप्रधान नरेंद्र मोदी

जी २० अध्यक्षपद ब्राझीलला बहाल

    10-Sep-2023
Total Views | 30
G20 Summit Chairmanship awarded to Brazil

भारत मंडपम, नवी दिल्ली :
कालानुरूप बदल न केल्यास व्यक्ती आणि संस्थांचे महत्त्व नष्ट होते. त्यामुळेच नवी जागतिक रचना प्रतिबिंबीत होण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत (युएनएससी) बदल होणे अतिशय आवश्यक आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या अध्यक्षतेखालील ‘जी२०’च्या ‘वन फ्युचर’ या अखेरच्या सत्रास संबोधित केले. यावेळी त्यांनी ‘जी२०’ चे पुढील अध्यक्षपद ब्राझिलकडे सुपूर्द केले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी बदलत्या जागतिक रचनेविषयी भाष्य केले.

व्यक्ती आणि संस्था काळानुरूप स्वतःत बदल करत नाही, ती आपली प्रासंगिकता गमावून बसते, हा निसर्गाचा नियम आहे. गेल्या काही वर्षांत अनेक प्रादेशिक मंच अस्तित्वात येण्याचे कारण काय आहे, आणि ते प्रभावीही ठरत आहेत, याचा विचार खुल्या मनाने करायला हवा. जगाला चांगल्या भविष्याकडे घेऊन जाण्यासाठी जागतिक व्यवस्था सध्याच्या वास्तवानुसार असणे आवश्यक आहे. त्या पार्श्वभूमीवर युएनएसीचा विचार करणे गरजेते आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना झाल्यावेळी असलेले जग आणि आताचे जग यामध्ये फरक आहे. असे असूनही युएनएससीच्या कायमस्वरूपी सदस्यांची संख्या पूर्वी होती तेवढीच आहे. त्यामुळे बदलत्या जागतिक रचनेचे भान असणे आणि त्यानुसार संस्थेत बदल घडविणे हे आवश्यक आहे. त्यामुळेच भारताने पुढाकार घेऊन आफ्रिकन संघाचा समावेश ‘जी२०’मध्ये केला, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

भारताने सर्वसमावेशक विकासासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, भारतातील लहानात लहान गावामध्येदेखील डिजीटल व्यवहार केले जातात. त्यामुळे भारताच्या अध्यक्षतेखाली डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांसाठी मजबूत व्यवस्था निर्माण करण्यावर एकमत झाली आहे. ग्लोबल साउथच्या विकासासाठी "डेटा फॉर डेव्हलपमेंट कॅपॅसिटी बिल्डिंग इनिशिएटिव्ह" लाँच करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे सर्व देशांच्या आर्थिक – सामाजिक विकासासाठी संशोधन व विकास क्षेत्रामध्ये एआयच्या वापरावरही भारताचा भर असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी नमूद केले आहे.

सायबर सुरक्षेसाठी जागतिक एकमत गरजेचे

सायबर सुरक्षा आणि क्रिप्टो चलनाच्या आव्हानांचा सामना प्रत्येक देशाला करावा लागत आहे. क्रिप्ट चलनांचे नियमन करण्यासाठी जागतिक मानके विकसित करावी लागतील. त्याचप्रमाणे सायबर सुरक्षेसाठीही जागतिक सहकार्य आणि फ्रेमवर्क आवश्यक आहे. सायबर विश्वातून दहशतवादाला नवनवीन माध्यमे आणि निधी मिळवण्याच्या नव्या पद्धती मिळत आहेत. त्यामुळे या दोन्ही आव्हानांवर मार्ग काढण्यासाठी जागतिक एकमत गरजेचे असल्याची टिप्पणी पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केली.

जगातील असमानता दूर करण्याची गरज – लुईझ दा सिल्वा, राष्ट्रपती – ब्राझिल

ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईझ दा सिल्वा यांनी ‘जी२०’ चे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर म्हणाले, जगात अनेक ठिकाणी अद्यापही अन्नटंचाई आहे. त्याचप्रमाणे उत्पन्न, आरोग्य सुविधा, शिक्षण, लिंग, वंश आणि प्रतिनिधीत्वाविषयी मोठ्या प्रमाणात असमानता आहेत. त्यामुळे जगातील ही असमानता दूर करण्यासाठी एकत्रित प्रयत्न गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121